कॉलिन्स, पॅट्रीशिया हिल (Collins, Patricia Hill) : (१ मे १९४८). प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे झाला. त्या अमेरिकेतील ख्यातनाम अभ्यासिका असून एक सामाजिक संशोधक व सिद्धांतकार म्हणून ओळखल्या जातात. कॉलिन्स यांचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण फिलाडेल्फिया गर्ल्स हायस्कूलमधून झाले. नंतर त्यांनी ब्रँडिज विद्यापीठातून १९६९ मध्ये कला शाखेतून बी. ए. ही पदवी आणि तेथूनच पीएच. डी. पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठात सामाजिक विज्ञान विषयातून एम. ए. ही पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्यांनी सेंट जोसेफ स्कूल आणि प्रामुख्याने बोस्टनमधील काही शाळांमध्ये अभ्यासक्रम विकसित करण्याचे कार्य केले. १९७४ मध्ये त्यांनी बोस्टनच्या बाहेर मेडफॉर्डमधील तफ्त्स विद्यापीठात आफ्रिकन-अमेरिकन सेंटरच्या संचालक होत्या. त्यांनी मेरीलँड विद्यापीठाच्या पार्क कॉलेजमध्ये समाजशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले. त्यांनी सिनसिनॅटी विद्यापीठामध्ये अमेरिकन-आफ्रिकन अभ्यास केंद्राच्या विभागप्रमुख म्हणून पदभार सांभाळला. तसेच अमेरिकन समाजशास्त्र समितीच्या माजी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. असोसिएशनच्या शंभराव्या अध्यक्ष आणि अमेरिकन-आफ्रिकन स्त्री म्हणून त्यांनी स्थान भूषविलेले आहे.
कॉलिन्स यांनी वंश, वर्ग आणि लिंगभाव यांवर विशेषत्वाने कार्य केले आहे. तेच त्यांचे मुख्य अभ्यास विषय राहिले आहेत. त्यांनी व्यक्ती आणि गट कसे परस्पर संवाद साधतात, याविषयीच्या अभ्यासावर प्राधान्य दिले. त्या आफ्रिकन-अमेरिकन समाजातील कामगार वर्ग या सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या असल्यामुळे सामाजिक गट हे लोकांच्या राहणीमानावर, कार्यपद्धतीवर आणि संवाद पद्धतीवर कसा परिणाम करतात, यावर त्यांनी अभ्यासातून मांडणी केली आहे.
कॉलिन्स यांनी आफ्रिकन-अमेरिकन महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात ब्लॅक फेमिनिस्ट थॉट हे पुस्तक लिहिले. त्यांच्या मते, जेव्हा एका काळ्या स्त्रीच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास करण्यात येतो, तेव्हा तिच्या जाणिवांचे योग्य आकलन होते. अशा अभ्यासातून त्यांच्यात परिणामकारक बदल घडवून आणण्यास मदत होते. त्यातून तिच्या स्वत्वाची वेगळी जाणीव निर्माण होऊन ती सशक्त होऊ शकते. ती स्वत्वाची जाणीव झालेल्या तिच्यासारख्या इतरांना संघटित करून स्वातंत्र्याच्या मार्गावर जाण्यास प्रेरित करणारी ठरते. त्यामुळे ती आणि ते सर्वजण संघटितपणे त्यांच्या सभोवतालचे जग बदलू शकतात. कल्पना, ज्ञान आणि चेतना हे व्यक्तिगत कृष्णवर्णीय स्त्रिवर प्रभाव टाकू शकतात, तर गट म्हणून काळ्या स्त्रियांवर त्यांचा काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार त्यांनी विविध पातळ्यांवर केला. त्यानुसार त्यांच्या असे लक्षात आले की, आफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांनी एक सामूहिक ज्ञान तयार केले असून ते काळ्या स्त्रियांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. अशा ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करणे आणि त्याची निर्मिती प्रक्रिया जाणून त्याचे स्वरूप रेखाटणे हे काळ्या स्त्रीवादी विचारांचा उद्देश आहे. आफ्रिकन-अमेरिकन महिला सबलीकरणाचे ज्ञान कसे वाढविता येईल हे तपासणे त्यांचा ध्यास व ध्येय राहिले आहे. आफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांच्या सशक्तीकरणामुळे, त्यांच्या ज्ञाननिर्मितीमुळे दडपशाही आणि सामाजिक अन्यायासंदर्भात पुनरोक्ती कधीही होणार नाही. काळ्या स्त्रियांवरील अन्याय दूर करणे हे इतरांवर वर्चस्व प्राप्त करून सत्ता मिळविणे असे ठरू नये, असे त्यांचे मत आहे. काळ्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या विविध गटांपैकी एक गट हा काळ्या स्त्रियांच्या अन्यायविरुद्धच्या लढ्याचा असा विपर्यास करताना आढळल्यामुळे त्यांनी हे मत मांडले आहे.
कॉलिन्स यांनी आपल्या अनुभवांवर केंद्रित राहून बौद्धिक कार्य करताना ज्ञानव्यवहाराच्या पातळीवर इतरांशी संवादी राहतात. या दृष्टीने त्या काळ्या स्त्रीवादी विचारविश्वात कार्य करतात; परंतु हे कार्य त्या इतर समान सामाजिक न्यायाच्या प्रकल्पांच्या संयोगाने करतात. काळ्या स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या सखोल अभ्यासातून त्यांनी काळ्या स्त्रीवादी विचारांच्या उद्देशांवर विशेष लक्ष केंदित केले आहे.
कॉलिन्स यांनी ‘बहिर्गत–अंतर्गत’ या संकल्पनेचा विस्तार केला. आपल्यावरील अन्याय आणि दडपशाहीचा सामना करण्यासाठी काळ्या स्त्रिया ज्या प्रतिकार पद्धतींचा उपयोग करीत होत्या, त्याबाबत त्यांनी मौलिक मते मांडली आहेत. तसेच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्ञानाची निर्मिती आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागृतीच्या निर्मितीविषयीदेखील त्यांनी मत व्यक्त केले आहे. समाजातील शोषित-पिडित समूहांच्या ज्ञानाचा आणि दृष्टिकोणाचा स्वीकार करणे, त्याला सिद्धांत म्हणून मान्यता देणे यांबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले आहे.
कॉलिन्स यांनी परिघाबाहेरील लोक ही संकल्पना महत्त्वाची मानली आहे. या संकल्पनेतून काळ्या स्त्रियांनी मांडलेल्या ज्ञानामुळे काळ्यांवरील सामाजिक अन्याय समजून घेण्यासाठी जशी मदत होते, तशीच समाजातील इतर शोषित समूहांवरील सामाजिक अन्यायाची तपासणी करण्यास मदत होते हे संकल्पनेतून दिसून येते. परिघाबाहेरील लोक हे केंद्रामधील लोकांच्या दृष्टिकोणाचा कशा प्रकारे प्रतिकार करतात याची तपासणी त्यानी केली आहे. वर्तमान काळात अस्तित्वात असणाऱ्या सामाजिक अन्यायाकडे लक्ष वेधून त्या शोषित-पीडितांच्या जगातून होणाऱ्या सैद्धांतिक मांडणीचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांच्या मते, उच्चभ्रूंना ज्ञान वैध ठरविण्याची शक्ती आहे. त्यामुळे त्यांना अवगत असलेल्या ज्ञानाला ते सिद्धांत म्हणून सार्वत्रिक आणि आदर्श म्हणून परिभाषित करतात.
कॉलिन्स यांचा ‘लर्निंग फ्रॉम द आउटसाइडर विदिन : द सोशलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ ब्लॅक फेमिनिस्ट थॉट’ हा लेख १९८६ मध्ये समाजशास्त्रीय जर्नल सोशल प्रॉब्लेम्समध्ये प्रकाशित झाला. या लेखातील मांडणीमुळे कॉलिन्स यांची समाजशास्त्रज्ञ आणि सामाजिक सिद्धांतकार म्हणून पहिल्यांदा ओळख झाली. या लेखामध्ये त्यांनी आफ्रिकी-अमेरिकी महिलांनी त्यांच्या उपेक्षित स्थानाचा किंवा बाहेरील व्यक्तीच्या स्थितीचा कसा सर्जनशील वापर केला आहे, यावर लक्ष केंद्रित केले होते.
कॉलिस यांनी वंशवाद आणि लैंगिक विषमता ही आफ्रिकन-अमेरिकन समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत पसरलेली असून ती परस्परांशी निगडित असल्याचे म्हटले. आफ्रिकी-अमेरिकी पुरुष आणि स्त्रियांवर दडपशाही लादण्यासाठी सौंदर्यविषयक निकष/आदर्श हे कसे काम करतात, हे त्यांनी स्पष्ट केले. समाजात अस्तित्वात असणाऱ्या वांशिक भेदभावाला, वर्गीय विषमतेला आणि लैंगिक असमानतेला सुट्या रूपात न पाहता त्यांच्यातील आंतरसंबंध जाणून घेऊन त्याचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. त्यातून शोषणाच्या नेमक्या वास्तव रूपाचे आकलन होईल. त्यासाठी आंतरच्छेदिता दृष्टिकोणातून कोणत्याही समस्येकडे पाहणे आवश्यक आहे. या दृष्टिकोणाच्या वापराने कोणत्याही समस्येचे आकलन होऊन समस्येच्या अन्य बाजू दृष्टीक्षेपात येतात. परिणामी समस्येची परिणामकारकतेने सोडवणूक शक्य होते.
कॉलिन्स यांनी वंशवाद, वर्गभेद, स्त्रियांवरील पितृसत्ताक नियंत्रण आणि होमोफोबिया यांच्यातील आंतरसंबंधावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या एकत्रित अभ्यासाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली. त्यांचे हे समाजशास्त्रीय विचारांमध्ये सर्वांत महत्त्वाचे योगदान होय. त्यांनी न्यायावर आधारित सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी विषमतेच्या विविध संरचनांमध्ये असणाऱ्या संबंधाचा बदलता संदर्भ लक्षात घेऊन त्याविरुद्ध सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर लढा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. कृष्णवर्णीय लोक हे समाजात आणि तुरुंगातदेखील भेदभाव अनुभवत असतात. त्यांच्या वाट्याला आलेले दारिद्र्य हे भेदभावाची निष्पत्ती आहे. काळ्या समाजातील लिंगभेद आणि होमोफोबिया हे आफ्रिकन-अमेरिकन ऐक्यासाठी तितकेच विध्वंसक आहेत, अशा प्रकारे काळ्या स्त्रियांच्या दास्याच्या संरचनात्मक पैलूंचा अभ्यास करून त्यांनी काळ्या स्त्रियांच्या मुक्तीलढ्याचे स्वरूप स्पष्ट केला आहे. या मुक्तीलढ्यातील काळ्या स्त्रियांची ज्ञाननिर्मिती आणि राजकीय कृती ही समाजातील दडपलेल्या समूहांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
कॉलिन्स यांना अनेक पुरस्कार लाभले आहे. त्यांना ‘जेसीबर नोट अवॉर्ड’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेकडून त्यांना ‘सी. राईट मिल्स’ पुरस्कार प्राप्त झाला.
कॉलिन्स यांची अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित आहेत. ब्लॅक फेमिनिस्ट थॉट, १९९०; रेस, क्लास अँड जेंडर : ॲन अँथोलॉजी, १९९२; फाइटिंग वर्ड्स : ब्लॅक वुमन अँड द सर्च फॉर जस्टिस, १९९८; ब्लॅक सेक्शुअल पॉलिटिक्स : आफ्रिकन अमेरिकन, जेंडर आणि द न्यू रेसिझ्म, २००४; अनदर काइंड ऑफ पब्लिक एज्युकेशन, २००९ इत्यादी.
संदर्भ :
- Haber, Barbara, The Women’s Annual, Vol. 2., GK Hall, 1981.
- N., Yuval-Davis (Ed.), Women, Citizens and Difference, London, 1999.
- Calhoun, Craig; Chris, Rojek; Bryan, S. Turner, Introduction : The SAGE Handbook of Sociology, London, 2005.
समीक्षक : निर्मला जाधव