नत्ताल, जॉर्ज हेन्री फाल्कीनर : (५ जुलै १८६२ – ११ डिसेंबर १९३७) जॉर्ज हेन्री फाल्कीनर नत्ताल यांचा जन्म सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे झाला. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.डी.ची पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी जर्मनीच्या गॉटिंजेन विद्यापीठातून पीएच्.डी. पूर्ण केले.

नत्ताल यांचे कीटकवाहक पराजिवी या क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे मानले जाते. २० व्या शतकाच्या सुरुवातीला संशोधनाचा विषय पराजीवींची माहिती आणि त्यांचे जीवनचक्र समजून घेणे इतकाच सीमित होता. उष्णकटिबंधीय औषधे ही विद्याशाखा अस्तित्वात आलेली होती परंतु पराजीवीशास्त्र उदयाला आलेले नव्हते. नत्ताल यांनी प्रथमच स्वच्छता संशोधन पत्रिकेला पूरक अशी पराजीवीशास्त्र या विषयावर पुरवणी सुरू केली. या पुरवणीत आदिजीवशास्त्र, कीटकशास्त्र आणि परान्नपोषक कृमिशास्त्र या विषयांवरील संशोधन एकाच शीर्षकाखाली परजीवीशास्त्र म्हणून उपलब्ध झाले.

त्यांनी प्रतिकारक्षमताशास्त्र, निर्जंतुक परिस्थितीतले जीवन, रक्तविषयक रसायनशास्त्र आणि विशेषतः गोचीडसारख्या संधिपाद कीटकांद्वारे पसरणारे आजार या क्षेत्रात लक्षणीय व सर्जनशील संशोधन केले. त्यांनी इंग्लंडमध्ये अगोदरपासून मलेरियाने प्रभावित क्षेत्रांचा संदर्भ घेत एनाफिलस डासांच्या फैलावाचा तपास केला. विल्यम वेल्च यांच्यासोबत त्यांनी गॅंग्रेनसाठी कारणीभूत असणार्‍या क्लोस्ट्रेडीअम परफ्रीन्जन्स (Clostridium perfringens) या  जीवाणूचा शोध लावला. त्यांनी आतड्यात वास्तव्य करणार्‍या जीवाणूंच्या पचनक्रियेतील भूमिकेचे महत्त्व दाखवून दिले. रक्तातील जीवाणूनाशक गुणधर्मांचा त्यांनी अभ्यास केला. घोड्याच्या आणि कुत्र्याच्या लाल रक्तपेशींमध्ये आढळणार्‍या एका छोट्या आदिजीव  पराजीवीचे नाव नत्ताल यांच्या नावावरून नत्तालिया असे ठेवण्यात आले. १९०० साली केंब्रिज, इंग्लंड येथे ते जिवाणूशास्त्र आणि प्रतिबंधात्मक औषधशास्त्र या विभागात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. नंतर नत्ताल केंब्रिज येथे जीवविज्ञानविषयाचे पहिले क्विक प्रोफेसर म्हणून निवडले गेले. नत्ताल यांनी जर्नल ऑफ हायजीन या मासिकाची स्थापना केली व त्याचे संपादन केले. पुढे त्यांनी पॅरासायटॉलॉजी नावाच्या जर्नलची स्थापना व संपादन केले. १९२१ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठात मोल्टेनो जीवविज्ञान व पराजिवीशास्त्र संस्थेची स्थापना केली व या संस्थेचे ते संचालक बनले.

त्यांनी लिहिलेले वैज्ञानिक साहित्य जवळपास १५० व्यावसायिक जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले. त्यांची काही महत्त्वाची प्रकाशने पुढीलप्रमाणे आहेत: Hygiene measures in relation to infectious diseases; The Bacteriology of Diphtheria; Ticks; The drug treatment of canine piroplasmosis; The training and status of public health officers in the United Kingdom.

लंडन येथे त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे