सपुष्प वनस्पतींच्या फुलांमध्ये आणि अपुष्प वनस्पतींपैकी अनावृत्त वनस्पतींच्या प्रकटबीजी (Gymnosperm) शंकूमध्ये (नर कोन) परागकण आढळून येतात. फुलांमधील पुं-केसरातील परागकोशांमध्ये त्यांची निर्मिती होते. पराग हा मूळचा संस्कृत शब्द धूळ या अर्थाने वापरला जातो. परागकण हे पुनरुत्पादनातील नरपेशी होत. परागकणांची निर्मिती नरबीजुके निर्माण करणाऱ्या बीजांडामध्ये (Anther lobes मध्ये) होते. परागकण हे अतिसूक्ष्म, हलके, प्रचंड संख्येने तयार होणारे, पांढरट किंवा पिवळसर रंगाचे, बारीक भुकटीसारखे/सूक्ष्मकण (Pollen dust) असतात. ते वारा, पाणी व कीटकांमार्फत सर्वत्र पसरतात. त्याला परागण/परागीभवन (Pollination) म्हणतात.
जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका वनस्पतीच्या दोन फुलांत होते, तेव्हा त्यास स्वयंपरागण (Self Pollination) असे म्हणतात; तर परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते, तेव्हा त्यास परपरागण (Cross Pollination) असे म्हणतात.
एका फुलातील परागकण हे त्याच फुलातील किंवा दुसऱ्या फुलातील स्त्री-केसरावर (Stigma) पडले की, प्रजोत्पादन क्रियेला सुरुवात होते व नंतर त्याचे रूपांतर फळधारणेत होते. पक्व झालेले पराग परस्परांपासून सुटे होतात आणि हवेमध्ये पसरतात. त्याचे मोनाड (Monad; एक परागकण), डायड (दोन परागकण), टेड्राड (Tetrad; चार परागकण), पॉलिएड (Polyad; पुंजका/परागपुंज) असे प्रकार आहेत.

प्रकाशीय सूक्ष्मदर्शक (Light Microscope; LM) व क्रमविक्षण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक (Scanning Electron Microscope; SEM) यांच्या साहाय्याने परागकणांचा खूप सखोल अभ्यास झाला आहे. प्रकाशीय सूक्ष्मदर्शकामुळे द्विमिती (२-D) चित्रे/आकृत्या, क्रमविक्षण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आणि Z-Stack (एकाच परागकणाचे वेगवेगळ्या बाजूने काढलेले बरेच फोटो) च्या साहाय्याने त्रिमिती (३-D) आकृत्या मिळतात. परागकण हे बहुतेक वेळा गोलाकार असल्यामुळे अभ्यासकाला ३-D आकार समजण्यासाठी क्रमविक्षण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आणि Z-stack आकृत्या उपयोगी पडतात. त्यांचे आकार, आकारमान व अधिलेपाचे स्वरूप यांत बरीच विविधता असते. उदा., सूर्यफुलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल व गुलाबाचे त्रिकोणी असतात. परंतु कोणत्याही एकाच कुलातील, जातीतील किंवा प्रजातीतील वनस्पतींचे परागकण मात्र वरील बाबतीत सारखेच असतात. चौरस, अर्धगोल इ. भिन्न आकारांचे परागकणही आढळतात. झोस्टेरा या पाण्यातील वनस्पतीचे परागकण लांब व बारीक केसासारखे (२,५५० x ३.७ μ) असतात.
सूक्ष्मदर्शकाखाली परागकण ध्रुवीय आकार (Top view/Polar view) आणि विषुववृत्तीय आकार (Equatorial view) अशा दोन प्रकारे अभ्यासतात. त्यावरून परागकणांचे मोजमाप घेता येते.


परागकणांचे ध्रुवीय आकार आणि विषुववृत्तीय आकार वेगवेगळे असतात. त्यावरून त्याचा उपयोग पराग वर्गीकरणामध्ये करतात.
परागकणांवरील छिद्रे (Aperture) : ही पाकळीच्या आकारासारखी लंबाकार/खोबणीसारखी (Colpi/Coplus), लहान छिद्रासारखी गोल (Pore) आणि दोन्हींचे मिश्रण (Colporate) असणारी अशी असतात. प्रकटबीजी (Gymnosperm) वनस्पतींमध्ये (उदा., देवदार, सुरू इ) छिद्रे नसतात; सेक्विया (Sequoia) परागावर फक्त एक उंचवटा असतो; सायकॅडेसीमध्ये (Cycadaceae) एक खोबण असते. फुलझाडांत छिद्रे व खोबणी यांचे विविध प्रकार आढळतात. बहुतेक सर्व गवतांत परागकणांवर एकच छिद्र असते; बहुतेक सर्व तालवृक्षांच्या (Monocot) [उदा., खजूर, पामी] परागावर एकच खोबण आढळते. द्विदल जातीत (Dicot) फक्त तीन छिद्रे, तीन खोबणी किंवा तीन छिद्रे आणि खोबणी आढळतात.

परागकणांमध्ये ध्रुवत्व (Polarity) : याचे ३ प्रकार आढळतात : १) समध्रुवीय (Isopolar) प्रकारात दोन्ही ध्रुव समान असतात आणि विषुववृत्ताभोवती सममिती (Symmetry) दर्शवितात. बहुतेक सर्व परागकण या प्रकारात मोडतात. २) असमध्रुवीय (Heteropolar) प्रकारात दोन्ही ध्रुव असमान असतात आणि विषुववृत्ताभोवती अ-सममिती (Asymmetry) दर्शवितात. आणि ३) गोलाकार (Spherical) या प्रकारात विशिष्ट प्रकारचे ध्रुव नसतात, त्यामुळे ध्रुवीयपणाचे ओळखता येत नाही.

प्रत्येक परागकण अतिसूक्ष्म असून त्याचा सरासरी व्यास २४-५० मायक्रॉन असतो. द्विदलिकित वनस्पतींत तो २-२५० मायक्रॉन आणि एकदलिकित वनस्पतींमध्ये १५-१५० मायक्रॉन असतो. सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यास असे कळून येते की, प्रत्येक परागकणाचा आतील भाग सूक्ष्म थेंबासारख्या (ठिपक्याएवढ्या) जीवद्रव्याचा (Cellulose) असून त्यात प्रकल (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज = Nucleus), संचित स्टार्च व तेल असतात. त्याभोवती दोन संरक्षक वेष्टने असतात; आतील पातळ वेष्टनाला ‘आलेप’ (Intine) आणि बाहेरच्या जाड उपत्वचायुक्त किंवा मेणासारख्या पदार्थाने बनलेल्या वेष्टनाला ‘अधिलेप’ (Exine) म्हणतात. अधिलेपामुळे बहुतेक आम्ले व सु. ३००° से. पर्यंतच्या तापमानापासून संरक्षण मिळते.
परागकणांचे रक्षण करणे हे अधिलेपाचे मुख्य कार्य असते व परागकणाचे कार्यसिद्धीस जाण्यासाठी मूळच्या फुलातून (पुं-केसरातून) निघून स्त्री-केसराच्या टोकावर जाऊन पडेपर्यंत ते सुरक्षित राहणे आवश्यक असते.
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे आलेप व अधिलेप यांची अतिसूक्ष्मरचना समजून येते व त्याचा उपयोग परागकणांची विविधता व त्यांतील सूक्ष्म फरक समजून घेण्यास मदत होते. अधिलेपाच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या नक्षीचे प्रकार दिसून येतात. परागकणांच्या वेष्टनाची जाडी किती आहे (Exine Wall thickness) हे समजते. अधिलेपाच्या वर आणखी एक आवरण असते त्याला टेक्टम (Tectum) म्हणतात. याचे टेक्टेट (Tectate), सेमीटेक्टेट (Semitectate) आणि इनटेक्टेट (Intectate) असे तीन प्रकार आहेत.
एल. ओ. वर्गीकरणाने अधिलेपाच्या नक्षीचे प्रकार (Ornamentation) कळतात. Lux=Light, प्रकाश, Obscuritas = Darkness, गडद. (कृष्णधवल = L.O. Analysis) मुळे पृष्ठभागावरील उंच सखलपणा समजतो. पराग वर्गीकरणातील हा महत्त्वाचा भाग आहे. पृष्ठभाग नमुनाचे वर १६ प्रकार दिले आहेत. तसेच काहींच्या आकृत्याही दिल्या आहेत. अशा वेगवेगळ्या अंगाने परागकणांचा सखोल अभ्यास करता येतो.
संदर्भ :
- Erdtman, G., An Introduction to Pollen Analysis, Waltham, 1954.
- Faegri, K.; Iversen, J., Textbook of Modern Pollen Analysis, Copenhagen, 1964.
- Kremp,G.O.W., Morphologic Encyclopedia of Palynology, 1965.
- Nair, P. K. K., Essentials of Palynology, Bombay,1966.
- Wodehouse, R. P., Pollengrains, New York, 1935.
समीक्षक : शरद चाफेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.