नरसिम्हा, रोद्दम : (२० जुलै, १९३३- १४ डिसेंबर, २०२०) वांतरीक्ष (aerospace) आणि द्रव गतिकी या शास्त्रांचे थोर वैज्ञानिक, पद्मविभूषण रोद्दम नरसिम्हा यांनी कम्प्यूटेशनल द्रायु गतिशीलता, नागरी विमानांची रचना, वांतरीक्ष इलेक्ट्रॉनिकी अशा विविध क्षेत्रांत संशोधन केले. तंत्रज्ञान निर्मिती केली. तसेच भारतात अनेक प्रयोगशाळा उभारण्यात भरीव कामगिरी केली. संशोधनासोबत भारतीय विज्ञानजगतातील एक आघाडीचे विचारवंत, संस्थांचे शिल्पकार आणि भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार अशा खास भूमिकांतूनही त्यांनी कार्य केले.
रोद्दम नरसिम्हा यांनी आचार्य पाठशालेच्या शालेय शिक्षणानंतर बंगळूरुच्याच युनिव्हर्सिटी विश्वेश्वरय्या कॉलेजमधून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये (आय.आय.एस्सी.) मास्टर्सचा अभ्यास करतांना सुप्रसिद्ध वांतरीक्ष वैज्ञानिक सतीश धवन यांच्याशी त्यांची गाठ पडली. त्या काळी द्रायु गतिकी, अतिवेगवान वायूंची गती, शॉक वेव्ह्ज हे विषय नवीनच होते. प्रा. धवन यांनी ध्वनीपेक्षा वेगवान वाऱ्याचा झोत कसा असतो हे शिकवण्यासाठी फक्त अर्धा सेंमी. व्यासाचा वायु बोगदा (विंड टनेल) तयार केला आणि दुसऱ्या महायुद्धातील विमानांतील ऑक्सिजन सिलिंडर वापरून वेगवान हवेचे झोत कसे जातात ह्याचे प्रात्यक्षिक दिले. स्तरीय प्रवाहाचे (लॅमिनार फ्लो) रूपांतर क्षुब्ध प्रवाहामध्ये (टर्ब्युलंट फ्लो) कसे होते याचे निरीक्षण आणि गणिती प्रारूप यावर नरसिम्हांनी एक शोधनिबंध लिहिला. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजच्या मोठ्या ध्वनीवेगातीत वायु बोगद्यांचे आराखडे आय.आय.एस्सी.मधील छोटेखानी प्रतिकृत्यांवर आधारित होते. धवन यांच्या मार्गदर्शनामुळे नरसिम्हा अमेरिकेतील कॅल्टेक विद्यापीठामध्ये पीएच्.डी.च्या संशोधनासाठी गेले.
द्रायुगतिकीचा अभ्यास करतांना ते वीणासुद्धा वाजवत असत. वीणेची तार झंकारल्यावर ती एका प्रतलात कंपन न पावता वेगवेगळ्या प्रतलांत कंपन पावते ह्याबद्दल त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी वीणेच्या तारेचे समीकरण मांडले. त्याआधीच्या ५-६ जणांच्या समीकरणांमध्ये काही तरी त्रुटी होत्या. नरसिम्हांनी यावर काम करून आपले समीकरण मांडले व शोधनिबंध लिहिला. त्यातील गणिती आशय सर्वमान्य व्हायला पन्नासेक वर्षे लागली पण अगदी तरुण वयांत केलेले ते संशोधन अचूक होते.
नरसिम्हा यांनी द्रायु गतिकीचे उपयोजन करून भारतातील मौसमी वाऱ्यांचा अभ्यास केला. देशभरांत संवेदक मनोरे, संवेदक असलेले फुगे, सोडार (सॉनिक डिटेक्शन अँड रेन्जिंग) आदी उपकरणे वापरून निरीक्षणे गोळा केली. त्यांनी जवळजवळ वीस संस्थांमधील संशोधकांबरोबर कार्य केले. यात हवामानखाते, वायुसेना, सागरकन्या, इन्सॅट उपग्रह या सर्वांकडून मिळवलेली आकडेवारी होती. त्यांनी प्रयोगशाळेत ढग निर्माण करून त्यांचा अभ्यास केला. सौरडागांचे चक्र आणि मौसमी पावसाच्या अनोन्य संबंधावर संशोधन केले.
त्यांच्या द्रायु गतिकी आणि अंतरीक्ष अभियांत्रिकीमधील संशोधनामध्ये वातावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कित्येक मूलभूत प्रश्नांचा समावेश होता. नॅशनल एअरोनॉटिकल लँबोरेटरी (एन. ए. एल) मध्ये असतांना लाईट काँबॅट एअरक्राफ्टची रचना करण्याचा प्रकल्प हाती घेतला. भारतातील अनेक लहान ठिकाणे आता विमानमार्गाने जोडली जात आहे. मोठी जेट विमाने ही ५०० कि.मी.पेक्षा कमी अंतरासाठी फारच इंधन वापरतात. त्यापेक्षा टर्बोप्रॉप आणि विशिष्ट आकाराचे पंख वापरुन इंधन बचत कशी करता येईल यावर त्यांनी संशोधन केले व त्यानुसार विमान तंत्रज्ञान एन.ए.एल.मध्ये विकसीत होत आहे.
मूलभूत संशोधन आणि विकास यांत उत्तम कार्य करतांना त्यांनी अनेक संस्थांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. पीएच्.डी. करून ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये विमान अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक झाले. तेथे ते १९९९ पर्यंत कार्यरत होते. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजचे निर्देशक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये इस्रो के. आर. रामनाथन विशेष प्राध्यापक, जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च (जे.एन.सी.ए.एस.आर.) संस्थेचे पदाधिकारी आणि डी.एस.टी. इयर ऑफ सायन्स चेअर प्रोफेसर होते. या शिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजचे निदेशक, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादमध्ये प्रॅट-व्हीटनी चेअर ही पदे त्यांनी भूषविली होती. ते रॉयल सोसायटी ऑफ लंडन व अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनोटीक्स अँड ॲस्ट्रॉनॉटीक्सचे फेलो होते. देश-विदेशच्या कित्येक विद्यापीठांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक होते. भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधींच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळामध्ये होते. त्यांना शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार मिळाला आणि भारत सरकारचा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला. त्यांनी दोनशेच्या वर शोधनिबंध आणि १५ पुस्तके लिहली आहेत. वयाच्या ८६-८७ वर्षांपर्यंत ते विज्ञानप्रसाराचे कार्य करत होते.
संदर्भ :
- https://science.thewire.in/the-sciences/roddam-narasimha-nal-nias-jncasr-remembrance/
- https://www.youtube.com/watch?v=DbabRtGOico
- https://theprint.in/science/aerospace-scientist-roddam-narasimha-an-authority-on-fluid-dynamics-dies-at-87/567020/
- https://www.youtube.com/watch?v=AMJFmFMHGrQ
- Satish Dhawan – Scientist, Teacher, Leader: An Interview with Roddam Narasimha
- RSTV Eureka – Prof. Roddam Narasimha, Eminent Scientist
समीक्षक : सुधीर पानसे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.