प्रदर्शन खिडकी किंवा दुकान खिडकी ही दुकानातील अशी एक खिडकी की, जी ग्राहकांना दुकानामध्ये आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी आकृतिबंध किंवा अभिकल्प (डिझाइन) केली जाते. या शब्दाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात दुकानाच्या समोरच्या फलकावरील मोठ्या खिडक्यांशी संबंधित सजावटीसाठी करण्यात आला.
अठराव्या शतकाच्या अखेरीस लंडनमधील दुकानात प्रथम प्रदर्शन चौकटी बसविलेल्या होत्या. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची सजावट केली जात असे. किरकोळ विक्रेता फ्रान्सिस प्लेस यांनी त्यांच्या टेबलाच्या आस्थापनावर नवीन किरकोळ पद्धतीने प्रयोग केला. त्यांनी काचेच्या मोठ्या खिडक्यांसह शॉप-फ्रंट बांधले होते. या शॉप-फ्रंटद्वारे किंवा खिडकीतून अधिक ग्राहकांना आकर्षित करून अधिक माल विकण्याचा हा प्रयत्न केला जात. सामान्यत: वेषभूषा केलेल्या पुतळ्यांसह साठा खिडकीमध्ये (स्टोअर विंडो) असलेला विक्रीचा माल गवाक्ष प्रसाधन म्हणून ओळखला जातो. ज्याचा वापर स्वत: प्रदर्शनात असलेल्या गोष्टींचे वर्णन करण्यासाठी केला जातो.
गवाक्ष प्रसाधन हे ताळेबंद सजावट म्हणूनही ओळखले जाते. कंपनी किंवा व्यवसाय संस्था ही तिच्या आर्थिक परिस्थितीबाबत दिखावा करताना आर्थिक परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक चांगली दाखविण्याचा प्रयत्न करीत असते. व्यवसाय संस्थेच्या ताळेबंदात फेरफार करून आर्थिक परिस्थिती बळकट दाखविली जाते. त्यामध्ये व्यवस्थापक व्यवसाय संस्थेच्या मालमत्तेचे व देण्याचे खरे रूप लपवितात. मालमत्तेच्या किंमती वाढविल्या जातात, तर देणी कमी दर्शविली जातात. थोडक्यात, व्यावसायिक खात्यापेक्षा खोटी खाती एकदम खरी आहे, असा आभास निर्माण केला जातो, म्हणून त्यास गवाक्ष प्रसाधन असे म्हणतात. व्यवसाय संस्थेचे वरिष्ठ दर्जाचे व्यवस्थापक, संचालक आणि लिपिक यांच्या संगनमताने व्यावसायिक चित्र खोटे दाखविले जाते.
उद्देश :
- नफ्याचे प्रमाण जास्त दाखवून व्यवस्थापकीय लोकांना जादा मोबदला मिळविता येतो.
- व्यवसाय संस्थेच्या भाग विक्रीच्या वेळी अधिकाधिक भागधारकांना व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गवाक्ष प्रसाधन केले जाते.
- बँका व इतर वित्तीय संस्थांनी जास्तीत जास्त कर्ज द्यावे, यासाठी गवाक्ष प्रसाधन केले जाते.
- माल खरेदी करताना विक्रेत्यांकडून शिथिल अटीवर माल मिळावा म्हणून गवाक्ष प्रसाधन करतात.
- नवीन भागधारकांचा समावेश करून घेताना किंवा व्यवसाय संस्थेचे दुसऱ्या व्यवसाय संस्थेत विलीनीकरण करताना व्यवसाय संस्थेला नावलौकिकाचा जादा मोबदला मिळावा म्हणून व्यवसाय संस्थेची आर्थिक स्थिती आहे त्यापेक्षा अधिक दाखविली जाते.
कर्तव्य : गवाक्ष प्रसाधनांच्या संबंधी हिशोब तपासनिसाची काही कर्तव्य पुढील प्रमाणे :
- कंपनी कायदा १९५६ नुसार गवाक्ष प्रसाधनाच्या बाबतीत अहवाल देणे आवश्यक आहे. गवाक्ष प्रसाधनावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
- व्यवसाय संस्थेच्या विविध मार्गाने जे उत्पन्न मिळते, त्याच्या योग्य नोंदी ठेवल्या आहेत का, याची खात्री करावी.
- मालमत्ता आणि देयता यांची सत्यता पडताळून पाहणे आणि प्रत्यक्षात असणारी देयता संभाव्य देयता म्हणून दाखविली नाही ना, याची खात्री करावी. देयतेसाठी योग्य तरतूद करणे आवश्यक आहे.
- व्यवसाय संस्थेतील शिल्लक साठ्यांचे योग्य पद्धतीने मूल्यांकन केले आहे का, हे तपासणे. जर मूल्यांकन पद्धत बदलली असेल, तर त्याचा परिणाम स्वतंत्र दाखविला आहे का, हे तपासणे.
- व्यवसाय संस्थेने हिशेब पद्धतीत कोणतेही बदल केले नाहीत, याची खात्री करावी. तसेच व्यवसाय संस्थेने असणारी देयता हिशेब पुस्तकातून नष्ट केलेली नाही, हे पाहणे आवश्यक आहे.
संदर्भ :
- भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अर्थशास्त्र परिभाषा कोश, मुंबई, १९८७.
- The American Heritage Dictionary of English Language, Boston, 2016.
समीक्षक : श्रीराम जोशी