इंद्र बीर सिंह : (८ जुलै १९४३ – ११ फेब्रुवारी २०२१) इंद्र बीर सिंह यांचा जन्म लखनौ येथे झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही लखनौमध्येच झाले. लखनौ विद्यापीठातून भूशास्त्र विषयात ते एम्. एस्सी. झाले. पुढे जर्मनीतील श्टुटगार्ट तंत्रज्ञान विद्यापीठातून त्यांनी हार्त्स पर्वतातील पाषाणांवर संशोधन करून पीएच्.डी. प्राप्त केली. त्यानंतर एक वर्ष नॉर्वेमधील ऑस्लो विद्यापीठात टॉमस बार्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आग्नेय नॉर्वेमधील टेलेमार्क प्रदेशातील पुराजीवकल्पात निर्माण झालेल्या क्वार्ट्झाइट पाषाणांवर डॉक्टरेटोत्तर संशोधन केले. त्यावर आधारित त्यांनी जे शोधनिबंध लिहिले, त्यांची गणना उत्कृष्ट गुणवत्तेच्या शोधनिबंधांमध्ये केली गेली.

त्यांच्या दर्जेदार संशोधनाने जर्मनीमधील विल्हेल्मशाफेन येथील जेन्केन्बेर्ग सागरीविज्ञान संस्थेतील एच्. ई. राइनिक प्रभावित झाले. त्यांनी सिंह यांना आपल्या संशोधनगटात काम करण्यासाठी सहयोगी संशोधक म्हणून निमंत्रित केले. तेथे भरती-ओहोटीमुळे वाळूच्या कणांचे स्तरण कशा पद्धतीने होते आणि विविध अवसादी संरचना निर्माण होण्यासाठी स्तरणप्रक्रियेतील कोणते घटक कारणीभूत असतात याचा शोध घेण्यासाठी जर्मनीच्या उत्तर किनार्‍यावर निरीक्षणे करण्यासाठी त्यांनी अनेक दिवस जिवापाड मेहेनत घेतली आणि अवसादशास्त्राच्या या महत्त्वाच्या पैलूवर प्रभुत्व मिळविले.

एच्. ई. राइनिक आणि सिंह यांनी लिहिलेले डिपॉजिशनल सेडिमेंटरी एन्व्हॉयरॉनमेंट् हे पुस्तक प्रकाशित झाले. ते अवसादशास्त्राच्या अभ्यासकांच्या पसंतीस उतरले. पुढे या पुस्तकाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्याही आवृत्तीचे तितकेच स्वागत झाले. ही आवृत्ती चिनी आणि रशियन भाषांमधे भाषांतरितही झाली.

ते भारतात परतले आणि लखनौ विद्यापीठामधे भूशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. भारतातील काही शैलसमूहांचे त्यांनी प्रस्तरशास्त्रीय पुनर्विलोकन केले. मध्यहिमालयातील काही शैलसमूह पुराजीवकल्पात आणि मध्यजीवकल्पात निर्माण झाले होते या प्रस्थापित कल्पनेला छेद देत ते त्याहूनही पुरातन, म्हणजे कॅम्ब्रिअनपूर्व काळात निर्माण झाले होते असे त्यांनी सिद्ध केले. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील गंगा नदीच्या काठी गाळाचे स्तरण कशा पद्धतीने झाले आणि तेथील भूरूपे कशी विकसित झाली असावीत यासंबंधीच्या सिद्धांतांना त्यांनी नवा आयाम दिला.

काश्मीरमधील प्लाइस्टोसीन कालखंडात निर्माण झालेला कारेवा शैलसमूह, भारतीय द्वीपकल्पातील क्रिटेशिअस कालखंडात निर्माण झालेला लॅमेटा शैलसमूह, नर्मदा नदीच्या उत्तरेकडे प्रपुराजीवकल्पात निर्माण झालेला विंध्यन शैलमहासंघ, तसेच कच्छमधील भुज शैलसमूह या सर्व शैलसमूहातील खडकांचे स्तरण कसे झाले असावे यासंबंधीच्या माहितीत त्यांनी खूप महत्त्वाची भर घातली.

पुरातत्त्वविद्येतही त्यांचे योगदान आहे. उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात मानवाने सुमारे साडेदहा हजार वर्षांपूर्वी भातशेती करायला सुरुवात केली होती हे त्यांनी शोधून काढले. त्या सुमारास मानव कुंभारकाम करायला शिकला होता आणि त्याने हत्ती पाळायला सुरुवात केली होती असेही निष्कर्ष त्यांना त्यांच्या संशोधनातून मिळाले. आंध्र विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे निवॄत्त प्राध्यापक ए. एस. आर. स्वामी यांच्यासमवेत त्यांनी डेल्टा सेडिमेंटेशन: ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले.

केंद्र शासनाच्या खनिकर्म मंत्रालयाने २०१४ मध्ये त्यांच्या भूशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय पारितोषिक दिले. २०२० मध्ये लखनौ विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव साजरा झाला, त्या समारंभात विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीतील योगदानासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांना विशेष प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले.

त्यांचे लखनौ येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Banerjee, D. M. (2021). Indra Bir Singh. Current Science, vol.120, Pt. 4: pp.728-729.

समीक्षक : विद्याधर बोरकर