जानकी अम्मल : (४ नोव्हेंबर १८९७ – ४ फेब्रुवारी १९८४) जानकी अम्मल एदावलेथ कक्कत यांचा जन्म तेल्लीचरी या केरळमधील गावी झाला. त्याकाळी मुली शक्यतो कलाशाखेचे अभ्यासक्रम निवडत, मात्र जानकी यांना विज्ञानशाखेत रूची होती. त्यांचे वडील विविध वनस्पती लावत. त्यांच्या वाढीच्या सूक्ष्म नोंदी ठेवत. जानकी यांच्याकडे वडलांकडून निसर्गविज्ञानाचा वारसा आला.
तेल्लीचेरी येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी त्या चेन्नईला आल्या. प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्रातील पदवी घेतली. प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील शिक्षकांमुळे त्यांना जनुकशास्त्राची आवड निर्माण झाली. त्यांनी चेन्नईच्या विमेन्स कॉलेजमध्ये अध्यापनास सुरुवात केली. त्याचवेळी परदेशी जाण्यासाठी त्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत होत्या. त्यांना बार्बोर शिष्यवृत्ती मिळाली. त्याआधारे जानकी अमेरिकेला गेल्या. मिशिगन विद्यापीठात एम.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पदवी प्राप्त केली. नंतर त्या भारतात परतल्या आणि विमेन्स कॉलेजमध्ये पुन्हा अध्यापनास सुरूवात केली. थोडयाच दिवसात शिष्यवृत्तीच्या आधारे पुन्हा त्या मिशिगन विद्यापीठात आल्या. डी.एस्सी. अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. अमेरिकेतून डी.एस्सी. पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. डी.एस्सी. पदवी मिळताच त्या भारतात परतल्या. भारतातील त्या पहिल्या महिला वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत.
त्रिवेंद्रमच्या महाराजा कॉलेज ऑफ सायन्स येथे त्या वनस्पतीशास्त्र शिकवू लागल्या. दोन वर्ष त्यांनी अध्यापन केले. पंडित मदन मोहन मालविय यांच्या प्रेरणेने कोईमतूर येथे सुरू झालेल्या साखर संशोधन केंद्रात त्या प्रमुख जनुकशास्त्रज्ञ म्हणून रूजू झाल्या. जानकी यांच्यावर गोड जातीच्या ऊसाच्या वाणाच्या निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली. विविध वनस्पतींच्या जनुकांचा जानकी यांनी अभ्यास केला. भारतीय ऊसाच्या वाणांचा विविध वनस्पतींशी संकर घडवला. यासाठी ज्वारी, मका, बांबू यांचा प्रामुख्याने वापर केला. यातून केंद्राचे संचालक वेंकटरमण यांच्या पसंतीला सहा वाण उतरले. इंपेरेटा वनस्पतीशी संकर घडवून त्यांनी एक वाण बनवला. हा वाण जास्त गोड आणि त्या काळी जवळपास दुप्पट उत्पादन देणारा होता. शेतकऱ्यांना हा वाण खूपच फायदेशीर ठरला. त्यामुळे ऊसाचे उत्पादन वाढले. स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतातील ऊसाची आयात थांबली.
या संस्थेत जानकी एकमेव महिला होत्या. जानकी यांच्या हाताखाली काम करणे अन्य संशोधकांना अपमान वाटत असे. यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जानकी यांनी केंद्र सोडले. मग त्या इंग्लंडला गेल्या. तेथे पाच वर्षे त्यांनी विविध वनस्पतींचा जनुकीय अभ्यास केला. पुढील सहा वर्षे त्यांनी रॉयल फलोद्यान सोसायटीमध्ये कार्य केले. त्यांनी सी. डी. डार्लिंग्टन यांच्यासह दि क्रोमोसोम ॲटलास ऑफ कल्टीवेटेड प्लॅंटस् हा ग्रंथ लिहिला. त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू होते. त्या कालखंडात त्यांनी बॅटलस्टोन टेकड्यांवर चाफ्याच्या जातीतील मॅग्नोलिया झाडे लावली. ही झाडे गुलाबी रंगाच्या फुलानी फुलतात. या फुलांच्या टेकड्या आजही प्रवाशांचे प्रमुख आकर्षण आहेत.
भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी जानकी यांची भेट घेतली. त्यांना भारतात परतण्याची विनंती केली. जानकी भारतात परतल्या. भारत सरकारने त्यांना डायरेक्टर जनरल ऑफ बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या पदावर नियुक्त केले. त्यांनी लखनौ आणि जम्मू येथील सुप्रसिद्ध बॉटनिकल गार्डनची निर्मिती केली. भारतातील विविध भागातील वनस्पतींचे नकाशे तयार केले. त्यानंतर अलाहाबादच्या सेंट्रल बॉटनिकल गार्डनची धुरा सांभाळली. केरळमधील डोंगरमाथ्यावरील विविध वनस्पतींचा त्यांनी अभ्यास आणि संग्रह केला. शेवटच्या टप्प्यात त्यांनी भाभा अणुशक्ती केंद्रात कार्य केले. अन्न तंत्रज्ञान विभागात अन्नप्रक्रिया आणि धान्य टिकवण्यासाठी त्यांनी प्रयोग केले.
वयाच्या ७३ व्या वर्षी त्या चेन्नईला परतल्या. चेन्नई येथील विद्यापीठात सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीज इन बॉटनी ही संस्था आहे. या संस्थेत मानद संशोधक म्हणून संशोधन सुरू केले. जानकी यांचा पहिला शोधनिबंध १९३१मध्ये प्रसिद्ध झाला होता आणि त्यांचा शेवटचा शोधनिबंध १९८४ मध्ये प्रसिद्ध झाला. जानकी यांना सी. व्ही. रामन यांनी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यत्व दिले. त्यांच्या या योगदानासाठी मिशिगन विद्यापीठाने एलएलडी ही मानद पदवी प्रदान केली. जानकी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने त्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला आहे.
त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांना निरोगी आयुष्य लाभले. त्या आयुष्यभर अविवाहीत राहिल्या. भारतीय ऊसाला गोडवा देणाऱ्या या वनस्पतीशास्त्रज्ञ संशोधिकेचे वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात ऊस पिकत होता. मात्र त्याला गोडी नव्हती. त्यामुळे भारतात ऊस आणि साखर दोन्ही आयात केले जात असे. त्यांच्या प्रयत्नाने गोड ऊसाची निर्मिती झाली म्हणून ऊसाला गोडवा देणारी अम्मा अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
संदर्भ :
- https://www.smithsonianmag.com/science-nature/pioneering-female-botanist-who-sweetened-nation-and-saved-valley-180972765/
- https://www.thebetterindia.com/75174/janaki-ammal-botanist-sugarcane-magnolia/
- https://iiim.res.in/herbarium/edavaleth-kakkat-janaki-ammal.him
समीक्षक : मोहन मद्वाण्णा