एका उत्पादन घटकाचा पुरवठा वाढल्यामुळे तो विशिष्ट उत्पादनाचा घटक ज्या वस्तूच्या उत्पादनात घनतेने वापरला जातो, त्या वस्तूचे उत्पादन वाढते आणि दुसऱ्या वस्तूचे उत्पादन घटते हे दर्शविणारे एक प्रमेय. हेक्चर ओहलिन यांनी मांडलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताच्या संदर्भात टी. एम. रिब्झ्यान्स्कि यांनी १९५५ मध्ये आपले प्रमेय प्रसिद्ध केले. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दोन देश – दोन वस्तू – दोन घटक (भांडवल आणि श्रम) प्रतिमानाच्या चौकटीत पूर्ण रोजगाराच्या स्थितीत जर एका उत्पादन घटकाचा पुरवठा स्थिर राहून दुसऱ्या उत्पादन घटकाचा पुरवठा वाढला, तर वस्तूंच्या किमती स्थिर असताना ज्या घटकाचा पुरवठा वाढला आहे, तो घटक ज्या वस्तूच्या उत्पादनात तीव्रतेने वापरला जातो, त्याचे उत्पादन वाढते आणि दुसऱ्या वस्तूचे उत्पादन कमी होते, असे रिब्झ्यान्स्कि यांनी प्रतिपादन केले आहे.

गृहिते :

  • आंतरराष्ट्रीय व्यापार दोन देशात होत आहे.
  • व्यापारात दोन वस्तूंची आयात-निर्यात आहे.
  • भांडवल आणि श्रम हे उत्पादनाचे दोन घटक आहेत.
  • दोन्ही देशांत पूर्ण रोजगाराची स्थिती आहे (म्हणजे भांडवल आणि श्रमाच्या सर्व उपलब्ध मात्रा उत्पादनाच्या प्रक्रीयेत गुंतलेल्या आहेत).
  • वस्तूंच्या किमती स्थिर आहेत.
  • व्यापारात अपूर्ण विशेषीकरण आहे.
  • वस्तूंच्या घटक तीव्रता स्थिर आहेत.
  • वरील स्थितीत भांडवल आणि श्रम यांपैकी एका उत्पादन घटकाचा पुरवठा वाढतो.

पेटिका आकृती उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या आणि श्रमाच्या मात्रा दर्शविते (दोनपैकी एका). उत्पादन घटकाच्या पुरवठ्यात वाढ होण्यापूर्वी O B एवढ्या भांडवलाच्या मात्रा, तर O A एवढ्या श्रमाच्या मात्रा उपलब्ध होत्या. P हा उत्पादनाचा बिंदू होता आणि O P O’ हा करार वक्र होता (करार वक्र म्हणजे असा वक्र की, जो पेटिका आकृतीतील S1m आणि S1x या वस्तूंच्या समउत्पादन वक्राच्या स्पर्श बिंदूना जोडले असता प्राप्त होतो. करार वक्रावरील सर्व बिंदू उत्पादन आणि आदानांचे कार्यक्षम संयोग दर्शवितात). किरण O P हा निर्यात वस्तूची, तर किरण O’ P हा आयात स्पर्धक वस्तूची घटक तीव्रता दाखवितो. आकृतीत दर्शविल्यानुसार भांडवलाच्या मात्रांचा पुरवठा स्थिर राहून श्रमाचा पुरवठा मात्र A A’ इतका वाढल्यानंतर नवीन पेटिका आकृती O A’ O” अशी प्राप्त होते. नव्या पेटिका आकृतीती O P’ O” B हा करार वक्र आहे आणि उत्पादनाचा नवा बिंदू हा P’ हा आहे.

रिब्झ्यान्स्कि प्रमेयाच्या गृहितानुसार निर्यात वस्तू S1x आणि आयात स्पर्धेक वस्तू S1m च्या घटक घनता बदलत नाहीत. त्यामुळे पेटिका आकृती O A’O” B मध्ये O”  P’ हा किरण O’ P ला समांतर काढला आहे, तसेच O P हा किरण जिथे O” P’ या किरणाला छेदून जातो, तो उत्पादनाचा नवा बिंदू P’ हा आहे. P’ बिंदूपाशी श्रमप्रधान असलेल्या S1x या निर्यात वस्तूचे उत्पादन वाढलेले दिसते आणि आयात स्पर्धक असलेल्या S1m या भांडवलप्रधान वस्तूचे उत्पादन कमी झालेले दिसते.

वस्तूंच्या किमती स्थिर असल्याचे गृहित धरल्यामुळे उत्पादन घटकांच्या किमती स्थिर असल्याचे ध्वनित होते. तसेच रिब्झ्यान्सिक प्रमेयाच्या गृहितानुसार श्रम आणि भांडवलाचे दोन्ही वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक गुणोत्तरही स्थिर राखावे लागते; परंतु दोनपैकी श्रम या उत्पादन घटकाचा पुरवठा वाढला असताना श्रम भांडवलाचे गुणोत्तर स्थिर राखण्यासाठी उत्पादन घटकांचे दोन्ही वस्तूंच्या उत्पादनात पुनर्वाटप करावे लागेल.

श्रमाचा पुरवठा वाढल्यामुळे वाढीव श्रमाची एकके श्रमप्रधान S1x या निर्यात वस्तूच्या उत्पादनात वापरवी लागतील. श्रम-भांडवल गुणोत्तर स्थिर ठेवण्यासाठी भांडवल प्रधान S1m या आयात स्पर्धक वस्तूच्या उत्पादनातील भांडवलाच्या काही मात्रा काढून घेऊन त्या S1x या श्रमप्रधान निर्यात वस्तूच्या उत्पादनात वापराव्या लागतील. त्यामुळे श्रम प्रधान या निर्यात वस्तूचे उत्पादन वाढेल आणि भांडवल प्रधान S1x या आयात स्पर्धक वस्तूचे उत्पादन घटेल. ही प्रक्रिया अशीच चालू राहिल्यास देश क्र. १ एकाच वस्तूच्या उत्पादनात पूर्ण विशेषीकरण करेल.

रिब्झ्यान्स्कि प्रमेयाच्या मदतीने भांडवली गुंतवणूक आणि श्रमिकांचे आंतरराष्ट्रीय स्थलांतरण यांचे एखाद्या देशाच्या उत्पादनावरील आणि आयात-निर्यातींवरील परिणामांचे विश्लेषण ओहलिन प्रतिमानाच्या चौकटीत करता येते.

समीक्षक : आर. एस. देशपांडे