लॉफलर, फ्रीडरीश ऑगस्ट योहान्स : (२४ जून १८५२ – ९ एप्रिल १९१५) जर्मन शास्त्रज्ञ फ्रीडरीश ऑगस्ट योहान्स लॉफलर यांचा जन्म येथे झाला. त्यांनी एमडी पदवी बर्लिन युनिव्हर्सिटीमधून मिळवली. शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख यांच्या हाताखाली त्यांनी पाच वर्षे काम केले. नंतर ते फ्रीडरीश विलहॆल्म इन्स्टिट्यूट येथे स्टाफ फिजिशियन म्हणून रुजू झाले आणि चार वर्षातच ग्रीझवाल्ड युनिव्हर्सिटीत प्रोफेसर झाले.
मायक्रोस्कोपमधून सूक्ष्मजंतू स्पष्ट दिसावेत यासाठी त्यांनी विविध रंगछटा वापरायच्या पद्धती विकसित केल्या. ही एक बहुमोल कामगिरी ठरली. तत्पूर्वी रॉबर्ट कॉख यांच्याबरोबर सूक्ष्मजंतूंमुळे रोग कसा होतो याचे काही सिद्धांत त्यांनी मांडले होते.
मनुष्यांना डिफ्थेरिया म्हणजे घटसर्प हा रोग सूक्ष्मजंतुंमुळे कसा होतो तसेच दुभत्या जनावरांना फुट एन्ड माऊथ डिझीझ हा रोग जीवाणूंमुळे कसा होतो, ह्यांची कारणे लॉफलर यांनीच शोधली. घटसर्प जंतूंच्या शोधामुळे पुढे त्यातील विष म्हणजे टॉक्सिनवरील प्रतिरोधक शोधण्यास मदत झाली. ह्या रोगाचे जंतु कॉरनीबॅक्टिरियम डिफ्थेरिये (Corynebacterium diphtheriae) ह्यांचे प्रजनन फक्त पेशी विरहित रक्तातच म्हणजे सिरममध्येच करू शकतो हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या नावानेच आजही या जंतूच्या वाढीसाठी ‘लॉफलर सिरम माध्यम’ वापरले जाते.
जर्मनातील फ्रीडरीश लॉफलर इन्स्टिट्यूट (Friedrich Loeffler Institute) ही त्यांच्या नावाने सुरू करून त्यांना गौरविले गेले. येथे मुख्यत्वे प्राण्यांना होणार्या रोगांवर संशोधन केले जाते.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Friedrich-August-Johannes-Loffler
- http://www.mayoclinicproceedings.org/article/S0025-6196(15)00850-2/abstra
समीक्षक : रंजन गर्गे