गॉड्सबी, पीटर : (१९५०) पीटर गॉड्सबी यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला. गॉड्सबी यांना लहान वयापासून अर्थशास्त्र आणि राजकारणशास्त्रात रुची होती, परंतु गणिताच्या शिक्षिका असणाऱ्या आपल्या आईसोबत वाद झाल्यानंतर गॉड्सबी यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यांनी न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण प्राप्त केले. न्यूरॉलॉजीचे प्रशिक्षण जेम्स डब्ल्यू. लान्स यांच्या देखरेखीखाली सिडनी येथे प्राप्त केले. त्यानंतर न्यूयॉर्क येथे डॉन रीस, पॅरिस येथे जॅक्स सेंलझ आणि लंडनला डेविड मार्सडेन व इयान मॅकडोनाल्ड यांच्यासोबत काम करून व प्रशिक्षण घेऊन ते सिडनीच्या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात प्रिन्स वेल्स हॉस्पिटलमध्ये न्यूरॉलॉजीचे सल्लागार म्हणून परतले. नंतर त्यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून बढती झाली. पुढे लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये न्यूरॉलॉजी विभागात वेलकम वरिष्ठ संशोधन सहकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. नॅशनल हॉस्पिटल फॉर न्यूरॉलॉजी अँड न्यूरोसर्जरी येथे ते न्यूरॉलॉजीचे प्राध्यापक आणि सल्लागार होते. त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र मायग्रेन, क्लस्टर हेडेकसारख्या डोकेदुखीच्या मूलभूत कारणांचा शोध लावणे हे होते. सध्या ते लंडनच्या हॉस्पिटल फॉर सिक चिल्ड्रेनमध्ये न्यूरॉलॉजीचे सन्माननीय सल्लागार आहेत. ते एनआयएचआर-वेलकम ट्रस्ट क्लिनिकल रिसर्च फॅसिलिटी याचे निर्देशक नेमले गेले.
ब्रेन पुरस्कारसाठी निवड झालेल्या चार वैज्ञानिकांपैकी ते एक आहेत. मज्जातंतू विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकांचा या पुरस्काराद्वारे सन्मान केला जातो. ब्रेन पुरस्कार लुंडबेक संस्थेतर्फे दरवर्षी मज्जातंतू विज्ञान क्षेत्रात मूलभूत किंवा उपयोजित शाखात नेत्रदीपक संशोधन करणाऱ्यांना दिला जाणारा जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे.
हा पुरस्कार गॉड्सबी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना मायग्रेन किंवा अर्धशिशी या आजाराचे कारण शोधून काढल्याबद्दल दिला जात आहे. यांच्या शोधकार्यामुळे नवीन परिणामकारक उपचार शोधण्यास मदत मिळाली आहे. त्यामुळे मायग्रेनने त्रासलेल्या रुग्णांना नवीन आशेचा किरण दिसत आहे.
अमेरिकेत ३.८ कोटी मायग्रेन पीडित आहेत तर जगभरात एक अब्जापेक्षा जास्त लोक पीडित आहेत. हा आजार जरी खूप जुना असला तरीही त्याची कारणे आणि योग्य उपचार यांचे आतापर्यंत पूर्ण आकलन झालेले नव्हते.
आपल्या संशोधनामध्ये गॉड्सबी यांनी कॅल्सिटोनीन जीन रिलेटेड पेप्टाईड किंवा सीजीआरपी मायग्रेनसाठी कारणीभूत आहे असे ओळखले. स्वीडनच्या लुंड विद्यापीठातील लार्स एड्विनसन यांच्यासोबत काम करताना गॉड्सबी यांनी हे सिद्ध केले, की मायग्रेनच्या झटक्यामध्ये चेहऱ्याची संवेदना ओळखणाऱ्या ट्रायजेमिनल नसेमधून सीजीआरपी स्रवला जातो. नंतर असेही दिसून आले, की सीजीआरपी इंजेक्शन दिल्यामुळे एखाद्यामध्ये मायग्रेन सुरू होऊ शकतो. या शोधांद्वारे हे सिद्ध झाले, की सीजीआरपी डोकेदुखीशी फक्त संलग्न तत्त्व नाही तर कारणीभूत तत्त्व आहे.
पीटर गॉड्सबी किंग्स कॉलेज, लंडन आणि सॅनफ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या न्यूरॉलॉजी विभागामध्ये न्यूरॉलॉजीचे प्राध्यापक आहेत.
संदर्भ :
समीक्षक : अनिल गांधी