एखाद्या उद्योग-व्यवसायाचे नेहमीच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम किंवा निधी म्हणजे खेळते भांडवल होय. यास चालू किंवा कार्यकारी भांडवल असेही म्हणतात. खेळते भांडवल हे मानवाने उत्पादित केलेले उत्पादनाचे साधन किंवा भविष्यातील उत्पादनात वाढ व्हावी म्हणून निर्माण केलेली उत्पादन सामग्री होय. साधारणपणे वस्तूची निर्मिती करण्याकरिता भौतिक भांडवल (उदा., यंत्रसामग्री, जमीन, इमारत इत्यादी.) आणि मानवी भांडवल (उदा., सुशिक्षित, प्रशिक्षित व निरोगी मनुष्यबळ इत्यादी.) यांची आवश्यकता असते. उद्योगामध्ये प्रथम भांडवल विनियोग करावा लागतो. त्यासाठी पैशाच्या स्वरूपात भांडवल लागते. हा पैसा ज्यांनी बचत करून ठेवलेला असतो, त्यांच्याकडून उत्पादनासाठी तो स्वीकारला जातो. म्हणूनच काही व्यक्ती या गुंतवणूकदाराची, तर काही व्यक्ती कर्जदाराची भूमिका पार पाडित असतात.
व्याख्या : खेळते भांडवलाच्या व्याख्येसंदर्भात तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही.
जेर्स्टेंबर्ग यांच्या मते, ‘व्यवसायात किंवा धंद्यात खेळत्या स्वरूपात असणाऱ्या व रूपांतरित होणाऱ्या (उदा., पक्क्या मालाचे रोख रकमेत रूपांतर, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर, उधारीच्या रकमेचे हुंडीत रूपांतर व हुंडीचे रोख रकमेत रूपांतर) क्रियेला खेळते भांडवल असे म्हणतात’.
लिंकन डोरीस स्टीव्हनस आणि सेलीअर्स यांच्या मते, ‘व्यवसायातील चालू मालमत्ता व चालू देणी यांमधील फरक म्हणजे खेळते भांडवल होय’.
उद्योगधंदा किंवा व्यवसाय वृद्धी व विकास हा सर्वस्वीपणे भांडवलावरच अवलंबून असतो. उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी साधारणत: स्थिर भांडवल (फिक्स कॅपिटल) आणि खेळते भांडवल या दोन प्रकारच्या भांडवलांची आवश्यकता असते. कोणत्याही प्रकारच्या उद्योग-व्यवसायाची उभारणी करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीची खरेदी, इमारत उभारणी, यंत्रसामग्री खरेदी इत्यादींसाठी मोठा खर्च करावा लागतो. याशिवाय उद्योग-व्यवसायाची वृद्धी व विकास होत असताना नवनवीन यंत्रसामग्री, सुटे भाग इत्यादींसाठीही खर्च करणे आवश्यक असते. या सर्व बाबींच्या खर्चासाठी लागणारे भांडवल हे स्थिर भांडवल या संकल्पनेमध्ये मोडते. या भांडवली खर्चाव्यतिरिक्त उद्योग-व्यवसाय करताना कच्चा माल, मजुरांचे वेतन, जाहिराती व विक्री खर्च इत्यादी बाबींवर खर्च करणे आवश्यक असते. या खर्चासाठी लागणाऱ्या भांडवलालाच खेळते भांडवल म्हणून संबोधले जाते.
व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेले स्थिर भांडवल आणि तो व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी प्रतिदिन लागणारा खर्च म्हणजे खेळते भांडवल होय. या दोन्ही खर्चाची तरतूद झाल्यानंतरच उद्योग-व्यवसायाची उभारणी करणे शक्य असते. अशा प्रकारच्या भांडवलाची उपलब्धता झाली नाही, तर अपूर्ण भांडवलापोटी उद्योग-व्यवसाय उभारण्याचा जर प्रयत्न झालाच, तर तो उद्योग-व्यवसाय भविष्यामध्ये गटांगळ्या खाऊ लागतो. वेळप्रसंगी पुरेशा भांडवलाअभावी तो उद्योग-व्यवसाय बंद पडू शकतो. याचाच अर्थ खेळते भांडवल म्हणजे उत्पादन प्रक्रिया सातत्याने चालू ठेवण्यासाठी लागणारे भांडवल होय.
खेळते भांडवल हे एक असे भांडवल आहे की, जे कोणत्याही उद्योग-व्यवसायाच्या अल्पकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करीत असते. उत्पादित मालाची विक्री होण्यासाठी बराच कालावधी लागतो. कच्च्या मालाची खरेदी झाल्यानंतर त्याचे पक्क्या मालात रूपांतरणासाठी व्यवसायाच्या स्वरूपानुसार कमीअधिक कालावधी लागतो. तसेच पक्क्या मालाची विक्री होऊन रोख रक्कम हातात येईपर्यंत बराच कालावधी जातो. या सर्व अवस्थेत उत्पादन प्रक्रिया व्यवसायात खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते.
कच्चा माल खरेदी करणे, कुशल व अकुशल मजुरांचे वेतन, विविध कर, विद्युत खर्च, दुरध्वनी बील, जाहिराती व प्रसिद्धी, विक्रयोत्तर सेवा, विक्री वाढ, वस्तूंची बांधणी, उधारीची अनुदाने इत्यादी दैनिक खर्च व इतर खर्चांसाठी खेळत्या भांडवलाची नितांत आवश्यकता असते. उत्पादनामध्ये खंड पडू नये म्हणून कच्चा मालाचा साठा करणे, बाजारपेठेत पक्क्या मालाचा तुटवडा होऊ नये म्हणून पक्क्या मालाचा साठा करणे, तसेच प्रत्यक्ष प्रक्रियेत असलेल्या मालाचा साठा करणे आवश्यक असते. या तीनही प्रकारच्या मालसाठ्याची किंमत व उत्पादन खर्च इत्यादींसाठी खेळते भांडवल आवश्यक ठरते.
प्रकार : खेळत्या भांडवलाचे साधारणत: तीन प्रकार पडतात.
(१) नियमित खेळते भांडवल : खेळते भांडवलाच्या साह्याने उत्पादन कार्य सतत चालू ठेवले जाण्याला नियमित भांडवल असे म्हणतात. प्रत्येक उद्योग-व्यवसायामध्ये कामगारांना दिले जाणारे वेतन व मजुरी यांचा समावेश हा नियमित खेळत्या भांडवलामध्ये केला जातो. हे भांडवल अल्पकालीन ऋणाचा उपयोग न करता ते भाग (शेअर) किंवा कर्जरोख्याची बाजारामध्ये विक्री करून उभारले जाते.
(२) हंगामी खेळते भांडवल : हंगामी खेळते भांडवलाचा वापर केवळ काही विशिष्ट हंगामातच केला जातो. विशिष्ट हंगाम आल्यानंतर हंगामी खेळते भांडवलाची आवश्यकता असते आणि हंगाम संपल्यानंतर ही गरज संपुष्टात येत असते.
(३) विशिष्ट प्रसंगातील खेळते भांडवल : काही विशिष्ट कारणासाठी उपयोगात येणाऱ्या भांडवलाला विशिष्ट प्रसंगातील खेळते भांडवल असे म्हटले जाते. एखाद्या वेळी बाजारपेठेत मालाची अचानकपणे मागणी वाढते. अशा वेळी ही मागणी पूर्ण करण्यासाठी कच्चा मालाची खरेदी करणे, विशिष्ट यंत्रसामग्री खरेदी करणे, मजुरी, जाहिरात व प्रसिद्धी यांसाठी अनेकदा खर्च करणे क्रमप्राप्त ठरते. संप, महापूर, आग, भूकंप, अवनती इत्यादी नैसर्गिक आपत्तीप्रसंगी संकट टाळण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर विशिष्ट प्रसंगातील खेळते भांडवलाची आवश्यकता असते.
फायदे :
- उत्पादन कार्य अखंडीतपणे चालू राहण्यासाठी खेळते भांडवल उपयोगी पडते.
- खेळत्या भांडवलाचा तुटवडा झाल्यास उत्पादन कार्यात अडचणी व अडथळे येतात. उद्योजकांना त्यांची कार्ये व्यवस्थित पार पाडणे अशक्य होऊन जाते. त्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध असल्यास उत्पादनाच्या सर्व क्रिया पूर्वानुमानानुसार पूर्ण करता येणे शक्य होते आणि उत्पादन कार्यामध्ये सातत्य व निरंतरता टिकून राहते.
- उद्योगाची बाजारातील किर्ती, प्रतिष्ठा व पत वाढण्यास मदत होते.
- रोखीने मोठ्या प्रमाणावर व्यवहार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सूट मिळवून फायदा उचलणे शक्य होते.
- मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा करणे शक्य होते.
- ग्राहकांच्या आवडी-निवडी, प्रचलित फॅशन बदलल्यास पुरेशा खेळत्या भांडवलाच्या आधाराने त्यावर मात करणे शक्य होते.
- खेळते भांडवल हे गरजेपेक्षा अधिक असल्यास भांडवलाची एकूण उलाढाल कमी होते.
महत्त्व :
- कमीतकमी खेळत्या भांडवलात अधिकाधिक नफा हे कोणत्याही उद्योग-व्यवसायाचे लक्ष असले पाहिजे.
- जसजसे उत्पादन वाढते, तसतसे कच्चा मालाची मागणी वाढते.
- जसजसे मागणी व उत्पादन कमी होते, तसतसे कच्चा माल व त्यासाठी लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची मागणीही कमी होऊ लागते.
- खेळते भांडवल हे गरजेएवढेच असणे आवश्यक असते. ते गरजेपेक्षा कमी अथवा अधिक नसावे.
- कमीतकमी खेळत्या भांडवलामध्ये अधिकाधिक नफा मिळविणे हे उद्दिष्ट साध्य करणे उत्तम व्यावसायिकाचे काम आहे.
एकावेळी किती कच्चा माल लागणार; माल एकदम विकत घ्यावा की, जसा लागले तसा घ्यावा, म्हणजे किमतीचा फायदा उचलणे शक्य होईल; कच्चा मालाची साठवणूक करून ठेवल्यास आपले किती खेळते भांडवल अडकून पडेल इत्यादी गोष्टींचा साधकबाधक विचार करून अधिकाधिक चांगल्या शर्तींवर खेळते भांडवल वापरणे उद्योगास गरजेचे ठरते.
अचानकपणे मागणीमध्ये स्थित्यंतर आल्यास अथवा काही अपरिहार्य कारणांनी खेळत्या भांडवलावर ताण आल्यास बँकांमार्फत आणि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांशी असलेले चांगले संबंध यांचा उपयोग होऊ शकतो. अर्थात खेळत्या भांडवलाच्या बाबतीत काटेकोरपणा ठेवल्यास बँका किंवा पतपुरवठादारांचा विश्वास वाढण्यास मदत होऊ शकते.
खेळते भांडवालाबाबत काही तज्ज्ञांनी पैशाची उधळपट्टी होते, भांडवलाचा बराच भाग निष्क्रीय राहतो, अती भांडवलीकरणाची अवस्था निर्माण होते, अंतर्गत अर्थप्रबंधन पद्धती दुर्बल व दुर्लक्षित राहते अशा प्रकारचे मत व्यक्त केले आहे.
संदर्भ :
- Gupta, R. K.; Gupta, Himanshu, Working Capital Management and Finance, Chennai, 2015.
- Jain, Narendra, Working Capital Management, New Delhi, 2004.
समीक्षक : श्रीनिवास खांदेवाले