कुश, पॉलिकार्प : (२६ जानेवारी १९११ – २० मार्च १९९३) पॉलिकार्प कुश यांचा जन्म त्यावेळच्या जर्मन साम्राज्याच्या ब्लांकेनबुर्ग या गावी झाला. पॉलिकार्प यांच्या जन्मानंतर लवकरच हे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यानंतर अल्पावधीतच ते अमेरिकेचे नागरिक बनले. सुरुवातीच्या शालेय शिक्षणानंतर कुश यांनी ओहायो राज्यातील क्लीव्हलॅंड येथील केस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. प्रारंभीच्या काळात रसायनशास्त्रातच कुश यांना रुची होती. तथापि अभ्यास सुरू केल्यावर कालांतराने त्यांना भौतिकशास्त्राचे आकर्षण वाटू लागले. त्यामुळेच भौतिकशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन कुश यांनी बीएस. ही पदवी संपादन केली. पुढे अर्बना-शॅंपेन या जुळ्या शहरातील इलिनॉय विद्यापीठातून एमएस. ही पदवी मिळविली. याच ठिकाणी एफ. व्हीलर लुमीस यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात करून कुश यांनी पीएच्.डी. पदवी मिळविली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘Molecular Spectra of Caesium and Rubidium’ हा होता. नंतर त्यांनी मिनेसोटा विद्यापीठात फिजिकल रिव्ह्यू या नियतकालिकाचे दीर्घकाळ संपादक असलेल्या भौतिकशास्त्रज्ञ जॉन टॉरेन्स टेट यांच्याबरोबर वस्तुमान पंक्तिदर्शन (mass spectroscopy) या विषयात संशोधन केले.
पुढे कुश यांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात येऊन इझिडोर एझॅक राबी यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुशलाका संस्पंदनासंबंधी (molecular beam resonance) विशेष अभ्यास सुरू केला. दुसर्या जागतिक महायुद्धामुळे तीन वर्षे प्रयोगशाळा तात्पुरती बंद झाली. या काळात कुश यांनी वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन येथे मॅग्नेट्रॉनसारख्या सूक्ष्मतरंग जनित्रासंबंधी (microwave generators) संशोधन आणि विकासकामे केली. तसेच त्यांनी बेल टेलिफोन लॅबोरेटरी येथेही काम केले. या सर्व अनुभवाचा कुश यांना त्यांच्या पुढील प्रायोगिक संशोधनामध्ये खूपच उपयोग झाला.
दुसर्या महायुद्धानंतर कुश कोलंबिया विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून परतले आणि त्यांचे रेणुशलाका संस्पंदनासंबंधी संशोधन पुन्हा सुरू झाले. या सुमारास अनेक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांचे असे म्हणणे होते की इलेक्ट्रॉनचे चुंबकीय आघूर्ण (magnetic moment) तंतोतंत एका बोहर मॅग्नेटॉन (Bohr magneton) एव्हढे आहे. कुश यांनी हेन्री फोले यांच्या मदतीने गॅलियम, इंडियम, सोडियम या मूलद्रव्यांच्या निरनिराळ्या अणुअवस्थांमधील चुंबकीय संस्पंदनासंबंधी प्रयोग करून असे दाखवून दिले की इलेक्ट्रॉनचे चुंबकीय आघूर्ण तंतोतंत एक बोहर मॅग्नेटॉन नसून ते थोडे अधिक आहे. हे सुधारित मूल्य जे. श्विंगर यांनी मांडलेल्या सापेक्षिकीय क्वांटम विद्युतगतिकी सिद्धांताने (relativistic quantum electrodynamics – QED) सुचविलेल्या मूल्याशी जुळणारे होते. अशाप्रकारे प्रयोगाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनच्या चुंबकीय आघूर्णाचे मूल्य अचूकरीत्या ठरविण्यासाठीच कुश यांना १९५५ सालचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यावर्षी पॉलीकार्प कुश व विलिस युजिन लॅम या दोघांना विभागून देण्यात आला होता.
कुश हे चुंबकीय संस्पंदन (magnetic resonance) पद्धतीचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जातात. यातूनच पुढे मुख्यत: रासायनिक पृथक्करणात वापरली जाणारी न्यूक्लीय चुंबकीय संस्पंदन (nuclear magnetic resonance – NMR) पद्धती उदयाला आली. आता वैद्यकीय निदानासाठी सार्वत्रिक वापरली जाणारी चुंबकीय संस्पंदन प्रतिमा (magnetic resonance imaging – MRI) घेण्याची पद्धत हे त्याचेच रूप आहे.
कोलंबिया विद्यापीठात असताना साठच्या दशकात विद्यार्थी आंदोलनामुळे विद्यापीठातील बर्याच प्रशासकीय अधिकार्यांना राजीनामा द्यावा लागला. या कठिण प्रसंगात कुश यांची नेमणूक ज्येष्ठ शैक्षणिक उपाध्यक्ष म्हणून झाली. तरुण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांमध्ये लक्ष घालून कुश यांनी या जबाबदारीच्या काळात उत्तम कामगिरी बजावली. कोलंबिया विद्यापीठात कुश यांच्या मार्गदर्शनाखाली गॉर्डन गोल्ड या विद्यार्थ्याने संशोधन केले. याच गॉर्डन गोल्ड यांना लेझरच्या शोधाचे श्रेय दिले जाते.
कोलंबिया विद्यापीठातील पदाचा राजीनामा देऊन नव्यानेच स्थापन झालेल्या डलास येथील टेक्सास विद्यापीठात कुश यांनी प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. येथेही त्यांनी संशोधानासाठी नवीन रेणुशलाका प्रयोगशाळेची उभारणी केली. कुश यांना मॅक्डर्मॉट प्राध्यापक म्हणून गौरविण्यात आले. तसेच नंतर ते निवृत्त होईपर्यंत रीजंट्स प्राध्यापक या अतिशय मानाच्या पदावर कार्यरत राहिले. कुश अमेरिकन फिजिकल सोसायटीचे मानद सदस्य, अकॅडमी ऑफ सायन्सेसचे, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स, सायन्सचे सदस्य होते. त्यांना केस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने डॉक्टरेट ऑफ सायन्स तसेच ओहायो स्टेट विद्यापीठ आणि इलिनॉय विद्यापीठ यांनीही मानाच्या डॉक्टरेट पदव्या दिल्या.
कुश यांची मातृसंस्था असलेल्या केस वेस्टर्न रिझर्व विद्यापीठातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला कुश हाऊस म्हणून ओळखले जाते. तसेच टेक्सास विद्यापीठात पॉलिकॉर्प कुश या रूपाने कुश यांची आठवण राहिली आहे.
संदर्भ :
- nobelprize.org
- Norman F. Ramsey (National Academy of Sciences)
समीक्षक : सुधीर पानसे