पांडियन, थावमणि जेगाजोथिवल : (१५ जून १९३९) थावमणि जेगाजोथिवल पांडियन यांचा जन्म पालमेडु या मदुराई जिल्ह्यातील तामीळनाडू राज्यातील एका लहानशा गावात झाला. थायगराजर कॉलेज मदुराईमधून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी व चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ही दोन्ही महाविद्यालये मद्रास विद्यापीठाशी संलग्न होती. नंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून पीएच्.डी. मिळवली. त्यांनी जीवशास्त्रातील पोस्टडॉक्टरेट संशोधन जर्मनीतील अन्स्ताल्ट हेल्गोलॅन्ड येथे केले. या संशोधनानंतर नॅचरल सायन्स विभागातील डी.एस्सी. समकक्ष पदवी कील विद्यापीठातून मिळवली. नंतर बेंगलोर विद्यापीठात त्यांनी व्याख्याता, मदुराईच्या कामराज विद्यापीठात रीडर पदापासून सुरुवात केल्यावर निवृत्त होईपर्यंत ते तेथेच काम करीत राहिले. अधूनमधून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि साऊथ कॅरोलिना युनिव्हर्सिर्टी, क्योटो युनिव्हर्सिटी आणि युनेस्को लेक्चरर घेंट युनिव्हर्सिटी येथे ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून जात राहिले.
काही वर्षे सागरी झिंगे आणि मासे यावर संशोधन केल्यानंतर त्यांनी आपले संशोधन मासे प्रजनन क्षेत्राकडे वळवले. कॅट फिश माशांच्या शुक्रपेशी उणे २० अंश सेल्सियस तापमानास २४० दिवस कार्यक्षम रहातात हे त्यांनी दाखवून दिले. ज्याठिकाणी द्रव नायट्रोजन उपलब्ध नाही अशा प्रयोगशाळेसाठी ही मोठी बाब होती. या माशांच्या शुक्रपेशी मादीची अंडी फलित करण्याएवढी कार्यक्षम असतात. साठवलेल्या शुक्रपेशी आणि दुसर्या प्रजातीची फलनक्षम अंडी यापासून फक्त नर माशाची गुणसूत्रे असणारे मासे (androgenetic clone) विकसित केले. या संशोधनातून त्यांनी फक्त YY गुणसूत्र असणारे तिलापिया, बार्ब्स आणि गप्पी नर (supermale) तयार केले. ZZ सुपरफिमेल मॉली नावाचा मादी मासा भारतात तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. जगभरात असे प्रयोग त्यांच्या संशोधनानंतर चालू झाले.
निवृत्तीनंतर इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चमध्ये विशेष वैज्ञानिक म्हणून त्यांनी सहा वर्षे पद भूषवले. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्चमध्ये तीन वर्षे आणि इनसामध्ये चार वर्षे काम केले. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉंलॉजीमध्ये ॲक्वा अँड मरीन बायोटेक्नॉलॉजीमध्ये विशेष पदावर कार्यरत होते. त्यांनी जर्मनीच्या इकॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यागत संशोधक म्हणून काम केले.
वैज्ञानिक संशोधनासाठी भारत सरकारची सर्वोच्च संस्था कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे जैविक विज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला.
पांडियन यांचे सुरुवातीचे कार्य बायोएनर्जेटिक्सच्या क्षेत्रात होते आणि चयापचयावर लक्ष केंद्रित करीत त्यांनी अन्न ऊर्जेच्या वाढीमध्ये परिवर्तनाचा अंदाज लावण्यासाठी एक प्रारूप विकसित केले. त्यांनी स्प्रिंगर या प्रतिष्ठित मरीन बायोलॉजी जर्नलमधील एका लेखात त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित केले आहेत. त्यांच्या संशोधनांची मरीन बायोलॉजीच्या ग्रंथात नोंद घेतलेली आहे .
मत्स्यपालन व जलचरांच्या संवर्धनासाठी एशियन फिशरीज सोसायटी ही वैज्ञानिक संस्था स्थापन करणाऱ्या जीवशास्त्रज्ञांपैकी पांडियन हे एक होते. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषद आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण संस्था यांच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य होते.
जर्नल ऑफ एशियन फिशरीज सायन्स; हायड्रोबायोलॉजी; मरीन बायोलॉजी अँड इकोलॉजी जर्नल; मरीन इकोलॉजी प्रोग्रेस सिरीज़; इंडियन जर्नल ऑफ मरीन सायन्सेस इत्यादी अनेक विज्ञानविषयक जर्नल्सना ते मदत करतात. स्वत: पांडियन यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली आहे.
पांडियन बायोएनर्जेटिक्स आणि प्राण्यांच्या पर्यावरणशास्त्रातील अभ्यासासाठी ओळखले जातात. ते वर्ल्ड फिश नागा पुरस्कार प्राप्तकर्ता आहेत. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या एक्वा अँड मरीन बायोटेक्नॉलॉजीवरील टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष आणि द वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष होते आणि फेलो आहेत. ते भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, राष्ट्रीय विज्ञान अकादमी, भारतीय विज्ञान अकादमी आणि कृषीविज्ञान राष्ट्रीय अकादमी यांचे फेलो आहेत. सध्या पांडियन मदुराई येथे असतात.
समीक्षक : मोहन मद्वाण्णा