विज्ञान आश्रम : (स्थापना – १९८३) विज्ञान आश्रम या संस्थेची स्थापना श्रीनाथ कलबाग यांनी पुण्याजवळ पाबळ येथे केली. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास हे संस्थेचे ब्रीद आहे. हाताने काम करत शिकले तर बुद्धीला चालना मिळते, शिक्षणाच्या या नैसर्गिक पद्धतीवर कलबाग यांचा विश्वास होता. विद्यार्थ्यांना कृतीशिल शिक्षण दिले तर आपल्याकडे पण शोधक व उद्योजक तयार होतील असे त्यांचे ठाम मत होते. तसेच ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने करायचा असेल तर आपल्याला आपली उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान परिणामकारकरीत्या वापरले पाहिजे असा विज्ञान आश्रमाचा आग्रह आहे.

तंत्रज्ञान – व्यवसाय शिक्षण : विज्ञान आश्रमात युवकांसाठी एका वर्षांचा निवासी ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम राबवला जातो. तसेच विविध अल्प मुदतीचे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम चालवले जातात. २०१६ सालापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर डिझाईन इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून पदवीधर विद्यार्थ्याँसाठी सहा महिन्याचे विविध अभ्यासक्रम विज्ञान आश्रमात राबवले जातात. विशेषत: प्रॉडक्ट डिझाईन, सेन्सर टेक्नॉलॉजी, जल व कचरा व्यवस्थापन, आधुनिक शेती या विषयांवर विज्ञान आश्रमात विविध समुचित तंत्रज्ञांनावर संशोधन केले जाते. त्यामधून ग्रामीण समस्यांवर उत्तरे शोधण्याचे व त्यातून त्यांचे नवोद्योग सुरू करण्यासाठी विज्ञान आश्रम कार्यरत आहे.

फॅबलॅब : ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत मात्र त्यावर तयार उत्तरे देण्यापेक्षा, अशी उत्तरे शोधण्याची साधने व कौशल्य युवकांना शिकवले पाहिजे ही विज्ञान आश्रमाची भूमिका आहे. त्या प्रयत्नातूंच अमेरिकेतील एमआयटी या संस्थेच्या मदतीने पाबळमध्ये जगातील पहिली फॅबलॅब २००२ मध्ये सुरू झाली. फॅबलॅबमध्ये अनेक अत्याधुनिक यंत्रे आहेत. उदाहरणार्थ लेझर मशीन, 3D प्रिंटर, संगणक संचालित यंत्र, इलेक्ट्रोनिक्स इ. सुविधांचा वापर करून आपण हवी ती वस्तू बनवू शकतो.

फॅबलॅबचा वापर करुन विज्ञान आश्रमाने एलइडी दिवे, अंडी उबवणी मशिन, डोम ड्रायर, शेतीला आवश्यक तापमान, आर्द्रता इत्यादीनुसार चालणारे कंट्रोलर अशी अनेक तंत्रज्ञाने विकसित केली व त्याचा प्रसार केला आहे. सध्या जगात १६०० च्यावर फॅबलॅब्ज असून फॅबलॅब-0 अशी पहीली फॅबलॅब असण्याचा बहुमान विज्ञान आश्रमाकडे आहे.

नवीन तंत्रज्ञान : विज्ञान आश्रमाने तयार केलेली कमी खर्चात घरे बांधण्याचे पाबळ डोम हे तंत्रज्ञान प्रसिद्ध आहेत. लातूर, गुजरात भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी पाबळ डोमचा वापर केला गेला आहे. छोट्या शेतकऱ्यांना कमी अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आवश्यक आहे हे विज्ञान आश्रमाने पहिल्यांदा दाखवून दिले. मेकबूल (याँत्रिक बैल) नावाचे ट्रॅक्टर बनवून शेतकऱ्यांसाठी त्याची उपयुक्तता सिद्ध केली आज अनेक कंपन्या कमी अश्वशक्तीचे ट्रॅक्टर बनवत आहेत. मराठी भाषेमधून मल्टिमीडिया सीडी बनवण्यासाठी विज्ञान आश्रमाने पहिल्यांदा सुरुवात केली. संगणक दुरुस्तीसाठी तयार केलेल्या मल्टिमीडिया सिरीजमधून प्रशिक्षण घेऊन अनेक तंत्रज्ञ तयार केले. ग्रामीण भागात इंटरनेटचे महत्त्व लक्षात घेऊन २००१ मध्ये वायरलेस इन लोकल लूप या तंत्राचा स्वीकार करून पाबळ परिसरातील चाळीसपेक्षा जास्त गावांमध्ये इंटरनेट सेवा केंद्राची सुरुवात केली. शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला मिळावा म्हणून आयआयटी, पवई कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या सहकार्याने अ‍ॅक्वा ( aAQUA – almost all questions answered ) नावाची वेबसाईट सुरू करण्यात आली. २००५ ते २०१२ पर्यंत पंचवीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तिचा फायदा घेतला.

ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करण्यासाठी कंपोस्टर, हातसडीचा भात करण्याचे यंत्र, पॉलिहाऊस ऑटोमेशन, सांडपाणी पुनर्प्रक्रिया, सौर उपकरणे इ. अनेक तंत्रज्ञाने विज्ञान आश्रमाने विकसित केली आहेत. एखादे तंत्रज्ञान विकसित केले की त्याची विक्री व सेवा व्यवस्था ही उद्योजकाकडे सोपवून नविन समस्यांना हात घालण्याचा विज्ञान आश्रमाचा प्रयत्न राहीला आहे.

शिक्षण व तंत्रज्ञान प्रसार : केवळ तंत्रज्ञान तयार करुन पुरेसे नाही तर ते वापरण्याचे प्रशिक्षण आपल्या समाजाला द्यायला हवे. गावागावात तंत्रज्ञान प्रसाराची व्यवस्था असायला हवी. यासाठी विज्ञान आश्रमाने १९८७ पासून माध्यमिक शाळामधून ‘हाताने काम करत शिकणे’ व आधुनिक व विज्ञान तंत्रज्ञानाचा स्वीकार या संकल्पनेवर मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख या अभ्यासक्रमाची निर्मिती केली. या विषयाचा समावेश मुख्य विषयात झाला असून राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यामध्ये ‘मूलभूत बहुविध कौशल्य अभ्यासक्रम म्हणून त्याचा स्वीकार झाला आहे व हजारो शाळा त्याचा लाभ घेत आहेत.

विज्ञान आश्रम ही ‘शिक्षणाची प्रयोग शाळा’ असून विज्ञान आश्रमातून तयार झालेली तंत्रज्ञाने व उद्योजक हे त्या शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेची साक्ष आहेत.

संदर्भ :

समीक्षक : अ. पां. देशपांडे