विडाल, जॉर्जेस फर्नन्ड इसिडॉर : (९ मार्च १८६२ – १४ जानेवारी १९२९) जॉर्जेस फर्नन्ड इसिडॉर विडाल यांचा जन्म डेलिस, अल्जेरिया येथे झाला. विडाल हे विख्यात फिजिशियन- इम्यूनॉलॉजिस्ट होते. त्यांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. नंतरची दोन वर्षे त्यांनी वैद्यकीय संशोधन लोकांपर्यंत पोचवण्यात घालवली. अत्यंत हुषार व कष्टाळू म्हणून नावाजलेल्या जॉर्जेसनी लहान वयातच डॉक्टरेट मिळवली. स्ट्रेप्टोकोकस (Streptococcus) या एकाच प्रकारच्या सूक्ष्मजिवाणूंमुळे अनेक रोग होऊ शकतात हे शोधून काढले. उदा., प्युरपेरल फीवर, एरिसिपेलास व एन्डोकार्डायटिस.

फ्रान्सने विडाल यांच्या सन्मानार्थ काढलेले पोस्टाचे तिकीट

त्यानंतर सूक्ष्मजीवशास्त्र शिकवण्यास त्यांना पाचारण करण्यात आले. पॅरिसमधील विविध रूग्णालयात त्यांनी फिजिशियन म्हणून काम केले. त्यांनी संसर्गजन्य रोग व एरिसपेलास  या विषयावर उल्लेखनीय निबंध लिहीले. परंतु त्यांचे सर्वांत मोलाचे कार्य हे टायफॉइड या रोगावर होय. त्यांनी ह्या रोगाचे निदान एका विशिष्ट चाचणीद्वारे केली, जिला विडाल ॲग्लूटिनेशन टेस्ट (Widal agglutination test) असे म्हणतात. जर सॅलमोनेला (Salmonella) हे जंतु टायफॉइडच्याच रोग्याच्या पेशीविरहित रक्तात म्हणजे सिरममध्ये मिसळले तर त्यात गुठळ्या तयार होतात व रोगी टायफॉइडग्रस्त आहे हे निदान होते. ऩिदान लवकर झाले तर योग्य ते उपाय होऊ शकतात व रोग्याचे प्राण वाचू शकतात.

विडाल यांनी मूत्रपिंडाचे रोग, रक्तातील यूरियाचे प्रमाण व आहरातील मिठाचे प्रमाण अधिक असल्यामुळे होणारे मूत्रपिंडावरचे परिणाम यावरही संशोधन केले.

वैद्यकशास्त्रातील अनेक विषय त्यांनी हाताळले. त्यांचा अभ्यास, विद्वत्ता व सहिष्णुता यामुळे शिष्य, सहचारी व रोगी या सर्वांमधे ते अत्यंत लोकप्रिय होते. ३२व्या वर्षी त्यांची नामवंत प्रोफेसर म्हणून निवड झाली. ४८व्या वर्षी प्रोफेसर इंटर्नल पॅथॉलॉजी व ५६व्या वर्षी चेअर ऑफ क्लिनिकल मेडिसिन ह्या पदव्यांनी त्यांना भूषविले गेले.

एका शिष्याने त्यांच्याविषयी लिहिले, ‘परिपूर्ण तयारी, लिखाणाच्या आधाराविना बोलण्याचा आत्मविश्वास, श्रोत्यांच्या आकलनशक्तिचा अचूक वेध व समजावण्याचा कसब ह्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची व्याख्याने ऐकताना सर्व मंत्रमुग्ध होऊन जात.’

ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लेजियॉन ऑफ ऑनर हा फ्रान्स सरकारने विडाल यांना अत्युच्च बहुमान प्रदान केला. शिवाय, त्यांना अत्यंत मोलाचे असे अकादमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व प्राप्त झाले. त्यांना मानवी स्वभावाचा अभ्यास व इतिहासात विशेष रस होता. नेपोलियनच्या आयुष्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.

मेंदूतील रक्तस्त्रावामुळे विडाल यांचा पॅरिस येथे  मृत्यु झाला. सहकार्यांनी ह्या महान व्यक्तिचा पुतळा पॅरिसच्या रुग्णालयाच्या  आवारात  उभारला आहे.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे