भारतीय भूवैज्ञानिक संघटना, बेंगळुरू(स्थापना : २८ मे १९५८) साधारणत: विसाव्या शतकाच्या मध्यावधीस भारतात भूशास्त्र विषयात अध्यापन, संशोधन आणि सर्वेक्षण यांमधे भूशास्त्राच्या विविध शाखांमधे, विशेषत: भारतीय प्रस्तरविज्ञानात प्रगत संशोधन व्हावे, असा विचार रुजू लागला. सूक्ष्मजीवाश्मांवर संशोधन करणारे त्या वेळचे ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक एल. रामा राव यांनी पुढाकार घेतला आणि त्या प्रयत्नातून बेंगळुरू येथे भारतीय भूवैज्ञानिक संघटनेची स्थापना झाली.

संघटनेचे औपचारिक उदघाटन त्या वेळच्या केंद्र शासनाच्या खाण आणि खनिजतेल खात्याचे मंत्री केशव देव मालवीय यांच्या हस्ते झाले. संघटनेचे पहिले अध्यक्षपद ख्यातनाम भूशास्त्रज्ञ डी. एन. वाडिया यांनी भूषविले. बी. पी. राधाकृष्ण हे संघटनेचे पहिले सचिव होते, तर एल. रामा राव हे पहिले संपादक होते. संघटनेच्या सदस्यांनी निवडून दिलेल्या नियामक मंडळाद्वारे संघटनेचे व्यवस्थापन केले जाते. नियामक मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. संघटनेच्या स्थापनेपासून अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ भूशास्त्रज्ञांनी संघटनेच्या नियामक मंडळावर सदस्य किंवा पदाधिकारी म्हणून काम करून संघटनेच्या वाढीस हातभार लावला आहे, इतकेच नव्हे, तर संघटनेला आर्थिक स्थैर्य यावे यासाठी योगदानही दिले आहे.

आता भारतात भूशास्त्रज्ञांच्या अन्यही काही संघटना अस्तित्वात आल्या आहेत. तथापि, बेंगळुरूची ही संघटना आज भारतातील भूशास्त्रज्ञांच्या संघटनांमधील सगळ्यात अग्रगण्य संघटना म्हणून ओळखली जाते. अन्य संघटनांच्या तुलनेत या संघटनेची केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलही सदस्यसंख्या सर्वात जास्त आहे. संघटनेच्या स्थापनेपासून वैज्ञानिक संशोधनात प्रामाणिकपणा ठेवण्यासाठी धरलेला आग्रह, आणि त्याच वेळी मतभिन्नता असणाऱ्या निष्कर्षांनाही संघटनेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे धोरण, यांमुळे सुरुवातीला भक्कम असणारा संघटनेचा पाया अधिक दृढ होण्यास मदत झाली. भूशास्त्राच्या सर्व शाखांच्या अंगांनी भारताच्या भूमीविषयी व्यापक संशोधन व्हावे, भूशास्त्राविषयीची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचावी, आणि भूशास्त्राचे महत्त्व त्यांना कळून भूशास्त्राची लोकप्रियता वाढावी, या उद्दिष्टांसाठी ही संघटना काम करते. संघटना नियमितपणे मासिक बैठका आयोजित करते. अशा बैठकांमधे संशोधकांना त्यांच्या आवडीच्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते. या व्याख्यानांद्वारे भूशास्त्रातील संशोधनाच्या आघाडीवर कोणत्या विषयांना प्राधान्य दिले जात आहे ते पुढे येते. त्याचप्रमाणे नजीकच्या भविष्यकाळात संशोधनाची दिशा कोणती असणार आहे याचा वेध घेता येतो. संघटनेच्या ठिकठिकाणच्या सदस्यांमधे विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून संघटनेच्या सर्वसाधारण वार्षिक बैठका जाणीवपूर्वक देशाच्या निरनिराळ्या शहरांमधे आयोजित केल्या जातात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील संशोधकांना त्यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळते.

संघटना दर महिन्याला जर्नल ऑफ द जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या आपल्या भूशास्त्रविषयक संशोधनाला वाहिलेल्या नियतकालिकाचा एक अंक गेली अनेक वर्षे नियमितपणे प्रसिद्ध करत आहे. या नियतकालिकाला भूशास्त्रज्ञांच्या समुदायाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचे नियतकालिक म्हणून मान्यता मिळाली आहे. या नियतकालिकाच्या व्यतिरिक्त संघटना भूशास्त्रज्ञांच्या दृष्टीने स्वारस्यपूर्ण आणि महत्त्वाच्या विषयांवरील संस्मरणिका (मेम्वार्स) तसेच काही विशेष प्रकाशने प्रसिद्ध करते. त्याचप्रमाणे भूशास्त्रातील एखादी संकल्पना मध्यवर्ती ठेवून त्या विषयावरच्या शोधनिबंधांचा आणि समालोचनात्मक लेखांचा समावेश असणारे खंडही प्रकाशित करते. यातील बहुतेक प्रकाशने इंग्रजी भाषेत असली, तरी जनसामान्यांना आवडेल असे प्रादेशिक भारतीय भाषांमधे लिहिलेले सुलभ साहित्यही संघटनेने प्रकाशित केले आहे.

संघटनेने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आणि परिसंवादांचे आयोजन तरी केले आहे,  किंवा सह-यजमानपद तरी भूषविले आहे. २०१० नंतर संघटनेने कोणकोणत्या विषयांवर अशी चर्चासत्रे आयोजित केली होती याचा आढावा घेतला, तर त्यात किती विविधता आहे ते लक्षात येईल. २३वे भारतीय पुरासूक्ष्मजैविकी आणि प्रस्तरविज्ञानविषयक चर्चासत्र आयोजित केले होते, तर ऊर्जा आणि खनिज संसाधने यांच्याविषयी भूशास्रासमोरील आव्हाने हा परिसंवाद आयोजित केला होता. नंतर आयोजित केलेल्या परिसंवादाचा एकात्मिक जलव्यवस्थापनाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय होता. पुढे, संघटनेने लोहखनिजांचे साठे या विषयावरील कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत क्षेत्रीय भेटींचाही समावेश होता.

संघटनेतर्फे आजपर्यंत जितक्या परिषदांचे अथवा परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते, त्यापैकी बहुसंख्य परिषदांमधे आणि परिसंवादांमधे जे शोधनिबंध आणि समालोनात्मक लेख सादर केले गेले त्यांचा समावेश असणारी कामकाजांची इतिवृत्ते संघटनेने प्रकाशित केली आहेत. भविष्यातही संघटना अशा परिषदा आणि चर्चासत्रे आयोजित करत राहील. याखेरीज क्षेत्रीय सर्वेक्षण आणि मूलभत संशोधन यात स्पृहणीय कामगिरी करणाऱ्या भूशास्त्रज्ञांचा गौरव करण्यासाठी संघटना दरवर्षी नानाविध पुरस्कारही प्रदान करीत असते.

मुले संस्कारक्षम वयाची असतानाच त्यांना भूशास्त्र या विषयाची गोडी लागावी, म्हणून शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय भूशास्त्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमधे भाग घ्यावा यासाठी संघटना त्यांना प्रोत्साहन देते आणि त्यांची तयारीही करून घेते. अशा ऑलिम्पियाड स्पर्धांमधे भारतीय विद्यार्थ्यांच्या संघांनी अनेक वेळा पुरस्कारही जिकले आहेत.

संदर्भ :   

समीक्षक : विद्याधर बोरकर