बच्छावत, बिमल कुमार : (१६ ऑगस्ट १९२५ – २३ सप्टेंबर १९९६)    बिमल कुमार बच्छावत यांचा जन्म कलकत्यात झाला. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी रसायनविज्ञानातील पदवी आणि उपयोजित रसायनविज्ञानातील पदव्युत्तर पदवी मिळवली. जाधवपूर विद्यापीठातून त्यांनी फूड टेक्नॉलॉजीमध्ये प्रतिजैविके (Antibiotics) क्षेत्रात पीएच्.डी. करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांचे मार्गदर्शक ए. के. बोस होते. त्यांनी आपले संशोधन अमेरिकेत इलिनॉय विद्यापीठामध्ये उर्बाना शॅम्पेन येथे कार्ल स्वेंस्सेन वेस्ट्लिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. त्यानंतर बिमल कुमार यांनी मायनर जे. कून यांच्याकडे पेन्सिल्व्हानिया विद्यापीठ आणि मिशिगन विद्यापीठामध्ये सस्तन प्राण्यामध्ये कीटोन (बॉडी) घटक कसे तयार होतात यावर संशोधन केले.

बच्छावत ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रुजू झाले. तेथे त्यांनी चेतारसायन विज्ञान आणि ग्लायकोबायॉलॉजी संशोधन केंद्र सुरू केले. कर्बोदके प्रथिने व मेद यांबरोबर संयुक्तपणे अनेक ऊतीबरोबर विविध कार्ये करतात. या कर्बोदक शाखेस ग्लायकोबायॉलॉजी नाव देण्यात आले आहे. ग्लायकोबायॉलॉजी म्हणजे शर्करा रेणूंची रचना, संश्लेषण आणि त्यांचे कार्य. सजीवांमध्ये शर्करा रेणू सर्वत्र तयार झाले आहेत. सजीवांमध्ये शर्करा हे अत्यावश्यक रेणू आहेत. त्यांचे वैद्यकीय, जैवरासायनिक आणि जैवतंत्रज्ञान वापर यांवर सतत  संशोधन चालू असे.

केंद्रात त्यांनी ग्लायकोलिपिडे, ग्लायकोसामिनोग्लायकॅन आणि ग्लायकोप्रोटीन यांचा चेतापेशी विकास आणि चेताविकार संबंध यावर संशोधन केले. वीस वर्षे ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये काम केल्यानंतर ते कलकत्त्यात आपल्या मूळ ठिकाणी परतले. तेथे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ केमिकल बायालॉजीमध्ये त्यांना संचालक पदावर काम करण्याची संधी मिळाली. बच्छावत हे फेडरेशन ऑफ एशियन अँड ओशिअनियन बायोकेमिस्ट (FAOB) या संस्थेवर निवडले गेले. या संस्थेवर निवड झालेले ते पहिले भारतीय होते. त्यांना  जैवरसायनशास्त्र विभागप्रमुखपद दिल्ली विद्यापीठामध्ये मिळाले. निवृत्त होईपर्यंत ते फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लनरी अ‍ॅन्ड अ‍ॅप्लाइड सायन्सचे अधिष्ठाता झाले होते. निवृत्तीनंतर ते चार वर्षे सोसायटी ऑफ बायालॉजिकल केमिस्टचे अध्यक्ष होते.

भारतात परतल्यानंतर त्यांनी आपले संशोधन अमिनो अम्ले आणि अकार्बनी सल्फर (गंधक) चयापचय आणि ग्लायकोसामिनोग्लायकॅन यावर  केंद्रित केले. त्यांच्या संशोधनातून सर्वात प्रथम विविधवर्णी (metachromatic) ल्यूकोडिस्ट्रोफी–चेतापेशी आवरण विकार हा गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे होतो हे सिद्ध केले. हा प्रभाव शरीरातील सल्फाइड विघटक अरिलसल्फेट ए विकर कारणीभूत असते. या शोधामुळे ग्लायकोलिपीड साठवण्यासंबंधीचे आजार उदा., टे सॅच्स आणि गाउचर आजार आणि अशा आजारांचे निदान गर्भावस्थेत करणे सुलभ झाले. सेरेब्रोसाइड 3-सल्फेटचे जैविक संश्लेषण आणि विघटन यांचे विविधवर्णी ल्यूकोडिस्ट्रोफी विकारातील उपचार त्यामुळे सुरू झाले.

त्यांनी केलेल्या एचएमजी को-ए-लायेझ या मेव्हालोनेट आणि कीटोजेनेसिस (कीटोन संश्लेषण) मधील सहविकर शोधणे आणि रेण्वीय कारण शोधल्याबद्दल बच्छावत यांचे नाव झाले. शर्करा असलेले लायपोसोम यांच्या अभ्यासामुळे आणि संप्रेरक विकृती असलेल्या अवयवात (मायलीन आवरण असलेल्या चेतापेशी) करण्यासाठी त्यांनी औषध उपाययोजना केली.

जैवविज्ञानातील त्यांच्या संशोधनामुळे त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले.

त्यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी इंडियन अकादमी ऑफ न्यूरोसायन्सतर्फे पुरस्कार जाहीर केला. नॅशनल अ‍कॅडमी ऑफ सायन्स इंडियातर्फे प्रोफेसर बी. के. बच्छावत स्मृती पुरस्कार तरुण वैज्ञानिकांसाठी ठेवण्यात आला.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.