कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि नवीन संकरित बि-बियाणांच्या संशोधनामुळे कृषी उत्पादनात जी क्रांती घडून आली, तिला हरित क्रांती असे म्हणतात. प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी १९६० मध्ये सर्व प्रथम हरित क्रांती ही संकल्पना अस्तित्वात आणून त्यानुसार कृषी क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. भारतामध्ये कृषी तज्ज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात. विसाव्या शतकाच्या साठोत्तरीमध्ये भारत देश वेगाने प्रगती आणि विकासाकडे आकर्षित झाला. या साठोत्तरीमध्ये विद्यमान यंत्रणेचा नाश झाला आणि कृषी क्षेत्रात नवीन हरित क्रांती घडून आली. या हरित क्रांती किंवा हिरव्या क्रांतीमुळे भारतीय शेती उत्पादनात, प्रामुख्याने गहू आणि तांदुळ या पिकांच्या प्रति हेक्टर उत्पादनात, प्रचंड वाढ झाली. या पिकांच्या उत्पादनक्षमतेत घडून आलेल्या नवीन बदलाला अर्थतज्ज्ञांनी हरित क्रांती असे म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कृषी विकासाची आवश्यकता आहे. एक प्रगतिशील शेती आर्थिक वाढीचे किंवा विकासाचे एक शक्तिशाली यंत्र म्हणून कार्य करते. कृषी क्षेत्राकडून आवश्यक भांडवल, श्रमिक, कच्चा माल, मजुरी, वस्तू आणि परकीय चलन प्रदान होत असल्याने अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांच्या विकासाची सुरुवात करणे आणि विकास कायम राखण्यास कृषी क्षेत्र मदत करते. याचा विचार करून भारतातील नियोजन काळाच्या अगदी सुरुवातीपासूनच शेतीचा विकास घडवून आणण्यासाठी शासनाने भर घातलेला आहे. भारत सरकारकडून कृषी विकासासाठी वापरण्यात येणारी धोरणे तीन अवस्थांमध्ये विभागली गेली आहेत.

(१) सर्वसामान्य अवस्था : भारतीय शेतीच्या पारंपरिक वर्ण बदलण्यासाठी इ. स. १९४७ ते १९६१ या कालावधित अनेक संस्थात्मक आणि पायाभूत घटकांची भर घालण्यात आली.

(२) सघन अवस्था : सघन किंवा गहन कृषी जिल्हा कार्यक्रम (आयएडीपी) १९६१ ते १९६५ या काळात सुरू करण्यात आला. सर्व प्रमुख पिकांसाठी जल प्रबंधन, सुधारित बियाणे खते, कीटकनाशके, योग्य माती आणि सुधारित बियाणे यांसारख्या सुधारित उत्पादनांच्या वापरांमुळे हे पॅकेज प्रोग्रॅम म्हणून ओळखले जाते.

(३) विशेष अवस्था : कृषी विकसित करण्याच्या उद्देशाने १९६५ नंतरच्या टप्प्यामध्ये विशिष्ट क्षेत्रांमधून विशिष्ट पिकांसाठी लक्ष केंद्रित केले गेले. या टप्प्याला सहसा नवीन कृषी धोरणांचा टप्पा असे म्हणतात. या अवस्थेमध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदुळासारख्या काही पिकांच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले.

तक्ता क्र. १ : उत्पादनातील वाढीचा दर, लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादकता (प्रति वर्ष % मध्ये – १०६१ ते १९६५)

योजना कालावधी उत्पादन क्षेत्र उत्पादनक्षमता/ उत्पादकता
प्रथम योजना (१९५१ – १९५६) ४.१ २.६ १.४
द्वितीय  योजना (१९५६ – १९६१) ३.१ १.३ १.८
तिसरी  योजना (१९६१ – १९६६) ३.३ ०.६ २.७

 

तक्ता क्र. १ मधून असे दिसून येते की, प्रत्येक योजना कालावधीमध्ये कृषीची उत्पादकता सुधारली आहे.

उद्देश :

  • दुसऱ्या पंचवार्षिक योजनाकाळात भारतामध्ये अन्नाच्या तुटवड्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात भूकबळीचे शिकार झाले. याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने हरित क्रांतीला सुरुवात केली.
  • गावांचा आणि उद्योगांचा विकास करण्यासाठी पारंपरिक कृषी पद्धतींचा ऱ्हास करून कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे आणि कच्चा मालाची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे.
  • कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण करणे.
  • कोणत्याही परिस्थितीचा आणि कोणत्याही रोगांचा सामना करू शकतील अशा उत्पादक रोपट्यांची निर्मिती करणे.
  • गैर औद्योगिक राष्ट्रांना कृषी उत्पादनाबाबत प्रोत्साहित करणे, कृषीसंदर्भात प्रसार करणे इत्यादी.

तक्ता क्र. २ : स्वातंत्र्यानंतर भारतात काही महत्त्वाच्या पिकांची उत्पादकता (प्रत्येक एचआयसीसाठी क्विंटल)

पिके १९६०-६१ १९६५-६६ १९७०-७१ १९८०-८१ १९८५-८६ २००१-०२ २००४-०५ २००७-०८ २००९-१० २०१०-११ २०११-१२ २०१२-१३ २०१३-१४
तांदूळ ६.७ १०.१ ११.२ १३.४ १५.५ २०.८६ १९.६४ २२.०२ २१.३० २२.४ २३.७ २४.६१ २४.२१
ज्वारी ३.५ ५.३ ४.७ ६.६ ६.३ ७.८५ ७.९७ १०.२१ ९.११ ९.५ ९.५ ८.५ ९.३
बाजरी २.९ २.९ ६.२ ४.१ ३.४ ८.७५ ८.५९ १०.४२ ७.२८ 1१०.८ ११.६ ११.९ ११.६
मैदा ५.५ ९.३ १२.८ ११.६ ११.५ २०.१८ १९.०७ २३.३६ २०.०२ २५.४ २४.८ २५.७ २५.८
गहू ६.६ ८.५ १३.१ १६.३ २०.५ २७.७ २६.०२ २८.० २८.३० २९.९ ३१.४ ३१.६९ ३०.७५
कापूस ०.९ १.२ १.१ १.४ 2 १.९० ३.१८ ४.६७ ३.९६ ४.९ ४.८ ५.३
तेल बियाणे ५.१ ४.२ ५.८ ५.३ 5.7 ९.१३ ८.६५ ११.१५ ९.५५ ११.९ ११.४ ११.३ ११.२
ऊस ४४९.४९ ४३७.१७ ५७८.४४ ५७८.४४ 598.89 ६३७.७० ६४७.५२ ६८९ ७०० ७०१ ७०३ ६८२ ६९८

 

तक्ता क्र. २ मध्ये स्वातंत्र्यानंतर भारतातील अन्नधान्याचे उत्पादन प्रगती दर्शविते. वेगवान प्रगतीमुळे उच्च उत्पादन करणारे बियाणे किंवा एचवायव्ही बियाणे उत्पादन झाले. एचवायव्ही बियाण्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले. याचा परिणाम हरित क्रांतीमध्ये झाला; तो सरकारच्या विविध उपायांचा एकत्रित परिणाम आहे. विश्वसनीय पाणीपुरवठा आणि ऐतिहासिक कृषी यश यांमुळे नवीन पिकांचा वापर करण्यासाठी प्रथम सरकारने पंजाबची निवड केली. या क्रांतीचा उपयोग करण्यामागे अनेक कारणे जबाबदार होती. या क्रांतीमुळे तिसऱ्या योजनेनुसार लुधियाना आणि पंत नगर येथे कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.

मूलतत्त्वे :

  • कृषी क्षेत्राचा विकास : इ. स. १९४७ पासून कृषी योग्य जमीनीचे क्षेत्रफळ वाढविले गेले; परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढणाऱ्या अन्नधन्यांच्या मागणीमुळे हे क्षेत्र अपुरे पडू लागले. तरीपण हरित क्रांतीमुळे कृषीयोग्य जमीनीच्या विस्तारास साह्य झाले.
  • दुहेरी उत्पादन प्रणाली : दुहेरी उत्पादन प्रणाली ही हरित क्रांतीचे एक वैशिष्ट्य होय. नैसर्गिक पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतांमध्ये वर्षातून केवळ एकदाच पिक घेतली जात; मात्र हरित क्रांतीच्या दुसऱ्या चरणामध्ये जलसिंचन योजना लागू करून दोनदा पिक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • प्रगत बि-बियाणांचा वापर : प्रगत बि-बियाणांचा वापर करणे हा हरित क्रांतीचा वैज्ञानिक दृष्टिकोण होता. त्यानुसार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या नवीन संकरित बियाणांची (उदा., गहू, तांदुळ, मका, बाजरी इत्यादी) निर्मिती करण्यात आली.
  • हरित क्रांतीतील महत्त्वपूर्ण कृषी उत्पादन : हरित क्रांतीच्या काळात गहू, तांदुळ, मका, बाजरी या मुख्य पिकांचे उत्पादन करण्यात आले. यांपैकी गहू हे हरित क्रांतीचे मुख्य उत्पन्न होते. गैर-खाद्यान्न कृषी उत्पादनाला हरित क्रांतीमध्ये दुय्यम स्थान देण्यात आले होते.

हरित क्रांती यशस्वी करण्यासाठी संकरित बियाणे, नवीन आदान पुरवठा, एकाधिक पीक, खते, आधुनिक उपकरणे व यंत्रसामग्री, सिंचनाचा विस्तार, उत्तम विपणन सुविधा, सुधारित क्रेडिट सुविधा इत्यादी मुख्य घटक आहेत. हरित क्रांतीमधील प्रगती रत्न, विजया, जया, पद्मा, मुक्ता, कल्याण सोना २२७, सोना लिका (एस – ३०८), पीव्ही – १८, डब्ल्युएल – ७११, एचबी – १०, आयआर – ८, पीआर – १०६ या बी-बियाण्यांमुळे झालेली आहेत.

भारतात क्रांतीचा अनुभव घेणारे क्षेत्र पंजाब, हरयाणा, राजस्थानमधील गंगानगर आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांत आहेत. या निवडलेल्या भागात आश्वासित सिंचनाने उच्च उत्पन्न देणारे कार्यक्रम सुरू केले. हिरव्या क्रांतीमुळे अन्न उत्पादनावर एक वेगळा प्रभाव पडला.

सकारात्मक प्रभाव :

  • अन्न-धान्य उत्पादनात वृद्धी : हरित क्रांतीमुळे गहू आणि तांदुळ यांच्या संशोधित नवीन बीजांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन भारत जगातील सगळ्यांत मोठा कृषी उत्पादक देश म्हणून नावारूपास आला (१९७८-७९).
  • अन्न-धान्यांची आयात : हरित क्रांतीमुळे देशात मोठ्या प्रमाणात गहू व तांदुळाचे उत्पादन होऊ लागले. त्यामुळे एकेकाळी कृषी अन्न-धान्यांची आयात करणारा भारत देश निर्यात करण्याएवढे अन्न-धान्यांचे उत्पादन करू लागला.
  • शेतकऱ्यांना लाभ : हिरत क्रांतीमुळे जे १० हेक्टरपेक्षा जास्त कृषीजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीयंत्रे, नवीन बि-बियाणे यांचा वापर केल्याने कृषी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.
  • औद्योगिक विकास : हरित क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात कृषीयोग्य अवजारांची (उदा., टॅक्टर, हार्वेस्टर, थ्रेशर,पंपिंग, डिझेल यंत्र, विद्युत यंत्र इत्यादी.) मागणी वाढली. त्यामुळे अवजारे निर्माण करणाऱ्या उद्योगांचाही विकास होऊ लागला.
  • ग्रामिण रोजगार : दुहेरी कृषी उत्पन्न घेण्याच्या प्रणालीमुळे शेतामध्ये मजुरांची मागणी वाढली. त्यामुळे गावातील लोकांना शेतात रोजगार मिळाला. एवढेच नाही, तर कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने उद्योग क्षेत्र, विद्युत क्षेत्र इत्यादी क्षेत्रांत रोजगार निर्मिती होऊ लागली.

हरित क्रांतीमुळे कृषी क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पडला असला, तरी काही प्रमाणत नकारात्मक प्रभावसुद्धा दिसून आलेत. हरित क्रांतीमुळे केवळ गहू, तांदुळ, बाजरी, मका या पिकांचे उत्पन्न घेण्यावर मोठ्या प्रमाणात भर होता; मात्र यांव्यतिरिक्त मोट, तीळ, जूट, कापूस, चहा इत्यादी कृषी उत्पादनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे यांच्या बींजांच्या संकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरीही ते पिक घेण्याचे टाळले होते.

हरित क्रांतीनंतर शेती क्षेत्रात रोजगाराच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे मानण्यात येते. हरित क्रांतीच्या साहाय्याने वाढीव शेती उत्पादनातून भारत अस्तित्वातील उच्च उत्पन्न करणाऱ्या बियाणे किंवा एचवायव्ही बियाण्यांचा संपूर्ण संभाव्य फायदा घेण्यात आला. यामुळे कृषी क्षेत्रात एचवायव्ही यशस्वी झाले. भारताच्या विविध भागात कृषी विकास असमान असल्यामुळे हरित क्रांतीचा पुढील टप्पा भविष्यातील संकरित बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानांच्या निर्मिती व वापरांमध्ये आहे.

समीक्षक : सुहास सहस्त्रबुद्धे

भाषांतर : रिता शेटीया