हसन-बोस सुरय्या : (१९२८ – ३ सप्टेंबर २०२१) सुरय्या हसन-बोस यांचा जन्म आणि शालेय शिक्षण हैद्राबाद येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्या केंब्रिज येथे गेल्या. तिथे वस्त्रकलेतील पदवी त्यांनी मिळवली तरी त्या लगेच भारतात परतल्या. त्यांच्या वडलांनी (बदरूल हसन) सुरू केलेल्या पहिल्या कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियममध्ये त्या काम करू लागल्या. या विक्री केंद्रातून स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तू विकल्या जात असत. पुढे त्या दिल्लीला स्थलातंरीत झाल्या. तिथे त्यांनी हॅन्डलूम अ़ॅण्ड हॅन्डिक्राफ्ट एक्सपोर्ट काऊन्सिलमध्ये काम केले. त्यावेळी त्यांना पुपुल जयकर, कमलादेवी चट्टोपाध्याय इत्यादी मान्यवरांसोबत काम करायची संधी मिळाली. यावेळी त्यांना पारंपरिक भारतीय वस्त्रप्रकार निर्यात करायचा अनुभव मिळाला, तसेच त्यांना परदेशातील ग्राहकांच्या आवडीनिवडी सुद्धा लक्षात आल्या.
सुरय्या हसन यांचे लग्न अरबिंदो बोस यांच्याशी झाले होते. अरबिंदो हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे होते. त्यांनी आपला मुक्काम हैद्राबाद येथे पुन्हा हलवला. त्यांच्या काकानी (आबिद हुसेन सफ्रानी) हैद्राबाद शहराबाहेर चार हेक्टर जागेत गरीब मुलांसाठी एक शाळा सुरू केली होती. त्याच आवारात त्यांनी आपली हातमागाची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशाळा उभी केली. सुरय्याज विव्हिंग स्टुडिओ या नावाने सुरू केलेल्या या कार्यशाळेत पारंपरिक हिमरू वस्त्रनिर्मितीचे शिक्षण देण्यासाठी खास वाराणसीहून या कलेत पारंगत अब्दुल कादीर यांना बोलावून घेतले. तेथील कारागिरांच्या प्रशिक्षणामुळे हिमरू वस्त्रकलेच्या पुनरूज्जीवनाच्या त्यांच्या प्रयत्नानांना यश आले. याच्याबरोबरीने त्यांनी मश्रू वस्त्रनिर्मिती, वेकंटगिरी व पैठणी साड्या, तेलिया रूमाल तसेच कलमकारी व मधुबनी रंगकला या सगळयांना पुनरूज्जीवित केले.
यासाठी त्यांनी स्थानिक गरजू महिलांना कार्यशाळेत प्रशिक्षण दिले. त्यामध्ये प्रामुख्याने विधवांचा समावेश होता. याचसारखे प्रशिक्षण त्यांनी शाळेच्या आवारातल्या गरीब मुलांनाही दिले. महात्मा गांधीच्या स्वावलंबी खेडी असावीत, तिथे घराघरात हातमाग असावेत व तिथल्या कापडाच्या गरजा तिथेच भागाव्यात या विचारांशी सुसंगत अशी कृती सुरय्याजी करत होत्या. घरात हातमाग असल्यावर हे विणकरीचे कौशल्य एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तातंरित होईल अशी योजना सुरय्याजींनी केली होती.
स्वदेशीचा पुरस्कार होत असलेल्या काळात वाढलेल्या सुरय्याजींनी वारंगळजवळील कांचनपल्ली येथील विणकरांना सतरंज्या विणायला प्रोत्साहित केले व त्यांना चांगली बाजारपेठ मिळवून दिली. यामुळे आता पाचशेपेक्षा जास्त विणकर हे काम करत गावातच रोजीरोटी कमवत आहेत. याचबरोबर पारंपरिक विणींना प्रोत्साहन देत त्यामध्ये सतत नाविन्याचा समावेश करत त्या विणकरांना विणायला उद्युक्त करत. या उत्पादनांना देशातील बाजारपेठेबरोबर परदेशातील बाजारपेठ मिळवून दिली. यासाठी त्यांनी डेक्कन एक्सपोर्टस् ही कंपनी काढली आणि त्याद्वारे पारंपरिक भारतीय वस्त्रांना जागतिक बाजारात स्थान मिळवून दिले. या कामाचा परिणाम म्हणून साऱ्या देशभर राजेशाही हिमरू वस्त्रांची फॅशन आली. यामुळे हजारो कुटुंबांना असा रोजगार मिळवून देऊन मूळ व्यवसायात त्यांना परत आणण्याचे श्रेय सुरय्याजींना जाते.
नावाजलेल्या ‘फॅब इंडिया’ या कापड विक्री साखळीचा प्रमुख पुरवठादार हा मान सुरय्याजींच्या उद्योगाला आहे. त्यांनी भारतीय पारंपरिक वस्त्रांचे प्रदर्शन लंडनच्या सुप्रसिद्ध व्हिक्टोरिया अ़ॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये भरवून भारतीय विणकरांचे कौशल्य जगासमोर मांडले. सुरय्याजींच्या वस्त्रकलेतील या कामगिरीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने फॅब इंडियाने सुरय्याजींच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकणारे कॉफी बुक प्रकाशित केले. तळागाळात काम करत, शेकडो महिलांना आणि हजारो विणकरांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे श्रेय सुरय्याजींना जाते. भारतीय पारंपरिक वस्त्रकलेचा इतिहास त्यांना वगळून लिहिला जाऊ शकत नाही, एवढे महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले आहे. शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या सुरय्याजींचे वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी निधन झाले.
संदर्भ :
- https:// thehindu.com/news/cities/Hyderabad/suraiya-hasan-bose-at-the-age-of-93/article36180963ece
- https://www.bhaskar.com/news/NAT-NAN-indiasoldest-textile-exper.suraiya-hassan-bose-motivational-story-5056638.ptto.html
समीक्षक : अ. पां. देशपांडे