कृष्णन, महाराजपुरम सीतारामन : (२४ ऑगस्ट १८९८ – २४ एप्रिल १९७०) महाराजपुराम सीतारामन कृष्णन यांचा जन्म तामिळनाडूमधील तंजावरला झाला. त्यांचे शालेय शिक्षणही तंजावरलाच झाले. महाविद्यालयीन शिक्षण तिरुचिरापल्ली आणि चेन्नई येथे झाले. भूशास्त्र हा विषय घेऊन ते पदवीधर झाले. त्या काळात ब्रिटिश राजवट असल्याने इंग्लंडमधे शिकण्यासाठी सहयोगीपदासाठी मिळणारी शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना मिळणे दुर्लभ होते. पण कृष्णन यांनी गुणवत्तेच्या जोरावर लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजची सहयोगीपदासाठीची शिष्यवृत्ती मिळवली. इम्पिरिअल कॉलेजची पदविका मिळवून त्यांनी नंतर लंडन विद्यापीठाची डॉक्टरेटही मिळवली.

त्याच वर्षी त्यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागात साहाय्यक पर्यवेक्षक या पदावर नेमणूक झाली. आठ वर्षे त्यांनी उत्तर ओडिशाच्या सुंदरगढ आणि केओंझार जिल्ह्यांमधील फार मोठ्या क्षेत्राचे सर्वेक्षण केले. त्यातून तिथे एक स्वतंत्र पाषाणसंघ असल्याचा निष्कर्ष त्यांना मिळाला. गंगपूर शहरावरून त्याला त्यांनी ‘गंगपूर मालिका’ असे नाव दिले. त्यांच्या या संशोधनावर आधारित, त्यांनी लिहिलेली एक संस्मरणिका (मेम्वार) भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागाने प्रकाशित केली. पुढची तीन वर्षे तत्कालिन मद्रास राज्यातील लोह आणि मॅंगॅनीज खनिजे, अभ्रक, जिप्सम आणि इतर काही खनिजांचा त्यांनी शोध घेतला. आजचे तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा मोठा भाग आणि ओडिशाचा थोडासा भाग यांचा समावेश त्या काळातल्या मद्रास राज्यात होत असे. यावरून त्यांच्या या कामाचा विस्तार किती मोठा होता हे ध्यानात येईल. याही संशोधनावरची त्यांची संस्मरणिका प्रकाशित झाली.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागात काम करत असताना काही अनुभवी भूवैज्ञानिकांचा सहवास त्यांना मिळाल्याने भूविज्ञानाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत झाली. या भूवैज्ञानिकांपैकी सायरिल फॉक्स यांनी कृष्णन यांना नव्याने पुढे आलेली माहिती संकलित करून भारतीय प्रस्तरविज्ञानावर पुस्तक लिहिण्यास सुचवले. त्याप्रमाणे त्यांनी Geology of India and Burma आणि Introduction to Geology of India ही पुस्तके लिहिली. अनेक आवृत्त्या आणि पुनर्मुद्रण झालेली ही पुस्तके जवळपास २०१० सालापर्यंत पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांच्या ते पुस्तक उपयोगी पडली. या पुस्तकांचे रशियन भाषेत भाषांतर झाले आहे.

सन १९४८ मध्ये भारत सरकारने भारतीय खनिकर्म ब्यूरो हा विभाग सुरू केला. कृष्णन त्याचे पहिले संचालक झाले. तीन वर्षे त्यांनी ते पद संभाळले. मग भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागाच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली. हे पद भूषविणारे ते पहिले भारतीय भूवैज्ञानिक होते. आपल्या संचालकपदाच्या कार्यकालात त्यांनी भारतामधे भूभौतिक सर्वेक्षणाचा पाया घातला. पुढे खनिज तेलाच्या संशोधनात भारताला जे अभूतपूर्व यश मिळाले, त्याचे बीज अप्रत्यक्षरित्या कृष्णन यांनीच पेरले होते.

ते नवी दिल्ली येथे वैज्ञानिक संशोधन मंत्रालयात खनिज सल्लागार आणि पदसिद्ध संयुक्त सचिव होते. वर्षभर त्यांनी धनबादच्या भारतीय खनि विद्यालयाच्या [आताचे भारतीय तंत्रज्ञान संस्थान, आय. आय. टी,  (आय. एस. एम.)] संचालकपदाची धुरा वाहिली. निवृत्तीनंतर दोन वर्षे वॉल्टेअरच्या आंध्र विद्यापीठातील भूविज्ञान आणि भूभौतिकी विभागाचे ते प्रमुख होते. हैदराबादची राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्था त्यांच्याच पुढाकाराने स्थापन झाली. १९६१ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे ते पहिले संचालक होते. पद्मविभूषण सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.

संदर्भ : 

समीक्षक : विद्याधर बोरकर