नेगीशी, ऐईची : (१४ जुलै १९३५ – ६ जून २०२१) ऐईचीनेगीशी ह्यांचा जन्म जपानच्या ताब्यातील मांचुरिया (चीन) मधील शिंजिंग (आताचे नाव चांगचुन) येथे झाला. वडलांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चीन आणि कोरियातील अनेक ठिकाणी नेगीशी ह्यांचे लहानपण गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर नेगीशी कुटुंबीय जपानला परत जाऊन शेती करू लागले. टोकियो विद्यापीठातून पदवी मिळवून त्यांनी जपानी रासायनिक उद्योगातील प्रसिद्ध तैनजींन कंपनीत दोन वर्षे संशोधन वैज्ञानिक म्हणून काम केले. फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाल्यावर तेनजीन कंपनीतून बिनपगारी रजा घेऊन त्यांनी पेनसिल्वानिया विद्यापीठातील प्राध्यापक ऍलन डे ह्यांच्या मार्ग्दार्शनाखाली पीएच्.डी. मिळविली. जपानमध्ये परतल्यावर ते तेनजीन कंपनीत पुन्हा संशोधन कार्यात मग्न झाले. जपानमधील कोणत्याच विद्यापीठात त्यांच्या आवडत्या शैक्षणिक किंवा संशोधन क्षेत्रात कार्य करण्यास वाव न मिळाल्याने नेगीशी पुन्हा अमेरिकेत दाखल झाले आणि पर्ड्यू विद्यापीठात नोबेल पुरस्कार विजेते हर्बर्ट सी. ब्राऊन ह्यांचे बरोबर संशोधनात गुंतले. नंतर सिराक्युस विद्यापीठात प्रपाठक म्हणून ते रुजू झाले आणि पुढे पर्ड्यू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
नेगीशी ह्यांचे रसायनशास्त्रातील प्रमुख कार्य म्हणजे दोन कार्बनमध्ये अनुबंध निर्माण करणे. प्रिचर्ड हेक ह्यांनी विकसित केलेल्या प्रक्रियेत पॅलॅडियम धातूचा वापर करून त्यांनी ही प्रक्रिया आणखी सुलभ आणि परिपूर्ण केली. धातू वापरून दोन कार्बनमध्ये बंध निर्माण करण्यासाठी वापरात असलेल्या व्हिक्टर ग्रीनयार (Grignard) ह्यांचे नावाने प्रसिद्ध असलेल्या रासायनिक प्रक्रियेप्रमाणेच ही पद्धत सुद्धा तेव्हढीच महत्त्वाची ठरली. रिचर्ड हॅक आणि अकिरा सुझुकी ह्यांच्या बरोबर नेगीशी ह्यांना २०१० चे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पॅलॅडियम प्रमाणेच इतर संक्रमणिय (transition elements) धातू वापरून अनेक नवनवे अभिकर्मक (Reagents) त्यांनी आणि इतरांनी तयार केले. डायपेन्टाडायिन झिरकोनेट [Zr(C 5H5)2 ] ह्या अतीव उपयुक्त रसायनाचे स्वामित्व घेण्याचं त्यांनी टाळले. ह्या आणि अशा अनेक संयुगांचा उपयोग अनेक औषध, बुरशीनाशके, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जनुकीय विज्ञान अशा क्षेत्रात केला जातो. पर्ड्यू विद्यापीठ, अमेरिकन आणि जपानी सरकार ह्यांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org>prize
- http://www.chem.purdue.edu>neg
- http://www.ndtv.com>nobel
समीक्षक : श्रीनिवास केळकर