नटराजन, वल्लारपुरम सेन्निमलाई : (१० जून १९३९ -) वल्लारपूरम सेंन्ंनिमलाई नटराजन यांचा जन्म संकरापलायम या तामिळनाडू राज्यात पेरियार जिल्हयातील गावात झाला. नटराजन यांनी बॅचलर ऑफ मेडिसिनची पदवी मदुराई वैद्यकीय कॉलेज आणि मद्रास (आता चेन्नई) वैद्यकीय विद्यापीठातून वैद्यकीय पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी यूकेमध्ये जेरियाट्रिक मेडिसिनचे प्रशिक्षण घेतले आणि चार वर्षांच्या शिक्शणानंतर त्यांनी एमआरसीपी (यूके) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी उच्च वैद्यकीय प्रशिक्षण, यूके द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन यांच्या संयुक्त समितीकडून वृद्धोपचार वैद्यक (जेरियाट्रिक मेडिसिनमध्ये) विषयाचे तज्ञ म्हणून मान्यता मिळवली. एडिनबर्गने त्यांना एफ आर सीपी (एडिन) म्हणून फेलोशिप दिली.

नटराजन ज्यांना सर्वजण डॉ. व्ही. एस. एन. म्हणून ओळखतात, ते एक प्रसिद्ध वृद्धोपचार-जेरियाट्रिक फिजिशियन, शिक्षणतज्ञ, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना भारतात जेरियाट्रिक मेडिसिनचे जनक म्हणून ओळखले जाते.

नटराजन  शासकीय रुग्णालय, चेन्नई येथे चिकित्सक म्हणून काम करत होते. कालांतराने त्यांनी वृद्धोपचार क्षेत्रात अनेक कामे केली.

  • शासकीय रुग्णालयात वृद्धोपचार औषध विज्ञान विभागात  बाह्यरुग्ण विभागाची स्थापना केली.
  • १० खाटांचा विभाग सुरू करून तो विकसित करण्यात यश मिळविले.
  • मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये जेरियाट्रिक मेडिसिनचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
  • जेरियाट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी एमडी अभ्यासक्रमाची सुरुवात केली.

नटराजन यांनी डॉक्टर आणि रूग्णांना वृद्धांच्या आरोग्य सेवेच्या विविध पैलूंचे प्रबोधन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वृद्धांच्या हितासाठी त्यांनी इंग्रजी आणि तमिळ भाषेत अनेक पुस्तके प्रकाशित केली. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनद्वारे ज्येष्ठ नागरिक या माहितीपटाच्या निर्मितीमध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. विलाइट इयर्स नावाच्या एका टीव्ही चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत त्यांनी तज्ञ मते मांडली. त्यांनी ज्येष्ठ नागरिक ब्युरो, चेन्नई या वृद्धांसाठी सेवा देणाऱ्या संस्थाचे अध्यक्ष म्हणून सुमारे १0 वर्षे काम केले.

नटराजन यांनी व्ही. एस. नटराजन जेरियाट्रिक फाऊंडेशन ही संस्था चेन्नईत स्थापन  केली. ही संस्था जेरियाट्रिक्स आणि जेरोन्टोलॉजी या दोन्ही शाखेत काम करते. येथे वृद्धत्व आणि वृद्ध कार्यक्षेत्रात व्यापक संशोधन केले जाते. ही संस्था वृद्धांसाठी (६0+ वर्षे) त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थिती ध्यानात न घेता त्यांना आरामदायक आणि समाधानकारक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या उपलब्ध व पायाभूत सुविधा व सेवांमधील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करते. प्रोत्साहन – समर्थन – साध्य करण्याच्या कार्यात्मक ब्रीद वाक्याद्वारे ते वृद्धांची सेवा करतात. म्हातारपण हा शाप नसून वरदान आहे – ह्या तत्त्वज्ञानावर संस्थाचे कार्य आधारित आहे. प्रतिबंधक जेरियाट्रिक्स या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यापासून ते राज्यभरात वैद्यकीय शिबिरांपर्यंत, फाउंडेशनने बरीच सेवा केली आहे. तसेच, न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी जेरियाट्रिक लसीकरण केंद्रसुद्धा सुरू केले. त्यांच्या संशोधनानुसार साठ वर्षांनंतर न्यूमोनिया लस घेतल्यानंतर दहा वर्षे न्यूमोनियापासून संरक्षण मिळते. त्यांनी चेन्नई शहरात, डॉक्टर वृद्ध रुग्णांना त्यांच्या घरी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी जातील असे जेरियाट्रिक हाउसकॉल सेवा यशस्वीरित्या सुरू केली.

निवृत्तीनंतर त्यांनी एम. जी. आर. वैद्यकीय विद्यापीठातील वृद्ध उपचार विभागात दहा वर्षे मानद प्राध्यापक या नात्याने सेवा दिली आहे. नटराजन यांना त्यांच्या कामगिरीसाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यात, बी.सी.रॉय राष्ट्रीय पुरस्कार. ब्रिटिश जेरियाट्रिक सोसायटीच्या ५0 व्या वर्धापनदिनानिमित्त सुवर्णपदक, तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता, केंद्र, राज्य सरकारे, वैद्यकीय विद्यापीठे आणि सामाजिक संस्था कडून सात जीवनगौरव पुरस्कार, तीन दशकांहून अधिक काळ वृद्धांची आरोग्य सेवा केल्याबद्दल पद्मश्री, दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध दिनी, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून वृद्धांसाठी उल्लेखनीय सेवा केलेल्या व्यक्तींना मिळणारा वायोश्रेष्ठ हा राष्ट्रीय सन्मान असे आहेत.

ते सध्या भारत सरकारच्या नॅशनल कौन्सिल फॉर ओल्डर पर्सनचे सदस्य आहेत. वृद्धांसाठी त्यांची सेवा अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारत आणि चेन्नईला जेरियाट्रिक्स मेडिसिनच्या क्षेत्रात जागतिक नकाशात स्थान मिळाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा