रानडे, माधव रघुनाथ : (३१ मार्च १९२६ – २४ डिसेंबर १९८० ) माधव रघुनाथ रानडे  यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला .त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. त्यांचे  माध्यमिक शालेय व महाविद्यालयीन शिक्षण बेळगाव येथे झाले   त्यावेळच्या उपलब्ध शिक्षणक्रमानुसार रानडे यांनी  प्राणीशास्त्र विषयात पदवी व पदव्युत्तर एम.एस्सी.चे शिक्षण मुंबई विद्यापीठातून घेतले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर तत्कालिन शासकीय व्यवस्थेप्रमाणे माधवराव  यांनी त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्यात नोकरी करू लागले. त्यांच्या संशोधनाची सुरवात त्यानी कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यजीव संशोधनाने बडोदा येथे केली. त्यांच्या हुशारीमुळे आणि संशोधक वृत्तीमुळे त्यांना वेळोवेळी बढत्या मिळत गेल्या. नंतर ते मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालयात आले. गोड्या पाण्यातील आणि सागरी जीवशास्त्रातील त्यांच्या संशोधनाची प्रगती पाहून तत्कालिन संचालकांनी त्यांना उच्च संशोधन करायला एक वर्षासाठी इंग्लंडला पाठविले. त्यानंतर ते काही काळ कोल्हापूरमध्ये  होते. तेथे त्यानी गोड्या पाण्यातील खाद्य मासे (कार्प) यांच्या प्रेरित प्रजनन प्रयोगाला सुरवात केली. त्यानंतर त्यांची बदली रत्नागिरीला करण्यात आली.

त्या काळी राज्य सरकारचे  मत्स्य व्यवसाय संशोधन केंद्र मुंबई वगळता अन्यत्र कुठेही  नव्हते. दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणाची सागरी जल परिस्थिती आणि मासेमारी भिन्न होती व आहे. त्यामुळे दक्षिण कोकणात संशोधन केंद्र उभारणे ही त्यावेळची प्राथमिक गरज होती. ही गरज ओळखून, रत्नागिरी येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र जबाबदारी  त्यावेळी सी. व्ही . कुलकर्णी आणि केवलरामाणी या महान मत्स्य संशोधकांनी रानडे यांचेवर सोपवली. पुढे १९७२ साली हे केंद्र महाराष्ट्र शासनाकडून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्यात आले. माधव यांना वाटी-मुळे (clams), तिसऱ्यावर (clams) संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली. माधव रानडे यांना  भारत सरकारची फेलो ऑफ दि अकॅडेमी ऑफ झुऑलॉजी आणि फेलो ऑफ दि रॉयल झुऑलॉजी  सोसायटी ऑफ स्कॉटलंड, इंग्लंड हे सन्मान मिळाले होते. ते इंडियन फिशरीज असोसिअशन आणि फिशरीज टेक्नोलोजिकॅल असोसिअशनच्या कार्यकारी समितीवर होते. माधव रानडे यांनी संशोधनपर  अनेक लेख लिहिले. मराठीमधून पुस्तकेही  लिहिली. मच्छिमारांच्या  मुलांना प्राथमिक शाळेपासून मासेमारीचे शिक्षण देता यावे यासाठी शासनाने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय शाळा काढण्यासाठी प्रयत्न केले. या शाळा आजही सुरू आहेत.  रानडे यांची पुस्तके मत्स्य व्यवसाय प्राथमिक शाळांना क्रमिक पुस्तके म्हणून उपयोगात येत आहेत. दक्षिण कोकणाकरीता सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पेठ किल्ला येथे सन १९५८ मध्ये  स्थापना झाले आणि  दक्षिण कोकण विभागातील सागरी मत्स्य संशोधनाची मुहूर्तमेढ माधव रानडे यांनी रोवली. माधव रानडे तेव्हा संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी म्हणून जे रत्नागिरीमध्ये आले तेव्हापासून शेवटपर्यंत ते रत्नागिरीतच होते. या मत्स्य संशोधन केंद्राचे मुख्य उद्दिष्ट सागरी मत्स्य व्यवसायाची सर्वांगीण प्रगत करणे, हे  होते आणि आजही हे उद्दीष्ट या केंद्राने कायम ठेवले आहे. त्याकाळी  मत्स्यव्यवसाय आत्ता एवढा प्रगत नव्हता. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होड्यांच्या माध्यमातून मासेमारी  चालत असे. याला ठराविक मर्यादा होत्या. यांत्रिक नौका आल्यावर त्यावर प्रशिक्षित खलाशी उपलब्ध नव्हते. तसेच मत्स्यव्यवसायात येण्याची इच्छा असणाऱ्यांना प्राथमिक शिक्षणही नसे. त्यासाठी यांत्रिक नौकेवर खालाशांसाठी सहा महिन्यांचा ( Fisheries training course) अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. हा अभ्यासक्रम  पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय नौकेसाठी कर्ज मंजूर होत नसे. त्यासाठी फिशरीज ट्रेनिंग ऑफिसर हे शासकीय पद स्वतंत्रपणे मंजूर करवून घेतले. शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्वाची बाब शासन स्तरावर मंजूर करवून घेतली ती म्हणजे अकरावी व बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान ( फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी) आणि गोड्या पाण्यातील मत्स्य पैदास (फ्रेश वॉटर फिश कल्चर) हे दोन विषय अंतर्भूत केले. माधव रानडे यांच्या कार्यामुळे  मच्छीमार समाजात त्यांना अत्यंत आदराचे स्थान मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी मत्स्य महाविद्यालय मंजूर करवून घेतले. या मत्स्यमहाविद्यालयाचे पहिले सहयोगी अधिष्ठाता / असोसिएट डीन म्हणून त्यांची नियुक्ती विद्यापीठाकडून झाली.

माधव रानडे यानी केलेल्या संशोधनातील काही महत्त्वाचा भाग म्हणजे:

१) रत्नागिरी भागात सापडणार्‍या सागरी कृमी, कीटक, प्राणी आणि मासळीची यादी तयार करणे.

२)वाटी मुळे, तिसर्‍या इ. शिंपले वर्गीय  प्राण्यावर संशोधन, मालवण येथे मोती शिंपल्यांचा शोध.

३) कोळंबीचे आंतरराष्ट्रीय महत्व ओळखून यांत्रिक नौकेचे आणि जाळ्याचे डिझाईन करून त्यांच्या सहाय्याने मासेमारीचे प्रात्यक्षिक त्यांनी मत्स्य व्यावसायिकांना दाखवले . त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला.

४) देशात पहिल्यांदा कोळंबीच्या स्थलांतरावर संशोधन केले. त्यासाठी जिवंत कोळंबीस इंजेक्शन देऊन सागरी पाण्यात सोडली. विविध ठिकाणी मासेमारी नौकाना रंगीत कोळंबी जेथे मिळाली त्यांच्या नोंदी ठेवून कोळंबीच्या स्थलांतराचा अभ्यास केला. त्यापुढील पायरी म्हणजे कोळंबी शेती. रत्नागिरीतील झाडगाव येथे पहिल्या कोळंबी फार्म सुरू केला.

५) समुद्रात तराफ्यावर कालव (Oyster) चे संवर्धन कसे करावे यावर संशोधन.

६) जिवंत मासळीच्या पिलांची वाहतूक ऑक्सीजनचा वापर करून कशी करावी यावर संशोधन. रिकाम्या डब्यात प्लास्टीक पिशवीचा वापर करून त्यात भरलेल्या ऑक्सीजनसह पिलांची वाहतूक हजारो किलोमीटर करण्याची यशस्वी प्रात्यक्षिके केली.

७) गोड्या पाण्यातील योग्य जातीच्या माशांना संप्रेरकांची इंजेक्शने देऊन त्यांना अंडी घालण्यास उद्युक्त करणे.

माधव रानडे यांच्या महत्वाच्या संशोधनामुळे महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावर मत्स्य व्यवसाय वाढीस लागला. कोळंबीची निर्यात व्हावी यासाठी नाईक मत्स्य प्रक्रिया उद्योगाचे संस्थापक एम डी नाईक रानडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत असत. मुंबई येथील तारापोरवाला मत्स्य संग्रहालय उभारण्यात रानडे यांचा महत्वाचा सहभाग होता. माधव रानडे हे केंद्र व राज्य शासनाच्या सुमारे पंचवीस मत्स्य व्यवसाय समित्यांवर कार्यरत होते. त्यांना मैदानी खेळांची आवड होती. ते उत्तम बॅडमिंग्टन, टेनिस, हॉकी व फूटबॉल खेळाडू होते.

मत्स्य संशोधक माधव रानडे यांचे  वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा