गिअरी, रॉबर्ट चार्लस : (११ एप्रिल १८९६ – ८ एप्रिल १९८३) रॉबर्ट चार्लस गिअरी यांचा जन्म आयर्लंडमधील डब्लिन इथे झाला. त्यांचे वडील डब्लिनमधील शासकीय नोंदणी कचेरीत (रजिस्टर ऑफीस) संख्याशास्त्रज्ञ होते, तर आई संगीत शिक्षिका होती. तिने त्यांना संगीत शिकवलेच पण संगीत कसे ऐकावे व त्याला दाद कशी द्यावी ह्याचीही जाण दिली.
गिअरी यांनी डब्लिनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांना विद्यार्थी म्हणून उपलब्ध सर्व पारितोषिके व मान-सन्मान मिळाले. गणित आणि गणिती भौतिकशास्त्रात प्रथम श्रेणीत पदवी संपादन केल्यानंतर तिथेच त्यांनी पुढील दोन वर्षात पदव्योत्तर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. नंतर त्यांना पॅरीसमधील सॉरबाँ प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली. पॅरीसमध्ये त्यांना गणित व पदार्थविज्ञानातील निष्णात अध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले.
डब्लिनला परत आल्यावर त्यांचे अध्यापनाबरोबर संशोधनही चालू होते. हा काळ संख्याशास्त्राच्या विकासाचा सुरवातीचा काळ होता. ह्या काळावर आर. ए. फिशर या संख्याशास्त्रज्ञाचा प्रभाव होता. त्यांनी ह्या विषयातील संशोधनासाठी Statistical Methods हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांचा गिअरी ह्यांच्यावर जबरदस्त पगडा होता.
सन १९२२ साली, आयरिश राज्याचा पाया घातला जात होता, ह्या सुरवातीच्या काळांत राज्याच्या उभारणीसाठी स्वतःला सहभागी होता यावे म्हणून इंग्लंडमधील साउथॅम्पटन विद्यापीठातील पद नाकारून गिअरींनी डब्लिनमधील उद्योग आणि व्यापार मंत्रालयातील संख्याशास्त्र विभागातील पद स्वीकारले. पुढील ३५ वर्षे ते ह्या पदावर होते. नंतर गिअरी तीन वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या सांख्यिकी कचेरीतील न्यूयॉर्क मधील राष्ट्रीय जमाखर्च शाखेचे प्रमुख होते. त्यानंतर ते डब्लिन इथे नव्याने उभारलेल्या अर्थशास्त्र संशोधन संस्थेचे (Economics Research Society) प्रमुख म्हणून परत आले. पुढे ही संस्था आर्थिक व सामाजिक संशोधन संस्था (Economic and Social Research Society) म्हणून परिवर्तीत झाली. ह्या संस्थेमध्ये संचालक आणि नंतर सल्लागार म्हणून त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत काम केले.
आयर्लंडमध्ये राष्ट्रीय संख्याशास्त्रीय सेवा उभारण्याच्या कामांत गिअरी यांनी खूप महत्वाची कामगिरी बजावली. त्यांनी परिश्रमपूर्वक स्वतंत्र सांख्यिकी सेवा खाते सुरु केले. त्यांनी राष्ट्रीय जमाखर्चाच्या (accounts) विकासात आणि इतर सांख्यिकी विषयाच्या विकासासाठी (उदाहरणार्थ, किंमती आणि राशी ह्यांचे अनेक निर्देशांक) महत्वाचे काम केले. युरोपिअन सांख्यिकीतज्ञ परिषदेचे संस्थापक या नात्यानेही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका पार पाडली.
त्यांचे १००हून अधिक शोधलेख दर्जेदार शैक्षणिक नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले. गिअरी यांच्या सगळ्या कामात, लिखाणात सांख्यिकीच्या संकल्पना जागोजागी दिसतात. संकलित केलेल्या माहिती वरून अंदाज कसा काढायचा? त्या माहितीचा एकमेकांशी संबध कसा जोडायचा? माहिती अपुरी किंवा चुकीची असेल तर गृहीतके कशी तपासायची? अशातऱ्हेने एखादा सिद्धांत तपासताना ते अनेक प्रश्न उपस्थित करत.
संशोधनात संख्यात्मक मोजणी करण्याच्या आवश्यकतेचा त्यांनी कायम पुरस्कार केला. त्यांचे बरेचसे काम सैद्धांतिक असले तरी त्याचे व्यावहारिक उपयोजन कसे होईल ह्याचा ते प्रामुख्याने विचार करत. रॉयल सांख्यिकी संस्थेच्या नियतकालिकामध्ये त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. उदाहरणार्थ, जीवशास्त्र विषयक व अर्थमिती संबधात यादृच्छिक चलसंख्याचे गुणोत्तर, चाचणी आकडेवारीची सबळता, सामान्य वितरणाची चाचणी आणि माप विषयक त्रुटीनुसार चलसंख्यामधील संबंधांचा अंदाज.
त्यांच्या सन्मानार्थ अनेक सिद्धांतांना, गुणोत्तरांना व प्रमेयांना त्यांचे नांव देण्यात आले आहे. मध्य विचलन आणि प्रमाण विचलनाच्या गुणोत्तराला गिअरी गुणोत्तर (Geary Ratio) असे म्हणतात. तर गिअरी सिद्धांत म्हणजे मध्य आणि प्रचरण (mean and variance) एकमेकांवर अवलंबून नसतील तर सामान्य प्रमाण सिद्ध होते. गिअरी-सी (Geary–C) म्हणजे विशेष स्वयंपूर्ण संबंध आकडेवारी. गिअरी–खमीस डॉलर हे आर्थिक विश्लेषणात वापरले जाणारे एक मुद्रात्मक चलन आहे. स्टोन-गिअरी उपयुक्तता फल, जागतिक स्तरावर वास्तविक उत्पन्नांची तुलना करण्याची पद्धत आणि देशाचे वास्तविक उत्पन्न आणि व्यापारातील बदल यातील संबंध मोजण्याची रीत असे गिअरींचे अर्थशास्त्रातील संशोधनही प्रसिद्ध आहे.
त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यात त्यांनी प्रकाशित केलेल्या कामासाठी आयर्लंड राष्ट्रीय विद्यापीठाकडून त्यांना D.Econ.Sc. (डॉक्टर ऑफ इकॉनोमिकल सायन्स) ही सन्मानीय पदवी, बेल्फास्ट क्विनस विद्यापीठाची डॉक्टरेट, रॉयल डब्लिन संस्थेच्या बॉयल (Boyle) पदकाचे मानकरी असे आहेत. डब्लिनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या सार्वजनिक धोरण संस्थेला गिअरी यांचे नाव देण्यात आले.
संदर्भ :
- https://www.encyclopediaofmath.org/index.php/Help:Contents
- http://www-groups.dcs.st-and.ac.uk/history/Biographies/Geary.html
- http://stochastikon.no-ip.org:8080/encyclopaedia/en/gearyRoy.pdf
- https://link.springer.com/chapter/10.1007/978-1-4613-0179-0_98#page-1
समीक्षक : विवेक पाटकर