कोन्स, एलेन : (१ एप्रिल, १९४७-) फ्रांसमधील ड्रॅग्विग्नन येथे जन्मलेल्या कोन्स ह्यांनी इकोल नॉर्मल सुपिरिअर (आता युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस मध्ये समाविष्ट) येथून पदवी व जॅक्वेस डीक्सीमीर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. पदवी मिळवली. त्यासाठी परिकर्मी बैजिकी, विशेषतः व्हॉन न्यूमन अल्जिब्रा या विषयात त्यांचे संशोधन होते. ‘अ क्लासीफिकेशन ऑफ फॅक्टर्स ऑफ टाईप ३’ हे त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक होते. त्यासंदर्भात विभेदक गुणक (इंजेक्टिव फॅक्टर्स) यांचे पूर्ण वर्गीकरण करण्यातही त्यांना यश मिळाले. या विषयातील विभिन्न संकल्पनांचे कोन्स यांनी पुढे एकत्रीकरणदेखील केले. परिकर्मी-के उपपत्ती (ऑपरेटर के-थिअरी) आणि निर्देशक उपपत्ती (इंडेक्स थियरी) मधील त्यांच्या कार्याची परिणीती बॉम-कोन्स अटकळ (बॉम-कोन्स कंजक्चर) या गणिती उत्पत्तीत झाली. त्याशिवाय विकलक भूमितीचे उपयोजन ह्याबाबतीतही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

चक्रीय प्रतिसमजातता (cyclic cohomology) ही एक नवी संकल्पना मांडून अक्रमनिरपेक्ष (Non-commutative) विकलक भूमिती ह्या विषयाचा विकास करण्यात कोन्स यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्याचबरोबर अंकशास्त्र, परमाणु भौतिकशास्त्र आणि सापेक्षतावाद सिद्धांत यामधील गणिती समस्या सोडवण्यातही त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांचे त्या संदर्भातील निष्कर्ष भौतिकशास्त्रावर दूरगामी परिणाम करणारे मानले जातात.

कोन्स यांनी नॅशनल सेंटर फॉर साइंटिफिक रिसर्च, पॅरिस येथे संशोधन संचालक, क्वीन्स विद्यापीठ, किंग्सटन, ऑन्टारियो, कॅनडा, यूनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस इत्यादी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्यापन केले आहे. सध्या ते इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड साइंटिफिक रिसर्च, फ्रान्स, कॉलेज द फ्रान्स, पॅरिस आणि व्हॅंडरबिल्ट यूनिव्हर्सिटी, अमेरिका येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

परिकर्मी बैजिकी या विषयातील उल्लेखनीय कार्याबद्धल कोन्स यांना गणितातील नोबेल पारितोषिक असे मानले जाणारे फील्ड्स मेडल, रॉयल स्वीडिश अकादमी तर्फे क्रेफूर्ड पुरस्कार, सी. एन. आर. एस. रौप्य व सुवर्ण पदक, ॲम्पिअर प्राईज आणि क्ले रिसर्च अवॉर्ड असे अनेक जागतिक कीर्तीचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्यांच्या नावावर २०० हून अधिक शोधलेख आणि ८ पुस्तके आहेत. त्यामध्ये नॉनकम्यूटेटीव जिऑमेट्री आणि प्रसिद्ध चेताशास्त्रज्ञ (न्यूरोबायोलॉजिस्ट) जीन पिएरे चेन्जेक्स यांच्याबरोबर लिहिलेल्या कॉन्वर्सेशन्स ऑन माइंड, मॅटर अँड मॅथेमॅटिक्स  ह्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे.

कोन्स ह्यांना क्वीन्स विद्यापीठ, कॅनडा, रोम टॉल वर्जेटा विद्यापीठ, इटली आणि ओस्लो विद्यापीठ, नॉर्वे यांनी मानद डॉक्टरेट् प्रदान केल्या आहेत. त्याशिवाय ते आर्ट्स अँड सायन्स अमेरिकन अकॅडेमी, युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि रशियन अकॅडेमी ऑफ सायन्सचे सभासद म्हणून निवडून आलेले आहेत. तीन वेळा त्यांना इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅथेमॅटिक्सतर्फे विशेष वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले.

गणितज्ञाने आयुष्यभर आपले कार्यक्षेत्र केवळ एक संकल्पना किंवा शाखेपुरते मर्यादित न ठेवता गणिती जगताचा व्यापक अभ्यास करावा असा कोन्स यांचा सल्ला आहे. त्यांच्या मते सकृतदर्शनी काही साम्य नसलेल्या आणि दूरवर पसरलेल्या गणितातातील विविध शाखा एकमेकांशी जोडलेल्या आहेत, कारण गणितात एक प्रकारचे मूलभूत ऐक्य आहे. म्हणून प्रयत्न करत राहिल्यास त्या शाखांतील संबंध समजू शकतात, जे गणिताचा विकास आणि त्याचे उपयोजन करण्यास मदतशीर ठरतील.

संदर्भ :

 

 समीक्षक : विवेक पाटकर