चिकित्सक सिद्धांतांची मांडणी करणारा एक प्रमुख संप्रदाय. सामाजिक घटनांचे विश्लेषण विविध सिद्धांताद्वारा केले जाते. मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांताना तत्कालीन समाजाच्या आवश्यकतेनुसार संशोधित करून पुनर्मांडणी करण्याचे कार्य चिकित्सक सिद्धांत (क्रिटिकल थिअरी) करतात.

फ्रँकफर्ट इन्स्टिट्युट फॉर सोशल रिसर्चची स्थापना इ. स. १९२३ मध्ये कार्ल ग्रुनबर्ग यांनी जर्मनी येथे केली. प्रारंभीच्या काळात या संस्थेला फेलिक्स वैल यांनी आर्थिक मदत केली. या संस्थेने सामाजिक जीवनाच्या क्षेत्रात संशोधन कार्याला जे वैचारिक प्रतिरूप व आकृतीबंध दिला, तो पुढे फ्रँकफर्ट स्कूल म्हणून नावारूपास आला. फ्रँकफर्ट स्कूल हा जर्मन-अमेरिकन तत्त्ववेत्यांचा असा गट आहे, ज्याने मार्क्स यांच्या सैद्धांतिक मांडणीनंतर पाश्चिमात्य भांडवली समाजात घडून आलेल्या बदलांचे विश्लेषण प्रभावी पद्धतीने मांडले. या संप्रदायाच्या अग्रणी विचारकांमध्ये मॅक्स होर्खाइमर, थिओडोर अडोर्नो, हरबर्ट मार्कझ, एरीक फ्रॉम, कार्ल कोर्श, व्हाल्टर बेन्यामीन आणि युर्गेन हाबरमास यांचा समावेश होतो.

फ्रँकफर्ट संप्रदायाच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये जॉर्ज ल्युकाज यांचे हिस्ट्री अँड क्लास कॉन्शियनेस व कार्ल कोर्श यांचे मार्किझम अँड फिलोसॉफी ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली. या सेमिनारमध्ये मार्क्सवादाच्या परंपरागत स्वरूपावर चर्चा होऊन त्याला कृतिशिलतेची, क्रांतीची जोड देणे महत्त्वाचे आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. हीच पुढे फ्रँकफर्ट स्कुलची वैचारिक दिशा राहिली.

जर्मनीमध्ये हिटलरच्या उदयानंतर या संस्थेच्या कार्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे इ. स. १९३३ मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये या संस्थेला स्थलांतरित व्हावे लागले. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या पतनानंतर इ. स. १९४९ मध्ये ही संस्था पुन्हा फ्रँकफर्ट येथे स्थापित करण्यात आली. या संप्रदायाचे मुख्य अध्ययन विषय ज्ञानमिमांसा, मार्क्सवाद आणि संस्कृती हे होते; पण या संप्रदायाच्या विद्वानांनी अमेरिकेमध्ये वंशवाद आणि पूर्वग्रह यांसारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण संशोधन कार्य केले आहे.

आंतरविद्याशाखीय हे फ्रँकफर्ट स्कुलचे अंत्यत महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. या स्कुलमध्ये असलेले विचारवंत विविध विद्याशाखांचे होते. फ्रँकफर्ट स्कुलचा मूळ विचार मार्क्स यांचे भांडवशाहीवरील विवेचन आणि वेबर यांचे आधुनिक समाजातील विवेकीकरणावरील विवेचन यांवर आधारित होता. वेबर आणि मार्क्स यांबरोबरच सिग्मंड फ्रॉइड यांच्या मनोविश्लेषण सिद्धांताचा या स्कुलच्या विचारवंतावर प्रभाव होता. चिकित्सक सिद्धांत तात्कालीन समाजाची चिकित्सा करतात आणि त्याच वेळी समाजशास्त्रीय सिद्धांतांनादेखील चिकित्सात्मक दृष्टीने पाहतात.

फ्रँकफर्ट स्कुलचा संबंध प्रबोधनकाळाशी आहे. या स्कुलचे विचारवंत प्रबोधनकाळातील घडामोडींनी प्रभावित होते; परंतु त्यांनी प्रबोधनकाळावर केलेले समीक्षात्मक विवेचन अतिशय महत्त्वाचे आहे. थिओडोर अडोर्नो यांनी मॅक्स होर्खाइमर सोबत लिहलेले डायलेटिक ऑफ इन्लाइटन्मेंट (प्रबोधनाची द्वंद्वात्मकता) हे पुस्तक फ्रँकफर्ट स्कुलच्या तत्त्वज्ञानाचा गाभा स्पष्ट करणारे आहे.

एरिक फ्रॉम यांच्या प्रमाणेच हरबर्ट मार्कस यांनी फ्राईड व मार्क्स यांच्या विचारांचा आधार घेत व्यक्तीच्या कामात्मकतेचे सविस्तर विश्लेषण केले आहे. मार्कस हे फ्रँकफर्ट स्कुलच्या विचारधारेचे पुरस्कर्ते असल्याने यांनी आपल्या वन डिमेन्शिअल मॅन या पुस्तकात प्रगत औद्योगिक समाजातील भांडवलशाही व्यवस्थेवर कडवटपणे टीका केली आहे. त्याच बरोबर समाजवादी क्रांतीच्या मार्क्सवादी सिद्धांताचे खंडन केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांवर आधारित समाजाची दार्शनिक बाजू मांडली. औद्योगिक समाज कृत्रिम गरजांना जन्म देतो, ज्या व्यक्तींना उत्पादन आणि उपभोगाच्या व्यवस्थेत विलीन करतात. जनसंचाराची साधने, संस्कृती, जाहिराती, औद्योगिक व्यवस्थापन आणि आधुनिक विचारांची दिशा हे सर्व विद्यमान व्यवस्थेला यथास्थित ठेवतात. इतकेच नव्हे, तर ते सर्व चिकित्सा व विरोधी विचारांनाही समाप्त करतात. परिणामी विचार व व्यवहाराचे ‘एकसाची विश्व’ जन्म घेते. यामुळे समाजातील चिकित्सात्मक चिंतन आणि विरोध करण्याची प्रवृत्ती व क्षमतांचा ऱ्हास होतो.

फ्रँकफर्ट स्कुलने मार्क्सवादाला एक नवे रूप दिले, जे ‘नवमार्क्सवाद’ या नावाने ओळखले जाते. नवमार्क्सवादी सिद्धांतकार मार्क्स यांच्या ऐतिहासिक विश्लेषणाच्या मांडणीचे समर्थन करतात; परंतु मार्क्स यांचे विचार झापडबंद पद्धतीने न वाचता टीकात्मक दृष्टिकोणातून वाचले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. समाजाचा अभ्यास करताना केवळ आर्थिक घटकांवर लक्ष केंद्रित न करता सांस्कृतिक घटकही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी भूमिका ते मांडतात. नवमार्क्सवाद्यांसाठी मार्क्सवादाचे महत्त्व ‘चेतनेच्या चिकित्सक विश्लेषणा’मध्ये निहित आहे. यासाठी ते ‘मिथ्या चेतना’ (फॉल्स कॉन्शिअसनेस) आणि ‘परात्मक चेतना’ (अलायनेटेड कॉन्शिअसनेस) या संकल्पनांची पुनर्व्याख्या करतात. चिकित्सक सिद्धांताचे समर्थक विद्वान असे मानतात की, सामाजिक विश्लेषणाचे उद्दिष्ट जाणिवेची व्याख्या करणे आणि कोणकोणत्या उत्पादन संबंधामुळे कोणत्या प्रकारच्या सामाजिक व्यवस्था जन्म घेतात व त्याची नैतिक प्रकृती काय आहे, हे स्पष्ट करणे आहे.

फ्रँकफर्ट स्कुलने विकसित केलेले चिकित्सक सिद्धांत हेगेल व मार्क्स यांच्या सैद्धांतिक परंपरेतीलच आहेत. या संप्रदायाच्या तत्त्ववेत्यांनी मार्क्स आणि हेगेल यांच्या द्वंद्वात्मक पद्धतीचा स्वीकार केला आहे. ते समाजाच्या आर्थिक व्यवस्थेची भूमिका स्वीकारतात आणि प्रत्यक्षवादाला नाकारत तथ्यांना मूल्यांपासून वेगळे करतात. फ्रँकफर्ट स्कुलला विकसित करणाऱ्या सिद्धांतकारांनी दृढपणे अशी मांडणी केली की, सिद्धांत व क्रिया या परस्परांना पूरक असाव्यात, त्यामध्ये अंतर नसावे. सिद्धांत असे असले पाहिजे की, जे क्रिया करणाऱ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण करतील व क्रिया सिद्धांतांमध्ये परिवर्तन घडवणारी असावी.

फ्रँकफर्ट संप्रदायाच्या उदय-विकासासाठी वेबर यांची तर्कसंगतता व नोकरशाहीच्या विकासाची मांडणी, पहिल्या महायुद्धानंतर विकसित झालेला फॅसीझम, स्टॅलीनवादाचा उदय व मार्क्सवादाची पुनर्मांडणी ही काही महत्त्वाची कारणे होय.

फ्रँकफर्ट संप्रदायाचे प्रारंभी अर्थव्यवस्था, मानसशास्त्र, संस्कृती आणि तत्कालीन भांडवलशाही समाज यांतील संबंध स्पष्ट करू शकेल अशी सैद्धांतिक मांडणी करण्याचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी तत्कालीन भांडवलशाही समाज व प्रचलित सिद्धांतांचे विवेचन फ्रँकफर्ट स्कुलच्या सिद्धांतकारांनी मांडले. ते सिद्धांत चिकित्सक सिद्धांत म्हणून ओळखले जातात.

फ्रँकफर्ट स्कुलने इ. स. १९३० च्या दशकात संस्कृती आणि संप्रेषण अध्ययनांमधील चिकित्सक दृष्टिकोन विकसित केला. ज्यामध्ये सामाजिक पुनुरुत्पादन आणि वर्चस्व यात जनसंस्कृती आणि संप्रेषणाचे महत्त्व अधोरेखीत केले. तसेच सांस्कृतिक उत्पादन आणि राजकीय अर्थव्यवस्था, सांस्कृतिक साहित्याचे राजकारण इत्यादी घटकांच्या विश्लेषणाच्या प्रतिमानाची मांडणी केली. औद्योगिक उत्पादनाच्या धर्तीवर सांस्कृतिक घटकांची निर्मिती त्यांचे वस्तुकरण व प्रमाणीकरण करण्याच्या प्रक्रियेला उद्देशून त्यांनी ‘संस्कृती उद्योग’ ही संकल्पना मांडली. मार्क्सवादी दृष्टिकोणात क्रांतीचे माध्यम असणाऱ्या कामगार वर्गावर महाकाय समाज (मास सोसायटी) व नव्याने निर्माण होणाऱ्या उपभोगवादी समाजाच्या परिणामाचे परीक्षण फ्रँकफुर्ट संप्रदायाच्या विचारकांनी प्रथमच करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तंत्रज्ञान व संस्कृतीचा सहसंबंध विशद करताना तंत्रज्ञान कशाप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक संस्था निर्मिती व सामाजिक नियंत्रणाचे साधन बनते याची मांडणी केली. फ्रँकफर्ट स्कुलने उपभोगवादी समाजात परंपरागत संस्कृतीचे आधुनिकतेकडे कसे संक्रमण होते, याचे महत्त्वाचा ऐतिहासिक दृष्टिकोण प्रदान केला आहे. संस्कृती उद्योगाने मोठ्या प्रमाणावर उत्पादित संस्कृती उत्पादने व एकसंघ इच्छा-आकांक्षा याचे विश्लेषण केले आहे. फ्रँकफुर्ट स्कुलच्या दृष्टीने जनसंस्कृती ही उपभोगाच्या उत्पादनांप्रती स्वप्ने, आकांक्षा, भय व अंतहीन इच्छा निर्माण करते.

फ्रँकफर्ट स्कुलच्या विचारवंतांनी मार्क्सवादी तत्त्वज्ञानामध्ये मोलाची भर घातली. चिकित्सात्मक विचारांचा त्यांनी सर्जनशील वापर करून आधुनिक पाश्चात्त्य समाजाचे खरे स्वरूप स्पष्ट केले. थोडक्यात, अठराव्या शतकातील प्रबोधनाच्या प्रकल्पातील आधुनिकतेची संकल्पना नाकारून द्वंद्वात्मकतेचे तर्कशास्त्र स्वीकारून पहिल्या महायुद्धानंतरच्या वर्तमानकालीन इतिहासाला भिडण्याकरिता चिकित्सक सिद्धांताचा जन्म झाला.

संदर्भ :

  • चौसाळकर अशोक, मार्क्सवाद आणि उत्तरमार्क्सवाद, पुणे,२०१०.
  • Adams, Bert N.; Sydie, R. A., Sociologicial Theory, New Delhi, 2001.
  • Bottomore, Thomas Burton, The Frankfurt School and its critics, New York, 2002.
  • Haralambos, M., Sociology Theams and Perspectives, New Delhi, 1980.
  • Cuff, E.C., Sharrock, W.W., Francis, D.W., Perspectives in Sociology, London, 1990.
  • Ritzer, George, The Sociological Theory, New York, 2011.
  • Wiggershaus, Rolf, The Frankfurt School : Its History, Theories, and Political Significance, USA, 1994.

समीक्षक : मधुरा जोशी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.