सर्वसाधारणपणे सत्ता म्हणजे शक्ती अथवा ताकद होय. राज्यशास्त्रानुसार ‘सत्ता म्हणजे एखादी व्यक्ती, समूह किंवा संस्था यांची दुसऱ्या व्यक्ती, समूह किंवा संस्थेवर प्रभाव पाडण्याची क्षमता होय’. राजकीय व सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनी सत्ता आणि सत्तासंबंध यांच्या वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून व्याख्या केल्या आहेत. अमेरिकन राजकीय अभ्यासक हेरॉल्ड लास्वेल यांच्या मते ‘अधिबलनाचा धाक दाखवून इतरांची धोरणे आपल्या इच्छेनुसार बदलण्याची प्रक्रिया म्हणजे सत्ता होय’. राजकीय विचारवंत रॉबर्ट डाल यांच्या मतानुसार ‘एकाची दुसऱ्यावर प्रभाव पडण्याची क्षमता म्हणजे सत्ता होय’. बर्ट्रंड रसेल या तत्त्वज्ञानुसार, ‘अपेक्षित परिणाम घडवून आणण्याची क्षमता म्हणजे सत्ता होय’.

‘अ’ ची ‘ब’ वर सत्ता आहे, असे म्हटल्यास त्यातून तीन अर्थ प्रकट होतात : (१) ‘अ’ हा आपली इच्छा ‘ब’ वर लादतो आणि ‘ब’ च्या निर्णय व कृतींवर परिणाम करतो. (२) ‘अ’ जवळ ‘ब’ कडून अपेक्षित निर्णय आणि कृती करून घेण्याची क्षमता असते. (३) ‘अ’ ला अपेक्षित निर्णय व कृती करण्यास ‘ब’ ने विरोध दर्शवल्यास तो मोडून काढण्याची क्षमता ‘अ’ जवळ असते. ‘अ’ आणि ‘ब’ हे अभिकर्ता व्यक्ती, समूह, संस्था यांपैकी कोणीही असू शकतात आणि त्यांच्यातील सत्तासंबंध राजकीय, आर्थिक, वैचारिक अशा स्वरूपांमध्ये प्रकट होत असतात.

सत्तेची वैशिष्ट्ये :

  • सापेक्ष सत्ता : मानवी समाजामध्ये अथवा संस्थांमध्ये सत्तेची भूमिका सार्वत्रिक असली, तरी सत्ता ही स्थळ, काळ, व्यक्ती व परिस्थिती सापेक्ष असते. उदा., सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितींत बदल झाला की, सत्तासंबंधामध्ये बदल होतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व चीनचे राष्ट्राध्यक्ष दोघेही आपापल्या राष्ट्रांचे प्रमुख असले, तरी दोघांच्या सत्तेच्या आवाक्यात फरक आहे.
  • संबंधात्मक सत्ता : दोन किंवा अधिक व्यक्तींच्या संबंधांतून सत्ता अभिव्यक्त होते. एखाद्या व्यक्तीकडे सत्ता गाजवण्याच्या भरपूर क्षमता असूनही जर तो समाजातील इतर व्यक्तींशी संबंध निर्माण करत नसेल, तर तेथे सत्ता स्पष्ट होत नाही. सत्ता कोणावर तरी गाजवावी लागते.
  • वर्तनात्मक सत्ता : जो सत्ता गाजवतो, तो सत्ताधारक आणि ज्याच्यावर सत्ता गाजवली जाते, तो सत्ताग्राहक अशा दोघांच्या वर्तनातून सत्ता व्यक्त होत असते. उदा., राजकीय सत्तेने घेतलेला नोटबंदीचा निर्णय सामान्य जनतेवर कसा परिणाम करतो, हे जनतेच्या बदललेल्या वर्तणुकीतून प्रतीत होते.
  • प्रसंगविशिष्ट सत्ता : पदामुळे व्यक्तीला सत्ता मिळते. पदावर नसताना त्या पदाशी संबंधित सत्तेचा वापर व्यक्ती करू शकत नाही. म्हणजेच पदानुसार, प्रसंगाप्रमाणे सत्ता मिळते. नियुक्त केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सरकारी धोरणे व योजना राबवण्याची सत्ता असते; परंतु तोच अधिकारी पदमुक्त अथवा बडतर्फ  झाल्यास सत्ता गमावतो व संबंधित कार्य करू शकत नाही.
  • मर्यादा सत्ता : एका मर्यादेपलीकडे कोणी अनियंत्रितपणे सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे विपरित परिणाम संभवतात. शासनाने अनियंत्रित सत्ता गाजवल्यास जनता शासनाचा प्रतिकार करते व शासन उलथून टाकते. रशियात इ. स. १९१७ मध्ये जनतेने झारचा केलेला सत्तापालट याचे बोलके उदाहरण आहे.

सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता परस्परसंबंध : एखाद्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त झाल्यास त्या सत्तेचे रूपांतर अधिसत्तेमध्ये होते. अधिमान्यता म्हणजे लोकांनी सत्तेला दिलेली मान्यता व स्वीकृती असते. एखाद्या कायद्याला अथवा नियमाला तेव्हाच अधिमान्यता मिळते, जेव्हा लोक त्या कायद्याला स्वतःसाठी व समाजासाठी उपयुक्त समजतात आणि त्याचे पालन करण्यास तयार होतात. अधिसत्ता ही सत्तेपेक्षा श्रेष्ठ ठरते; कारण तिच्यात सत्ता आणि लोकांची मान्यता दोन्हीही अतंर्भूत असतात. सूत्रामध्ये हे परस्परसंबंध असे सांगता येतील,

अधिसत्ता = सत्ता + अधिमान्यता

जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांनी अधिसत्तेचे पारंपरिक, दिव्यवलयी आणि वैधानिक अशा तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे. पारंपरिक अधिसत्तेचा उगम प्रथा व परंपरांतून होतो. अनुवंशिकतेनुसार राजाचा मुलगा राजा होणे अथवा धर्माच्या मान्यतेने राजाची निवड होणे पारंपरिक अधिसत्तेचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीच्या अलौकिक व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन लोक त्या व्यक्तीच्या आज्ञा पाळतात. यातून दिव्यवलायी अधिसत्ता तयार होते. जगाच्या पाठीवर याची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतील. लेनिन, माओ, हो ची मिन्ह, फिडेल कॅस्ट्रो ही काही मोजकी उदाहरणे आहेत. वैधानिक अधिसत्तेचा स्रोत कोणाचे व्यक्तित्व नसून राजकीय पद असते. घटनात्मक नियम व कायदे यांद्वारा निर्माण केलेल्या पदावर जोपर्यंत असेल तोपर्यंतच वैधानिक अधिसत्ता गाजवता येते. आधुनिक राज्यातील नोकरशाही याचे उत्तम उदाहरण आहे.

सत्तेची संरचना : सत्ता म्हणजे काय, सत्तेचे कार्य व उद्देश काय असतात, समाजामध्ये व राजकरणात सत्तेची भूमिका काय असते या मुद्द्यांवरून राज्यशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये व विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. यातून सत्तेच्या संरचनेचा उलगडा करणारे विविध सिद्धांत व मीमांसा यांची मांडणी झाली.

(१) वर्ग वर्चस्व सिद्धांत : हा सिद्धांत मार्क्सवादी दृष्टिकोणाचा भाग आहे. यात संपत्तीच्या मालकीवरून समाजामध्ये निर्माण झालेल्या धनवान आणि निर्धन अशा दोन वर्गांच्या आधारावर सत्तेचे विश्लेषण केले जाते. आर्थिक संरचेनेतूनच सत्तेचा उगम होतो, हा या सिद्धांताचा गाभा आहे. कार्ल मार्क्स यांच्या मते, आदिम समाज वगळता इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यातील समाजात उत्पादन साधनांची मालकी असणारा अल्प वर्ग आणि त्यांची सेवा करणारा बहुसंख्य वर्ग असे दोन वर्ग आढळतात. उत्पादन साधनांची मालकी असणारा वर्ग सत्ताधारी असतो, तर दुसरा वर्ग सत्ताग्राहक. नंतरच्या नवमार्क्सवादी विचारवंतांनी, ‘सत्तेचा उगम संपत्तीच्या मालकीतूनच नाही, तर विचार, मूल्य व संस्कृतीतून होतो अशी मांडणी केली’. अन्तोनिओ ग्राम्शी यांची धुरीणत्वाची मांडणी, लुई अल्थ्यूजर यांची विचारधारात्मक राज्ययंत्रणेची मांडणी आणि स्टुअर्ट हॉल यांचे प्रसारमाध्यमातील सत्तेचे विश्लेषण, हे नवमार्क्सवादी सिद्धांतनाचे आविष्कार आहेत.

(२) अभिजनवादी सिद्धांत : मार्क्सवादाने संपत्तीच्या आधारावर वर्ग विभाजन केले. अभिजनवाद वर्ग विभाजनाला स्वीकृती देतो; परंतु त्याचा आधार भिन्न आहे. समाजात कोणत्याही संघटनेमध्ये सगळे महत्त्वपूर्ण निर्णय काही मोजके लोकच करतात आणि बाकीचे त्या निर्णयांचे अनुसरण करतात, ही या सिद्धांताची मुख्य मांडणी आहे. यातून समाजात अथवा संघटनेत अभिजनवर्ग आणि जनपुंज अशा दोन वर्गाची निर्मिती होते. अभिजन वर्गाचे सदस्य हुशारी, बुद्धिमत्ता, संघटनकौशल्य इत्यादी गुणांमुळे समाजात प्रभाव निर्माण करतात व स्वतःच्या योजना व कल्पनांची अंमलबजावणी करतात. जनपुंज सदस्यात नेतृत्वगुण व जबाबदारीच्या जाणिवेचा पूर्ण अभाव असतो; त्यामुळे ते अभिजनांच्या मताप्रमाणे वागतात. अशाप्रकारे समाजात अभिजन सत्तेचा सामान्य लोकांवर (जनपुंज)  प्रभाव राहतो. सत्ताबदल झाला, तरी तो अभिजानांमध्येच होतो. विल्फ्रेडो परेटो, गीतानो मोस्का, रॅाबर्ट मिशेल्स इत्यादी अभ्यासक या सिद्धांताचे प्रवर्तक आहेत.

(३) स्रीवादी सिद्धांत : लिंगभावाच्या आधारावर सत्तेचा वापर व वितरण कसे होते, याची मांडणी या सिद्धांताद्वारे केली गेली आहे. यात पितृसत्ता हे समाजाचे प्रमुख लक्षण मानले आहे. पितृसत्तेमध्ये पुरुषांना मिळणारे फायदे त्यांना वर्चस्ववादी बनवतात, तर स्त्रियांना दुय्यमत्व देतात. सूक्ष्म पातळीवरील स्त्री-पुरुष संबंध, कुटुंब संस्था ते विस्तृत पातळीवरील समूह, समाज, राज्यसंस्था यांतील सत्तासंबंधांची बारकाईने चिकित्सा करून सर्व प्रकारची सत्ता पुरुष गाजवत असतात व महिला सत्ताग्राहक असतात अशी मांडणी स्त्रीवादाची आहे. १९६९ सालच्या न्यूयॉर्क रेड घोषणापत्रात स्रियांना शोषित वर्ग मानण्यात आले व पुरुषांना स्री शोषणाचे मूळ म्हणून अधोरेखित करण्यात आले. जे जे खाजगी ते ते राजकीय अशी भूमिका घेऊन समाजात स्री-पुरुष समानता यावी या हेतूने त्यांच्यातील सत्तासंबंधांची क्रांतीकारी पुनर्रचना व्हावी, अशी गरज हा सिद्धांत मांडतो. सिमोन दि बुवा, बेल हुक, कॅरोल हॅनिच इत्यादी विदुषींचे योगदान या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे.

(४) मिशेल फूकोंची सत्तामीमांसा : मिशेल फूको या उत्तरसंरचनावादी विचारवंताने सत्तेचे नवीन आकलन पुढे आणले. सत्ता संरचनेचे इतर सिद्धांत सत्ता आणि राज्यव्यवस्थेचा संबंध जोडून विश्लेषण करतात; परंतु फूकोंच्या सत्तामीमांसेत राज्यसंस्थेला गौण स्थान असून राज्यसंस्थेव्यतिरिक्त कुटुंबसंस्था, लैंगिकता, रुग्णालये, कैदखाने यांमधील सूक्ष्म पातळीवरील सत्तासंबंधांचे अधोरेखन करण्यात आले आहे. राज्यसंस्था अथवा उत्पादनव्यवस्था यांसारख्या कोणत्याही संरचनेत सत्ता उगम पावत नाही किंवा केंद्रित होत नाही, तर ती बहुकेंद्री व सर्वव्यापी असते. समाजाच्या सर्व उपांगांमध्ये सत्तासंबंधांचा संचार असतो, असे फूकोंचे विवेचन आहे. ज्ञानव्यवहारातून सत्तेची घडण होते आणि सत्तेच्या नियंत्रणातून ज्ञानव्यवहाराची घडण होते. सत्ता व ज्ञान यांचे संबंध परस्परपूरक असल्याने ‘ज्ञान म्हणजेच सत्ता’ अशी मांडणी फूको करतात. इतर अभ्यासकांनी सत्तेची दंडात्मक, दमनकारी अशी नकारात्मक चिकित्सा केली आहे; परंतु फुको सत्तेची सकारात्मकता, उत्पादकता व समाजातील आवश्यकताही प्रतिपादन करतात. समाजामध्ये जिथे सत्तासंबंध निर्माण होतात, तिथे प्रतिकाराचीही निर्मिती होत असते. सत्ता व प्रतिकार यांचा विस्तार एकमेकांवर अवलंबून असतो. प्रतिकाराची ताकद वाढल्यास तो सत्तेची जागा घेतो; यातूनच सत्तेचे अभिसरण होत असते, हाही फूकोंच्या सत्तामीमांसेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

संदर्भ :

  • भोळे,भास्कर लक्ष्मण, राजकीय सिद्धांत आणि विश्लेषण, नागपूर, १९८८.
  • Gauba, O. P., An Introduction to Political Theory, Delhi, 2008.
  • Gutting, Gary, Foucault : A Very Short Introduction, New York, 2005.
  • Scott, John, Sociology : Key Concepts, New York, 2006.

समीक्षक : महेश गावस्कर