अध्ययनार्थी समाजाच्या संपर्कात येणे आणि त्यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियेतून ज्ञाननिर्मिती करणे म्हणजे सामाजिक रचनावाद. विसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानरचनावाद ही विचारप्रणाली अस्तित्वात आली. ‘प्रत्येक व्यक्ती स्वत:चे ज्ञान स्वत: निर्माण करत असते’ हे तत्त्वज्ञान आणि ‘व्यक्तिला आकलन कसे होते’, हा आकलनशास्त्राने घेतलेला शोध यांतून सामाजिक रचनावाद ही प्रणाली अस्तित्वात आली.

सामाजिक रचनावाद आणि आकलन रचनावाद हे शिकण्याच्या प्रक्रियेविषयीचे दोन सिद्धांत आहेत. या सिद्धांतांमुळे ज्ञानरचनावाद ही शैक्षणिक विचारप्रणाली नव्याने शिक्षणक्षेत्रात उदयास आली. मानसिक पातळीवर ज्ञाननिर्मिती कशी होते, याची प्रक्रिया उलगडून दाखविणारे संशोधन झां प्याजे आणि पेरी या दोन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ-शिक्षणशास्त्रज्ञांनी केले आहे. हा आकलन रचनावादाचा पाया आहे. या सिद्धांताने शिकण्याची प्रक्रिया ही व्यक्तीगत असते. ती व्यक्तीच्या वयाच्या परिपक्वतेवरही अवलंबून असावी, यावर भर दिला आहे. लेव्ह सेमेनोव्हिच व्योगोट्स्की, जॉन ड्यूई, ब्रुनर या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ-शिक्षणशास्त्रज्ञांनी व्यक्तिच्या ज्ञाननिर्मिती प्रक्रियेत समाजाची भूमिका काय असते, हे मांडले आहे. शिकणे ही व्यक्तीगत तशीच सामाजिक प्रक्रिया आहे. समाजाबरोबर होणाऱ्या आंतरक्रियेतून व्यक्ती स्वतंत्रपणे ज्ञाननिर्मिती करीत असतो. शिकण्याच्या प्रक्रियेत सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ, भाषा इत्यादी घटक महत्त्वाचे कार्य पार पाडीत असतात. या विचाराने सामाजिक रचनावादाची भूमिका तयार झाली असून रचनावादी विचारप्रवाहाचा अधिक विस्तार सामाजिक रचनावादाने केला आहे. माणसाचा विकास हा समाजातच होत असतो, या तत्त्वावर सामाजिक रचनावाद हा सिद्धांत मांडला आहे.

व्योगोट्स्की, ड्यूई, अल्बर्ट बंडुरा, ब्रुनर या विचारवंतांच्या विचारांनी सामाजिक रचनावाद सिद्ध झाला आहे. व्योगोट्स्की यांनी इ. स. १९३० च्या सुमारास आपला सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत (सोशल कल्चरल थिअरी) मांडला. ड्यूई यांनी आपल्या प्रागतिक शिक्षण पद्धतीत विचार मांडताना ‘सामाजिक समुदाय, शिक्षकांचा समुदाय, अध्यनार्थ्यांचा समुदाय हे शिकणाऱ्याच्या ज्ञानाची रचना करण्यास मदत करीत असतो’ असे म्हटले आहे. समाजातील विविध संदर्भांचे, व्यवसायांचे अनुभव मुलांस दिल्यास ते शिकू शकतील, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केले. बंडुरा यांनी १९८७ मध्ये सामाजिक आकलन सिद्धांत (सोशल कॉग्निशन थिअरी) मांडला. व्यक्तीचे वर्तन व विचार हे त्याला समाजातून मिळणाऱ्या अनुभवाच्या प्रभावातूनच तयार होत असतात. हा त्यांच्या विचारांचा प्रमुख धागा होता. ब्रुनर यांनी शिकणे ही सक्रीय सामाजिक प्रक्रिया आहे; तसेच शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचा सक्रीय संवाद व चर्चा घडल्या, तर त्यांतून मिळणाऱ्या प्रेरणा, विचार यांतून ज्ञानाची निर्मिती होते, असे ब्रुनर यांचे मत आहे.

व्योगोट्स्की यांच्या ‘सामाजिक सांस्कृतिक सिद्धांता’त सामाजिक रचनावादाची मुळे आहेत. शिकणे ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, हा त्यांच्या विचारांचा मुख्य आशय होता. माणसाच्या बुद्धीमत्तेची बिजे समाज आणि संस्कृतीतच आहेत. समाजाशी होणारी आंतरक्रिया हीच व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचा पाया आहे, असे व्योगोट्स्की यांचे मत आहे. शिकण्यासाठीची मानसिक साधनेही समाजातूनच माणसाला मिळत असतात. प्रभावी भाषेतून ज्ञानग्रहणाची प्रक्रिया वेगाने घडत असते. शिकण्याची प्रक्रिया ही ’दुसऱ्याबरोबर होणारी आंतरक्रिया’ आणि ‘व्यक्तीची अंतर्गत विचार प्रक्रिया’ या दोन स्तरांवर घडत असते. लोकांशी संपर्क होणे, बाह्य जगाचे अनुभव मिळणे, माहिती मिळणे इत्यादी शिकण्याच्या प्रक्रियेतील पहिले स्तर आहे. व्यक्तीला मिळणारे नवीन अनुभव आणि त्या अनुभवाशी सुसंगत पूर्वानुभव व पूर्वज्ञान यांची सांगड घातली जाते. त्यातून विचार सुरू होतो. ही आकलन करून घेण्याची व माहितीचे रूपांतर ज्ञानात घडण्याची प्रक्रिया व्यक्तीगत घडत असते. या मनात घडणाऱ्या प्रक्रियेला व्योगोट्स्की यांनी ‘दुसऱ्या स्तरावर घडणारी व्यक्तीची अंतर्गत प्रक्रिया’ असे संबोधतात. हीच व्यक्तिची ज्ञाननिर्मिती होय.

मुलांना स्वप्रयत्नाने ‘विकासाचा अवकाश प्रदेश’ (झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट – झेडपीडी) आकलनाच्या पातळीवर काही गोष्टी साध्य करता येत असतात. त्या कोणत्या हे शिक्षकाने ओळखून मुलाच्या पर्याप्त क्षमतेपर्यंत त्याला पोहोचण्यास मदत करणे ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. यालाच व्योगोट्स्की झेडपीडी असे म्हणतात. शिकणाऱ्याला येणारी अडचण दूर करण्यासाठी ती क्षमता प्राप्त केलेला समवयस्क, शिक्षक, पालक कोणीही मदत करू शकतात. स्वप्रयत्नाने शिकणे आणि मदतीने शिकणे या प्रक्रियेला ते ‘विकासाचा अवकाश प्रदेश’ असे संबोधतात. व्योगोट्स्की यांच्या या विचाराने सामाजिक रचनावादाच्या दोन बाजू स्पष्ट होतात. एक, शिक्षण समाजामध्ये होत असते आणि दोन, ते समाजाच्या मदतीने होत असते.

शिक्षण समाजामध्ये होत असते, याचा अर्थ व्यापक आहे. निसर्गत: व्यक्ती जन्मापासून अनेकांच्या संपर्कात वाढत असतो आणि या संपर्कातूनच तो प्रत्येक गोष्ट शिकत असतो. व्यक्तीला समाजातून असंख्य अनुभव मिळत असतात. व्यक्तीव्यक्तींमध्ये विविध क्रिया-प्रतिक्रिया घडत असतात. सजीव आणि निर्जीव जगातील प्रत्येक बाबीची ओळख, वैशिष्ट्ये, परस्पर साहचर्य हे दुसऱ्याबरोबरच्या आंतरक्रियेतूनच व्यक्तीने समजून घेतलेली असतात. समाजातून मिळणाऱ्या अनुभवातून व्यक्तीची भाषा, पूर्वग्रह, विचार, श्रद्धा, समज अथवा गैरसमज, विश्वास तयार होत असतो. एका व्यक्तीची दुसऱ्या एका किंवा अनेक व्यक्तींबरोबर जेव्हा आंतरक्रिया घडत असते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती या सर्व संदर्भांसह दुसऱ्या व्यक्तीबरोबर संवाद साधत असतो. यातून नकळतपणे वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक संदर्भांबरोबर आंतरक्रिया घडत असते. या प्रक्रियेत विचाराच्या अनेक बाजू स्पष्ट होतात. नव्या अनुभवाचा अर्थ लावताना, प्रश्न सोडविताना, पर्याय निवडताना सामाजिक आंतरक्रिया साहाय्यभूत होतात. शिकण्यासाठीची मानसिक संरचना व शिकण्याची मानसिक साधने ही सामाजिक आंतरक्रियेतूनच विकसित होत असतात. म्हणूनच समाजाशी आंतरक्रिया करण्याचे जितके जास्त प्रगल्भ वातावरण शिकणाऱ्याला मिळेल, तितका व्यक्तीचा बौद्धिक विकास सखोल आणि वेगाने व्हायला मदत होते.

समाजातून मिळणारे अनुभव आणि समाजाबरोबर होणारी आंतरक्रिया यांतून ‘ज्ञान निर्माण होण्याची प्रक्रिया घडत असते’ हे लक्षात घेतले, तर शिकण्याची ही सहजप्रक्रिया पुढे औपचारिक शिक्षण प्रक्रियेत हेतुपुरस्सर आणणे योग्य ठरते. शिकण्याची प्रक्रिया अधिकाधिक वेगवेगळ्या समूहात घडली पाहिजे. विद्यार्थ्यांचे लहान-मोठे समूह, विद्यार्थी आणि शिक्षकसमूह, विद्यार्थी आणि समाजसमूह अशा गटांतून हेतुपुरस्सर आंतरक्रिया घडविल्यास त्या उपयुक्त ठरतात. वर्गामध्ये गट अध्ययन, चर्चा, वादविवाद स्पर्धा इत्यादींचे आयोजन केल्याने यांमधून विद्यार्थांमधील ज्ञाननिर्मितीची क्रिया समृद्ध करता येते.

सामाजिक रचनावादासाठी सहकारातून शिक्षण, समस्याधारित शिक्षण, चौकशी आधारित शिक्षण, शोधातून शिक्षण आणि प्रकल्पतंत्र ही उपयुक्त अध्ययन तंत्रे आहेत. त्याच बरोबर सामाजिक रचनावादाची तीन गृहिते आहेत. एक, ज्ञानाची निर्मिती व्यक्तीच्या मानसिक पातळीवर तयार होत असते. दोन, व्यक्तीचा बाह्य विश्वाशी येणाऱ्या संपर्कातून ज्ञानाची निर्मिती होते. तीन, शिकणे ही सामाजिक प्रक्रिया आहे.

शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांचे लहान-मोठे गट तयार करावेत. त्यांना या गटांतून शिकायला संधी देऊन एकमेकांच्या साहाय्याने गटातच नव्या संकल्पना समजून घ्यायलाही प्रोत्साहित करावे. पाठ्यक्रमातील आशय रोजच्या अनुभवांशी, समाजात येणाऱ्या संपर्काशी जोडून विद्यार्थांना अप्रत्यक्षपणे त्या अनुभवाची प्रचिती करून द्यावी. दैनंदिन व्यवहारातील प्रश्न, समस्याही मुलांसमोर ठेवून त्याबाबत मुलांमध्ये चर्चा घडवून त्यांना विचारप्रवृत्त करावे. चर्चा सखोल व सर्व बाजू लक्षात घेऊन होईल यासाठी बारकाईने प्रश्न विचारावेत. अशा प्रश्नांच्या उत्तरांतून चर्चा योग्य दिशेने पुढे सरकेल आणि मुलांना समस्या सोडवणुकीकडे जाता येईल याकडे लक्ष ठेवावे. मुलांना स्वत:च्या कामाचे व गटातील कामाचे मूल्यमापन करण्याची सवय लावावी. तसेच शिक्षकानेही सर्व प्रक्रियांचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्याबाबत प्रतिसाद द्यावा इत्यादी.

सामाजिक रचनावादामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे होतात. त्यामध्ये सामूहिक रीत्या किंवा गटातून शिकण्यामुळे एकमेकांच्या मदतीने आकलनातील अडचणी दूर होऊ शकतात. लहान गटात विद्यार्थ्यांना आपला विचार आत्मविश्वासाने मांडता येतो. त्यामुळे शिकण्याचा उत्साह  वाढतो. शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या चर्चेत प्रत्येकाला आपले प्रश्न, विचार, कल्पना मांडता व तपासून पाहता येतात. गटामुळे विचार करण्याच्या क्रियेस वेग येऊ लागतो. सहकार्याने विचारात स्पष्टता आणता येते. चर्चा करताना माहितीचे, विचारांचे संघटन करता येते. मिळालेल्या माहितीचे रूपांतर ज्ञानात करता येते. एखाद्या समस्येचा सर्वांनी मिळून विचार करताना समस्या निवारणाचे अनेक पर्याय लक्षात येतात. अचूक पर्याय निवडण्यासाठीची चिकित्सक व विश्लेषक विचार करण्याची तंत्रे अवगत होतात. कोणताही प्रश्न वा माहिती असो, त्यावर सखोल विचार करण्याची सवय रुजते आणि सखोल अध्ययन घडते. सर्वांसोबत विचार करताना स्वत:च्या भावनांवर स्वनियंत्रण करायला मदत होते. यातून सहकाराचे मूल्य रुजते इत्यादी.

संदर्भ : पानसे, रमेश, रचनावादी शिक्षण.

समीक्षक : रघुनाथ चौत्रे