सातत्यपूर्ण चालणारी शिक्षण प्रक्रिया. निरंतर शिक्षणामध्ये माणूस जन्मपासून मरेपर्यंत शिकत असतो. विसाव्या शतकाच्या आरंभापासून पाश्चात्त्य देशांत निरंतर शिक्षण योजना वेगवेगळ्या स्वरूपात सुरू झाली. निरंतर शिक्षणाचा प्रेरक स्वतःच शिकणारी व्यक्ती असते. ज्ञानाचा स्फोट, लोकसंख्या वाढ आणि व्यावसायिक शिक्षणाचा स्फोट यांमुळे निरंतर शिक्षणाची आवश्यकता वाढत आहे. निरंतर शिक्षणात व्यक्ती औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण घेत असतो. शिक्षणासाठी शाळेत न जाता दैनंदिन अनुभवातून शिक्षण मिळत असते. शिक्षणाच्या सर्व स्तरांव्यातिरिक्त जे शिक्षण मिळते, त्याचा निरंतर शिक्षणात समावेश होतो.
मानवी जीवनात ज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. ज्ञानाधिष्ठित समाजात टिकून राहण्यासाठी आजीवन शिक्षण गरजेचे असते. निरंतर शिक्षणात कोणतेही स्तर नसून गरजेनुसार शिक्षणात बदल होत असतो. निरंतर शिक्षणात व्यक्तीभेद असल्यामुळे व्यक्ती आपला वैयक्तिक विकास साधत असतो.
उद्दिष्टे : निरंतर शिक्षण आत्मसात करत असताना काही महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आढळून येतात. (१) व्यक्ती आपले जीवनमान उंचावणे, साक्षरता कौशल्य टिकविणे, राष्ट्रीय व सामाजिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे यांसाठी प्रयत्न करतो. (२) शिक्षणातून व्यक्तीस स्वतःची आर्थिक स्थिती व उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होते. (३) शिकणाऱ्या समाजाची म्हणजेच एका नव्या पिढीची निर्मिती होते. (४) नवनवीन सांस्कृतिक व मनोरंजक उपक्रम निर्मिती करण्यास निरंतर शिक्षण मदत करते. (५) निरंतर शिक्षण प्रौढांसाठीही खुले असते. (६) अद्ययावत माहिती व कौशल्ये प्राप्ती यांसाठी निरंतर शिक्षण उपयुक्त ठरते इत्यादी.
निरंतर शिक्षणाचे केंद्र समाजातच असून लोकच लोकांसाठी ते चालवितात. हे केंद्र स्थानिक समूहाच्या गरजेप्रमाणे असते. तसेच १० ते १५ निरंतर शिक्षण केंद्राच्या गटासाठी एक मध्यवर्ती केंद्र असते. या केंद्रामध्ये प्रौढ शिक्षण दिले जाते. त्यात ग्रंथालय, वाचनालयास पुरेशी जागा, पुरेशा भौतिक सुविधा, प्रकाश, संगणक, स्वच्छतागृहे, दूरदर्शन, रेडिओ, वर्तमानपत्रे इत्यादी सोयीसुविधा असतात. निरंतर शिक्षणक्रमामध्ये वाचनासंबंधित सायंकालीन वर्ग, चर्चा मंडळे, क्रीडा व साहस उपक्रम, संपर्क केंद्र, प्रशिक्षण कार्यक्रम माहिती केंद्र असते. निरंतर शिक्षण ही शिक्षणशास्त्रातील एक आधुनिक कल्पना आहे. औपचारिक शिक्षणव्यवस्थेच्या प्रचलित स्वरूपात विशिष्ट वयोगटासाठी, ठराविक जागी, ठराविक वेळी, ठराविक अभ्यासक्रम शिकविण्याची सोय या शिक्षणात असते. तथापि, व्यक्तिगत विकास व सामाजिक उन्नती ही शिक्षणाची सर्वसामान्य उद्दिष्टे साध्यतेची प्रक्रिया निरंतर चालूच असते. या निरंतर प्रक्रियेशी सुसंगती राखण्यासाठी शिक्षणव्यवस्था हीदेखील निरंतर असावी लागते, असा हा शिक्षणशास्त्रातील नवा विचार आहे.
पूर्वी नव्याने निर्माण होणारे व्यक्तिगत सामाजिक प्रश्न आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे विषय पारंपरिक धर्मसंस्थांकडून हाताळण्यात येत होते. तथापि, आधुनिक काळात वैज्ञानिक-तांत्रिक प्रगतीमुळे, तसेच सामाजिक शास्त्रांच्या विकासामुळे समाजाच्या व व्यक्तीच्या नवनवीन अपेक्षांना आणि अडचणींना तोंड देण्यासाठी निरंतर शिक्षण हे विशेष ठरले आहे. विशेषतः गतिमान सामाजिक परीसराशी व्यक्तीला जे समायोजन साधावे लागते, त्यासाठी अशा शिक्षणाची गरज असते. औपचारिक शिक्षणव्यवस्था कितीही अद्ययावत आणि कार्यक्षम असली, तरी व्यक्तीच्या व समाजाच्या अमर्याद गरजांच्या तुलनेत ती मर्यादित असते. या परिस्थितीत शिकण्यासाठी विविध संस्थांचा आणि साधनांचा उपयोग करून घेण्याची क्षमता मिळविणे व कसे शिकावे हे शिकणे महत्त्वाचे ठरते. यासाठी अनौपचरिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठे अशा कल्पना पुढे आल्या. यातूनच निरंतर शिक्षण ही एक नवीन कल्पना उदयास आली. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक लोकांना उच्च शिक्षण घेता येत नाही. आधुनिक तंत्रशिक्षण मिळविता येत नाही. विविध कारणांमुळे शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागते. ग्रामीण भागातील लोकांना विशेषतः स्त्रियांना मनात असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रौढ वयात शिकावे असे वाटले, तरी औपचारिक शिक्षणव्यवस्था उपलब्ध असतेच असे नाही. अशा सर्व व्यक्तींना निरंतर शिक्षण योजेनेखाली कोणत्याही वयात शिक्षण घेता येते. याद्वारे अनेक अभ्यासक्रम लोकांच्या सोयीनुसार उपलब्ध केले जातात. परीक्षा किंवा पदवी हे ध्येय न ठेवता ज्ञान संपादन आणि कौशल्यप्राप्ती हीच उद्दिष्टे ठेवली जातात. विद्यार्थी स्वतःच्या सोयीनुसार आणि गरजांनुसार विषय निवडतात.
भारतामध्ये निरंतर शिक्षण ही योजना १९६० च्या सुमारास प्रथम राजस्थान विद्यापीठात सुरू झाली. त्यानंतर अनेक विद्यापीठांमध्ये हा शिक्षण कार्यक्रम सुरू केला गेला. भारतामध्ये १९७७-७८ या शैक्षणिक वर्षाअखेरीस सुमारे १५ विद्यापीठांत ही योजना अंमलात होती. पुणे विद्यापीठात १९७६-७७ या शैक्षणिक वर्षी सुमारे १,५१४ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेखाली विद्यापीठ अनुदान मंडळ, भारत सरकार, राज्य सरकार यांच्याकडून साहाय्यता निधी पुरविला जातो. काही विद्यापीठांत स्व-अंतर्गत निधीतून या योजनेवर खर्च करण्यात येतो. काही वेळा विद्यापीठ व त्याच्यासाठी संलग्न असलेली महाविद्यालये यांच्या संयुक्त जबाबदारीवर विविध अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठांनी यासाठी वेगळ्या व्यवस्थापकीय समित्या नेमलेल्या असून शिक्षणशास्त्राच्या प्राध्यापकांची विभागप्रमुख म्हणून सामान्यतः नेमणूक केलेली असते. अभ्यासक्रमाच्या स्वरूपाप्रमाणे शुल्क असते. जास्त खर्चाच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ अनुदान देते. अशीच तरतूद ग्रामीण विभगातील व दुर्बल घटकांसाठी आखलेल्या अभ्यासक्रमांच्या बाबतीत असते. व्यवस्थापकीय समिती वा महाविद्यालये प्राध्यापकांच्या नेमणुकी करतात आणि योजनेत काम करणाऱ्या प्राध्यापकांना मानधन दिले जाते. वर्गाची योजनादेखील सोयीनुसार केली जाते. उदा., शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी अथवा सायंकाळी हे वर्ग घेतले जातात. सर्वच बाबतीत निर्बंध कमीत कमी करून शिक्षणाचा आवश्यक दर्जा सांभाळून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चागली सेवा दिली जाते. अर्थातच, निरंतर शिक्षणाच्या जोडीला नेहमीची औपचारिक शिक्षणव्यवस्था असते.
समीक्षक : अनंत जोशी