संगणकाविषयी शिकण्याची किंवा शिकविण्याची प्रक्रिया. यात संगणक प्रणालीचे मूलभूत ज्ञान, कौशल्ये, कल्पना आणि संगणक प्रणालीशी संबंधित मूलभूत शब्दावलींचा समावेश होतो. संगणक शिक्षण हे उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित ज्ञान आणि समज वाढवून त्यांचा सराव विस्तारित करते. तंत्रज्ञानाच्या जगात संगणकासंबंधातील मूलभूत गोष्टी शिकणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी, तसेच सर्वांगीण विकासात संगणक शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. आजच्या युगात संगणक आणि आंतरजालाचा वापर दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. जवळजवळ सर्व व्यवसाय, कारखाने, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य विभाग, आर्थिक क्षेत्र, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँकिंग क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर व शिक्षण महत्त्वाचे ठरत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या स्वरूपामुळे समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि निर्देशानुसार कार्य करण्यासाठी संगणक शिक्षणाची मदत होत आहे. एकविसाव्या शतकात संगणक शिक्षण हे शिक्षणाचे अविभाज्य अंग बनले असून संगणकाने जवळजवळ प्रत्येक क्षेत्र व्यापलेले दिसते.

संगणकाचे फायदे आणि तोटे, संगणक प्रणालीची क्षमता, दैनंदिन जीवनातील विविध समस्या सोडविण्यासाठी संगणकाचा वापर कसा करता येईल किंवा समस्या सोडविण्यासाठी संगणकाचा प्रोग्राम कसा करता येईल यांचा समावेश संगणक शिक्षणात होतो. तांत्रिक शिक्षणाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. त्यात संगणक महत्त्वाची भूमिका बजावित आहे. शिक्षणक्षेत्रात अध्यापन-अध्ययनासाठीदेखील संगणकाचा एक उपयुक्त शैक्षणिक साधन म्हणून वापर केला जातो. संगणक शिक्षणामुळे शाळेतील शैक्षणिक प्रशासकीय सेवेत सहजता येते. संगणक शिक्षणामुळे शाळेतील कामे संगणकाच्या साह्याने लवकर व अचूक करण्यास मदत होते. शालेय आरोग्य तपासणीसंबंधी माहिती साठवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची खूप मदत होते.

दृक-श्राव्य माध्यमांमध्ये आलेखिकी (ग्राफिक्स) आणि सचेतनीकरणाच्या (ॲनिमेशन) साहाय्याने प्रभावी व आकर्षक व्यंगचित्रे (कार्टून्स), रेखाचित्रे, त्रिमितीय चित्रे, खेळ इत्यादी संगणकाद्वारे निर्माण केली जातात; मात्र त्यासाठी आधी त्यासंदर्भातले शिक्षण संगणकाच्याच माध्यमातून घ्यावे लागते. भाषा, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे इत्यादी विषयांतील शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती संगणक शिक्षणाद्वारे करता येते. संगणकाच्या साहाय्याने स्वयंअध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते. क्रमान्वित अध्ययन पद्धतीचा वापर करता येतो. स्वगतीने विद्यार्थ्यास कुठल्याही घटकाचे अध्ययन करणे सुलभ जाते. मानव विकासाच्या अवस्थेसंबंधी चित्रे, संबंधित शास्त्रज्ञांची चित्रे, पाठ घटकांतील आवश्यक चित्रे व नकाशे यंत्रांच्या साहाय्याने क्रमवीक्षण ( स्कॅनिंग) करून संगणकावर साठवून त्याचा गरजेनुसार अध्यापनात वापर करता येतो. शालेय प्रयोगशाळेत संगणकाचा प्रभावी उपयोग करून प्रात्यक्षिक कृतीद्वारे अध्ययन अनुभव देता येतो. संदर्भज्ञानासाठी व मूल्यमापनासाठीदेखील माहिती संप्रेषण तंत्राचा प्रभावी उपयोग करता येतो आणि हे सर्व तेच करू शकतात, जे संगणकाचे शिक्षण घेतलेले आहे. विविध शैक्षणिक व व्यावहारिक संदर्भ आंतरजालाच्या मदतीने मिळविता येतात. संगणक व तत्रंज्ञान क्षेत्रांत नोकरीच्या खूप संधी असून त्यासाठी संगणक शिक्षण अनिवार्य आहे.

संगणक आणि आंतरजाल हे विद्यार्थ्यांना केवळ सर्जनशील आणि कल्पनाशक्तीचे अन्वेषण करण्यास मदत करीत नाही, तर तंत्रज्ञान समजून घेण्यासदेखील मदत करीत असते. विद्यार्थी कोणत्याही देशासाठी एक महत्त्वपूर्ण घटक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये संगणक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते प्रयोगशाळेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांपर्यंत प्रत्येकाला संगणकाची व संगणक शिक्षणाची मदत होते. विद्यार्थ्यांना माहिती नसलेल्या विषयांवर संशोधन करण्यासाठी किंवा प्रकल्प करण्यासाठी संगणक शिक्षण उपयोगी ठरते. संगणक शिक्षणामुळे तंत्रज्ञान वृद्धिंगत होण्यास चालना मिळते. आज बहुतेक तंत्रज्ञान संगणक प्रणालीवर अवलंबून असून मूलभूत विद्युतीय उपकरणांपासून खगोलशास्त्रीय उपकरणांपर्यंत प्रत्येक गोष्टींसाठी संगणकाची आवश्यकता असते. संगणक शिक्षण व्यक्तीची कार्यक्षमता वाढविते. तसेच उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत करते. कामे वेळेत व सुलभ करण्यासाठी संगणकाचा प्रत्येक क्षेत्रात वापर केला जात आहे.

संगणकाला मेंदू नसतो. तो स्वत:हून निर्णय घेऊ शकत नाही. त्याला मानवी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. संगणकामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच डोळ्यांवर जास्त परिणाम होतो. जे संगणक अकार्यक्षम आहेत आणि ते दुरुस्त केले जाऊ शकत नाहीत, असे संगणक अजैविक कचरा म्हणून जमा होतात. संगणक प्रणालीचे असे काही तोटे असले, तरी तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगणक व संगणक शिक्षण आवश्यक झाले आहे.

समीक्षक : के. एम. भांडारकर