मानवी जीवनातील एक उपयोजित कौशल्य. गोंधळून टाकणाऱ्या अनेक समस्या सोडविणे आणि कठीण परिस्थितीतून मार्ग शोधून काढणे हे मानवात असणारी क्षमता आणि कौशल्यांद्वारे शक्य होते. निर्माण झालेल्या समस्यांचे उपलब्ध पर्यायांतून योग्य पर्याय निवडण्याचे कौशल्य वापरून त्या समस्यांचे निराकरण करण्यात येते. समस्या म्हणजे अडचण, जीवनात येणारी कठीण परिस्थिती. जीवनातील समस्या सकारात्मक पद्धतीने सोडविण्यासाठी समस्या निराकरण कौशल्य उपयुक्त ठरते. समस्या सोडविता आल्या नाही, तर मानसिक आरोग्य बिघडते. त्याचा परिणाम शारीरिक आजारांतून दिसून येते. म्हणून समस्या लवकर कशी सोडविता येईल, याचा विचार होणे आवश्यक असते. जीवन कौशल्ये अनेक आहेत. त्यांपैकी जागतिक आरोग्य संघटनेन दहा जीवन कौशल्ये सांगितले असून त्यांपैकी समस्या निराकरण कौशल्य हे एक आहे.
पायऱ्या ꞉ समस्या निराकरणाच्या पुढील महत्त्वपूर्ण पायऱ्या आहेत ꞉
- समस्या काय आहे, हे निश्चित करणे.
- समस्या सोडविण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, हे पहाणे.
- प्रत्येक पर्यायामध्ये गुण-दोष कोणते आहेत, हे निश्चित करणे.
- निश्चित केलेल्या पर्यायांमधून सर्वांत चांगल्या पर्यायाची निवड करणे.
- योग्य पर्याय निवडूनही बरेचदा व्यक्ती अपयशी ठरू शकते. अशा वेळी निराश न होता योग्य विश्वासू व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन नवीन पर्यायाची निवड करणे इत्यादी.
समस्या ही लहान असो की, मोठी त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला मार्ग शोधण्याची आवश्यकता असते. आपल्या समस्या आपण कितपत परिणामकारकपणे आणि कार्यक्षमतेने सोडवू शकतो, यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते. काही व्यक्तींच्या दृष्टीने छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा चिंताजनक समस्या असू शकतात. आपली इच्छा पूर्ण होत नाही, हे लक्षात आल्यावर काही व्यक्ती अती भावनाशील होतात व रडताना दिसतात. काही लहान मुले खेळणे मिळाले नाही म्हणून तणावाखाली जातात किंवा रडू लागतात. व्यक्ती जसजशी मोठी होत जाते, तसतशी तिची गरज व समस्या वाढत जातात. त्याच बरोबर अनुभवाने समस्या सोडविण्याचे कौशल्येही त्या व्यक्तीला प्राप्त होत असते; पण ते प्रत्येकालाच जमेल असे नाही.
समस्या निर्माण होण्याची काही कारणे ꞉
- एखाद्याची आर्थिक परिस्थिती बिकट असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या असतात.
- काही व्यक्तींना काम हे ओझं वाटत असल्यामुळेदेखील समस्या निर्माण होतात.
- काही व्यक्तींना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काम दिले असेल आणि त्यांच्याने ते करणे शक्य नसेल, तर त्यांना त्याचा मानसिक व शारीरिक त्रास होतो.
- एखाद्या व्यक्तीला शिक्षणाची खूप आवड असते; पण पालकांना शिक्षणाचे महत्त्व नसल्यामुळे ती व्यक्ती आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
- काही व्यक्तींना घरतील कामाचा ताण येतो. त्यामुळेदेखील समस्या निर्माण होतात.
- काही मोठ्या भावांना आपल्या लहान भावडांना सांभाळणे कठीण वाटते. म्हणून समस्या निर्माण होते.
- काही शिक्षकांना शैक्षणिक साहित्य अपुरे पडत असल्याने समस्या निर्माण होतात. तसेच स्वतःस शैक्षणिक साहित्य चांगल्या पद्धतीने तयार करता येत नसेल, तर त्यांच्या समस्येत भर पडत जाते.
- काही मुलांना घर ते शाळा ये-जा करताना दोन्हीमधील अंतरामुळे त्रास होऊन, समस्या निर्माण होते.
- काही लोकांना शेतीविषयक अधिक कामे असल्यानेदेखील समस्या निर्माण होतात इत्यादी.
परिणाम ꞉ निर्माण होणाऱ्या समस्या वेळेवर सोडविल्या नाहीत, तर त्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
- सामाजिक दर्जा कमी होण्याची शक्यता असते.
- काही मुलांचे शिक्षण खंडित होऊ शकते.
- राहणीमानावर परिणाम होतो.
- आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते.
- गरिबीमुळे लहान मुले बालमजुरीकडे किंवा गुन्हेगारीकडे वळू शकतात.
- अभ्यासात काही विद्यार्थी मागे पडू शकतात.
- अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नावड निर्माण होऊ शकते.
- कौटुंबिक समस्यांमुळे मुले शालाबाह्य होतात इत्यादी.
प्रक्रिया ꞉
- समस्या निर्माण झाली की, वैयक्तिक पातळीवर शांतपणे विचार करणे आवश्यक असते.
- समस्या सोडविण्यासाठी समस्येला प्राधान्यक्रम देऊन त्या समस्यांची यादी करावी.
- समस्या निर्माण झाल्यावर ती का निर्माण झाली? याची कारणे शोधावे. कारणांचा शोध घेतल्यानंतर त्यांचे निराकरण करणे कठीण जात नाही.
- समस्या निर्माण होणाऱ्या कारणांचा शोध घेऊन त्या कारणांचा सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक कारणाचे तुकडे तुकडे करून विश्लेषण केले पाहिजे. त्याने समस्येवर काहीतरी उपाय निघू शकतील. म्हणून समस्येचे पृथक्करण करावे लागेल.
- समस्येवरील कारणांचा शोध घेतल्यानंतर समस्येचे पृथक्करण करून समस्येवर मात करण्यासाठी विविध उपाय शोधले पाहिजे. उदा., पाणी टंचाई असेल, तर पाणी कोठून उपलब्ध होईल? कोणाला सांगावे लागणार? दुसरीकडे व्यवस्था होईल का? गावातील सर्व पाणी संपून गेले आहे का? शासनाची मदत घेता येईल का? पाण्याचे टँकर मागविता येतील का? इत्यादी.
समस्येवर वैयक्तिक पातळीवर विचार केला की, ती समस्या सोडविण्याची निश्चित दिशा सापडते. समस्यांची यादी करता येते, ती समस्या कोणत्या कारणाने निर्माण झाली याचा शोध घेता येतो आणि विविध पर्याय शोधले जातात. त्या विविध पर्यायांपैकी निश्चित उपयोगी एक उपाय निवडला जातो व समस्या सोडविली जाते. निवडलेल्या उपायाची अंमलबजावणी केली जाते. यावरून निवडलेल्या उपायाचे मूल्यमापन करता येते. उपाय यशस्वी झाल्यास तो स्वीकारता येतो. यशस्वी न झाल्यास अन्य पर्याय विचारात घेतले जाऊन सर्वोत्तम उपाय मिळेपर्यंत हे चक्र सुरू राहते.
समस्या ही लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनाच असते. केवळ तिचे स्वरूप भिन्न भिन्न असते. त्यामुळे मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या त्यांच्या पालकांनी किंवा शिक्षकांनी न सोडविता ते स्वत꞉च कसे सोडवतील याचे कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित करणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पुढील उपाय महत्त्वाचे ठरू शकतात ꞉
- मुलांना व्यक्त होऊ देणे ꞉ मुलांचे मन कोवळे असते आणि मेंदू नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी क्रियाशील असतो. परीसरातील सर्व गोष्टी त्यांच्यासाठी नवीनच असतात. त्यामुळे मुले वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सारखे शाळेत (शिक्षकांना) किंवा घरी (पालकांना) विविध प्रश्न विचारत असतात, सतत बोलत असतात. अशा वेळी त्यांना आपले मत व्यक्त करू दिले पाहिजे. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींची माहिती होईल. अशा वेळी ते कौशल्यांचा वापर करून त्यांच्यावर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास पात्र होतील.
- मुलांच्या विचारांना चालना देणे ꞉ एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रथमत꞉ विचार करणे आवश्यक असते. तेव्हाच तीचे निराकरण करता येते. त्यामुळे मुलांमध्ये समस्या निराकरण कौशल्य निर्माण व्हावे, यासाठी त्यांना विचार करण्यास भाग पाडणारे छोटी छोटी कामे द्यावीत. उदा., पझल गेम, सुट्टीचे नियोजन इत्यादी.
- क्रियात्मक विचार ꞉ मुले जास्तीत जास्ती सर्जनशील विचार करावी, यासाठी त्यांना वेगवेगळी खेळणी, शैक्षणिक व तांत्रिक साधने द्यावीत. त्या साधनांसोबत खेळतांना ते साधन कशा प्रकारे काम करतो, असे केले, तर तसे होईल का अशा प्रकारे क्रियात्मक विचार मुलांमध्ये निर्माण होईल. तसेच घराची स्वच्छता करताना घरात ठेवलेल्या वस्तूंच्या जागेत काही बदल करावेत का यासाठी त्यांना सहभागी करून घ्यावेत.
- चुका करू देणे ꞉ मुलांना सुरुवातीस एखादी नवीन गोष्ट करताना तिच्याबद्द पूर्वानुभव नसल्यामुळे ते चुकत असतात. अशा वेळी त्यांना न रागवता समजून सांगावे, ज्यामुळे ते भविष्यात चुका टाळतील.
- नियोजन करण्यास लावणे ꞉ कोणतीही समस्या ही सांगून येत नसते. त्यामुळे आकस्मात आलेल्या समस्यांना न घाबरता त्या कशा सोडवाव्यात, याबाबतच्या नियोजनाबद्दल त्यांना अवगत करावे.
उपयोजन : समस्या निराकरण विविध मार्गांनी आणि नवनवीन पद्धतींचा वापर करून करता येते.
- भूतकाळातील चुकांमधून बोध घेऊन समस्या सोडविता येतात.
- एका वेळी अनेक समस्या समोर आल्या, तर त्यांची प्राधान्यक्रमानुसार रचना करणे हितावह ठरते.
- त्यानंतर एका वेळी एक समस्या घेऊन तिचा पूर्णपणे विचार करणे आवश्यक असते. समस्या गुंतागुंतीची असेल, तर त्यामध्ये अनेक लहान लहान समस्या समाविष्ट असतात. त्यामुळे प्रत्येकामागील करणे शोधावी लागतात.
- नंतर शक्य उपयांचा विचार करून शेवटी सर्वांत उत्तम संभाव्य उपाय निवडता येतो.
- समस्या जाणून घेणे, तिचा अर्थ समजून घ्यायला शिकणे, समस्येची कारणे शोधणे, सर्व शक्य असणारे पर्याय विचारात घेणे, योग्य पर्याय निवडून तो कृतीतून अंमलात आणणे, पर्यायाचे मूल्यांकन करणे या सर्व बाबी आणि कौशल्ये समस्या निराकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
समीक्षक ꞉ के. एम. भांडारकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.