वर्गात एखाद्या विषयाच्या घटकावर मिळालेला प्रकल्प स्वातंत्र्य, स्वावलंबन, कृतिशीलता, सहकार्य या तत्त्वांच्या आधारे सामूहिक किंवा वैयक्तिकरित्या सोडविण्याची एक पद्धत. अठराव्या शतकामध्ये यूरोपात वास्तूकला व अभियांत्रिकी या शाखांचे अध्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे प्रथमतः प्रकल्पपद्धतीचा उपयोग केला गेला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ विल्यम किलपॅट्रिक यांनी शिक्षणशास्त्रामध्ये प्रकल्पपद्धतीचा विस्तार केला. प्रकल्पपद्धती ही प्रसिद्ध तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्यूई यांच्या कार्यवाद या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. ‘कृतीद्वारे शिक्षण’ हे या पद्धतीचे खास वैशिष्ट्य मानले जाते. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकाची कमीत कमी मदत घेऊन समस्या सोडवावी, अशी अपेक्षा असते. शिक्षक हा ज्ञान व माहिती पोहोचविणारा, यापेक्षा सुविधादाता म्हणून त्याच्याकडे अधिक पाहिले जाते. प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या इंद्रियांद्वारे शोध लावण्याची व वातावरणाचा अनुभव घेण्याची परवानगी दिली जाते.
कोणताही प्रकल्प सामाजिक किंवा नैसर्गिक वातावरणात मनापासून केलेला हेतूपूर्ण क्रिया असून तो वास्तविक जीवनाचा एक भागच असतो. प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी मुक्त वातावरणात अध्ययन करतो. त्याचे अध्ययन कृतिशील, सहेतुक व स्वतः केलेले असते; मात्र त्यामध्ये विद्यार्थाला काही समस्या निर्माण झाल्यास तो आई-वडिल, बहिण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, शिक्षक इत्यादींच्या साह्याने सोडवीत असतो. नैसर्गिक वातावरणात कृती करत असल्याने कोणत्याही प्रकारचे दडपण त्यांच्यावर नसते. विद्यार्थी गटागटाने काम करीत असल्यामुळे त्यांच्यात परस्पर सहकार्य, सामुदायिक शिस्तपालन या गुणांचा विकास होतो. प्रकल्पपद्धती गणित, विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण इत्यादी विषयांच्या अध्यापनासाठी उपयुक्त ठरते. समवायीद्वारे ज्ञानप्राप्ती होत असल्यामुळे इतर विषयांच्या प्रकल्पाशी निगडित माहिती मिळते. प्रत्यक्ष अनुभव व कृतीद्वारे शिक्षण यांमुळे विद्यार्थ्यांना प्राप्त ज्ञान कायमस्वरूपी लक्षात राहते.
टप्पे ꞉ प्रकल्प पद्धतीचे प्रकल्पपूर्व नियोजन, प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही आणि प्रकल्पोत्तर कार्यवाही असे तीन टप्पे पडतात.
(१) प्रकल्पपूर्व नियोजन ꞉ यामध्ये प्रकल्प निवड व नियोजन हे मुख्य घटक असतात. गणित, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्रे व पर्यावरण या विषयांतील अनेक घटक असे आहेत की, जे वर्गात न अभ्यासता समाजात जाऊन त्यांची माहिती मिळवावी लागते. अशा आशयासाठी प्रकल्पपद्धती उपयुक्त ठरते. ज्या घटकांचे आकलन वर्गामध्ये होऊ शकत नाही, कृतीला वाव असते, जेथे प्रत्यक्ष कामास वेळ लागतो, शिक्षकाशिवाय इतर सामाजिक घटकांकडून प्रत्यक्ष ज्ञान मिळवावे लागते असे घटक प्रकल्पपद्धतीमध्ये अध्ययनासाठी निवडले जातात. उदा., बँकेचे व पोस्टाचे व्यवहार समजून घेणे, वर्तमानपत्रातील कात्रणांचा संग्रह करणे, विविध ठिकाणांना भेटी देणे, औषधी वनस्पतींची माहिती गोळा करणे, भूखंडाचे क्षेत्रफळ काढणे इत्यादी.
(२) प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही ꞉ प्रकल्पाची निवड केल्यानंतर तो प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक असते. निवडलेला प्रकल्प कोणत्या घटकासंदर्भातील आहे, ते पाहून त्यासंदर्भात कोणती माहिती विद्यार्थ्यांना द्यावी लागेल, याचे नियोजन शिक्षकाला करावे लागते. त्याची व्याप्ती निश्चित करावी लागते. यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षकाला प्रशासकीय नियोजन करावे लागते. प्रकल्प ज्याठिकाणी राबवायचा आहे, त्याबाबत शिक्षकाला शाळा, संस्था अथवा कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागतो. प्रकल्प राबवण्यापूर्वी प्रकल्पास किती वेळ द्यायचा? ज्या स्थळाला भेट देणार, तेथील लोकांचा उपलब्ध होणारा वेळ किती असेल? यांचा विचार करणे आवश्यक असते. तसेच शालेय वेळापत्रकात व्यत्यय येणार नाही, याचीही दक्षता घेणे जरुरीचे असते. वर्गातील विद्यार्थ्यांचे गट करणे, गटप्रमुख नेमणे, प्रत्येक गटाने कोणती माहिती केव्हा घ्यायची, प्रात्यक्षिक कामाचे वेळापत्रक निश्चित करणे, गटागटांमध्ये समन्वय साधणे, शिक्षक, विद्यार्थी व तज्ज्ञ व्यक्ती यांच्यामध्ये समन्वय साधणे इत्यादी बाबींचा विचार नियोजनामध्ये करावा लागतो. प्रकल्पाचे नियोजन अचूक असेल, तर प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे सुलभ होते. विद्यार्थ्यांनी केलेली नोंदणी, मापन, लेखन प्रयोग इत्यादी बाबी योग्य पद्धतीने झाल्या किंवा नाही यावर शिक्षकाचे लक्ष असणे महत्त्वाचे असते.
(३) प्रकल्पोत्तर कार्यवाही ꞉ यात प्रकल्प सुरू असताना विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी, त्यांनी घेतलेल्या नोंदी, केलेले प्रात्यक्षिक कार्य इत्यादींबाबत चर्चा करणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्या घटकासंबंधीच्या संपूर्ण माहितीची उजळणी करून त्याचे दृढीकरण करणे आणि विद्यार्थ्यांना विषय घटकाच्या ज्ञानाबरोबरच इतर कोणते ज्ञान प्राप्त झाले, याची शिक्षकाने विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करणे अपेक्षित असते. शेवटी शिक्षकाने प्रकल्पाचे यश-अपयश जाणून घेऊन प्रकल्पाचे मूल्यमापन आणि प्रकल्पाचा अहवाल तयार करावा.
प्रकल्पपद्धीतीमुळे मिळणारे शिक्षण हे अनुभवातून मिळत असल्याने ते अधिक प्रभावी, चिरकाल टिकणारे आणि जीवनोपयोगी असते. विद्यार्थी स्वतः कृती करत असल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास व साहस या गुणांची जोपासना होते. या ठिकाणी जी समस्या घ्यायची आहे, ती विद्यार्थ्यांच्या गरजेतून व आवडीनुसार निवडलेली असल्याने विद्यार्थी ही कृती लक्षपूर्वक करतात आणि सहाजिकच अध्ययन सुलभ होते. विद्यार्थी अध्ययन करत असताना केवळ त्याच्या कान किंवा डोळे या इंद्रियांचाच उपयोग होत नसून इतरही इंद्रियांचा उपयोग होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध इंद्रियांचा विकास होण्यास प्रकल्पपद्धतीमुळे मोठी मदत होते. विद्यार्थी गटागटाने काम करत असल्याने सामूहिक शिस्त आणि परस्पर सहकार्य या वृत्तींची जोपासना होते.
टिका ꞉ जगामध्ये ज्या प्रमाणात ज्ञानात वाढ होत आहे, त्याचा विचार करता या पद्धतीने ज्ञान मिळविणे अव्यवहार्य ठरते. ही पद्धत खर्चिक असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यामध्ये अडचणी उत्पन्न होऊ शकतात. ही पद्धत वेळ, श्रम व प्रयत्न या दृष्टीनेसुद्धा खर्चिक आहे. पद्धतशीर व निरंतर अध्यापन या पद्धतीने शक्य नाही. गणितासारखा तार्किक विषय हा पूर्णपणे या पद्धतीने शिकविणे शक्य नाही. तसेच भूमितीसारख्या विषयात अभ्यासक्रमाची श्रेणीबद्ध रचना असल्याने तुटकपणे ज्ञान घेणे कितपत जमेल, याबाबतही अनेक तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.
प्रकल्पपद्धतीसंदर्भात काही टिकाकारांनी टिका केली असली, तरी या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती आणि संशोधन वृत्ती वाढत असते; ज्याचा फायदा विद्यार्थ्याला संपूर्ण आयुष्यभर कळत न कळत होत असतो.
संदर्भ ꞉
- जगताप, ह. ना., गणित आशययुक्त अध्यापन पद्धती, पुणे, १९९१.
- Kilpatrick, William Heard, THE PROJECT METHOD : The Use of the Purposeful Act in the Educative Process, New York City, 1918.
समीक्षक ꞉ के. एम. भांडारकर