केंद्र शासनाची सर्वांत जुनी आणि सर्वांत महत्त्वाची शैक्षणिक सल्लागार संस्था. तिची स्थापना इ. स. १९२० मध्ये कोलकाता विद्यापीठ आयोगाच्या शिफारसीवरून करण्यात आली; मात्र देशावरील आर्थिक संकटामुळे अथवा अर्थव्यवस्थेचा एक उपाय म्हणून इ. स. १९२३ मध्ये मंडळाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पुढील बारा वर्षे केंद्रशासनाला शैक्षणिक बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी कोणतीही केंद्रीय संस्था नव्हती. त्यामुळे हार्टॉंग समितीने आपल्या अहवालात केंद्र शासन आणि शिक्षण यांच्यात विरोधाभास असल्याचे म्हटले. परिणामी, इ. स. १९३५ मध्ये केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ पुनरुज्जीवित करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री हे या मंडळाचे अध्यक्ष, राज्य शिक्षणमंत्री हे उपाध्यक्ष आणि विविध क्षेत्रांतील सुमारे ६ सदस्य या मंडळावर असतात.
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने राष्ट्रीय शिक्षण धोरणात आमूलाग्र बदल केला आहे. त्यामध्ये शिक्षण हे प्रामुख्याने प्रांतीय व हस्तांतरित असावे आणि त्यावर केंद्र सरकारचे मर्यादित नियंत्रण असावे, असा निर्णय घेण्यात आला. सर्व शिक्षा अभियान (२०००), मूलभूत शैक्षणिक हक्क (२००९) हे मंडळाने घालून दिलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे परिपाक. मंडळाने मुख्यतः शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि शिक्षणात सर्वसमावेशकता आणणे या दोन घटकांवर भर दिला. यांशिवाय एकूण नोंदणीचे प्रमाण वाढविणे; शैक्षणिक हक्कांपासून वंचित राहिलेल्या स्त्रिया, मागासवर्गीय राज्ये आणि सामाजिक, आर्थिक दुर्बल घटक यांचे सबलीकरण करणे; खासगी क्षेत्राची शिक्षणातील गुंतवणूक वाढविणे अथवा त्यास प्रोत्साहन देणे इत्यादी मंडळाची उद्दिष्ट्ये होती.
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने देशाची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी आणि प्रत्येक घटकातील मुलांना जीवनोपयोगी शिक्षण मिळावे यांसाठी प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती, माध्यमिक शिक्षण समिती, उच्च शिक्षण समिती, सामाजिक शिक्षण समिती आणि सामान्य कार्य समिती या ५ उपसमित्या स्थापन केल्या. मंडळाद्वारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व योजना तयार करणे आणि सल्ला देणे; येणाऱ्या शैक्षणिक अडचणींवर उपाय सूचविणे; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरून आलेल्या शैक्षणिक सूचना केंद्र व राज्य शासनाला अवगत करणे; शैक्षणिक कार्ये यशस्वीपणे पार पाडणे; केंद्र व राज्य शासनाला शैक्षणिक सल्ला देणे; शैक्षणिक पुस्तकांमध्ये उच्च दर्जाच्या अभ्यासक्रमांचा समावेश करणे; शैक्षणिक विकास घडवून आणणे इत्यादी कार्ये पार पाडली जात असून मंडळास याकामी उपसमित्यांचे साह्य लाभत आहे.
समीक्षक ꞉ के. एम. भांडारकर