दहा वर्षांच्या शालेय अभ्यासक्रमाचे व व्यवस्थेचे परीक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेली एक समिती. ही समिती १९७७ मध्ये गुजरात विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली. या समितीस ‘पुनरावलोकन समिती’ असेही म्हणतात. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता व विषयांनुसार ठरविलेल्या उद्दिष्टांचे पुन꞉निरीक्षण करणे, अभ्यासक्रम व पाढ्यपुस्तके यांची छाननी करणे आणि अभ्यासाची योजना व विषयांसाठी ठरवून दिलेल्या तासिका यांची तपासणी करण्यासाठी या समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीने सामाजिक दृष्ट्या उत्पादक कार्य म्हणून अनुभवाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन या बाबींवर विशेष भर दिला. समितीने अन्न, निवारा, आरोग्य, स्वच्छता, संस्कृती, मनोरंजन, सामुदायिक कार्य, सामाजिक सेवा या मूलभूत आवश्यक क्षेत्रांची ओळख दिली. महात्मा गांधी यांनी हस्तकलांद्वारे शिक्षणाची शिफारस केली होती. ते म्हणतात की, ‘हस्तशिल्प केवळ उत्पादन कामासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी शिकविले जाते’. कोठारी आयोगानेही शिक्षणक्षेत्रात कार्यानुभव समाविष्ट करण्याची शिफारस केली होती.
सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्य ꞉ सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्याचा उद्देशपूर्ण व अर्थपूर्ण कार्य म्हणजे मुलांना वर्गात व वर्गाबाहेर सामाजिक, आर्थिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी प्रदान करणे आणि त्यांना विविध प्रकारच्या कामात सहभागी असलेली वैज्ञानिक तत्त्वे व प्रक्रिया समजून घेण्यास सक्षम करणे हा आहे. व्यक्तीगत काम हे त्याचे आवश्यक घटक असून याचा परिणाम वस्तू किंवा सेवांमध्ये होतो. समुदाय हे समाजासाठी उपयुक्त आहे. सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्याला शालेय अभ्यासक्रमात केंद्रीय स्थान दिले जावे. एनसीईआरटीनुसार सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्य उपक्रम निवडताना काही निकष पूर्ण करण्यात यावेत. या कार्यक्रमाची शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समस्या सोडविण्याचा दृष्टिकोण स्वीकारला पाहिजे. मुलांना त्यांच्या गरजांशी संबंधित समस्यांची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांना अशी कामे आणि सेवा करण्यासाठी आवश्यक साहित्य, साधने आणि तंत्रांवर चर्चा करून समाधानावर पोहचविले पाहिजे.
उद्दिष्टे ꞉ ईश्वरभाई पटेल समितीने कामाच्या अनुभवासंदर्भात पुढील उद्दिष्टे ठरविली होती ꞉
- मुलाला मदत करण्यासाठी अन्न, आरोग्य व स्वच्छता, कपडे, निवारा, मनोरंजन आणि सामाजिक संबंधात त्याच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या गरजा ओळखणे.
- समाजातील विविध उत्पादक उपक्रमांशी परिचित विविध प्रकारच्या कार्यांमध्ये सहभागी असलेली वैज्ञानिक तत्त्वे समजून घेणे.
- कच्च्या मालाचे स्रोत आणि वस्तू व सेवांच्या उत्पादनात वापरली जाणारी विविध साधने आणि उपकरणे यांचे ज्ञान मिळविणे.
- उत्पादक कार्याची आणि समुदायासाठी सेवांची उपयुक्तता समजून घेणे.
- उत्पादक, प्रक्रिया आणि कौशल्यांच्या दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या प्रगत समाजाच्या गरजा आणि आवश्यकता समजून घेणे.
- उत्पादक कार्याचे नियोजन आणि संघटना करण्याची प्रक्रिया समजून घेणे.
- सामाजिक समस्यांविषयी जागरूकता विकसित करणे.
- समस्या सोडविण्यासाठी आणि नवीन कल्पना घेऊन येण्यासाठी एक समज विकसित करणे.
- कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करणे इत्यादी.
सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्य हे हेतुपूर्ण उत्पादक कार्य असून ते मुलांच्या आणि समाजाच्या गरजांशी संबंधित सेवा आहे. असे कार्य यांत्रिकरित्या केले जाऊ नये यासाठी नियोजन, विश्लेषण आणि तपशील समाविष्ट करणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यावर केलेली तयारी शैक्षणिक असावी. त्याच प्रमाणे सुधारित साधने आणि साहित्य, तसेच उपलब्धतेनुसार व आधुनिक तंत्रांचा अवलंब केल्यास तंत्रज्ञानावर आधारित प्रगतीशील समाजाच्या गरजांची पूर्तता होईल. यातून विद्यार्थी एक संघ म्हणून कौशल्य आणि चतुराईने काम करण्यास शिकतात. आपली शैक्षणिक व्यवस्था अधिक वास्तववादी आणि उत्पादक बनविण्यासाठी आणि शिक्षण व उत्पादकता यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व टप्प्यांवर कामाचा समावेश करण्याची गरज निर्माण झाल्यामुळे ईश्रभाई पटेल समितीची स्थापना झाली. सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्य हे कौशल्य आणि मूल्यांच्या विकासाचे एक शक्तिशाली साधन बनू शकते. त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळते, जे सामुदायिक सेवा आणि सामाजिक कार्यांद्वारे देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
शिफारशी ꞉ ईश्वरभाई पटेल समितीने पुढील शिफासशी केल्या ꞉
- मुलांच्या विकासात्मक पातळीनुसार त्यांचे एकूण व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- आवश्यकतेनुसार क्रियाकलाप घडवून आणावे.
- समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि सर्जनशील विचार यांचा समावेश असावा.
- मूल्ये विकसित करण्यासाठी मुलांना संबंधित ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्यास मदत करण्यात यावी.
- दोन क्रियाकलापांच्या माध्यमातून तयार झालेली उत्पादने विद्यार्थी आणि समुदायाद्वारे, विशेषत: शालेय समुदायाद्वारे, थेट उपभोग्य असतील. त्यासाठी आवश्यक असल्यास विक्रीयोग्य किंवा सामाजिक आणि आर्थिक मूल्ये असलेल्या सेवा सुरू करण्यात याव्यात.
- सामाजिक दृष्ट्या उपयोग होण्यासाठी हे कार्य समुदायाच्या आणि वैयक्तिक मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित असावे.
- आवश्यक साधने, साहित्य, तंत्र, सुविधा सहज उपलब्ध असावेत.
- पुरेसे संसाधन व्यक्ती उपलब्ध असावेत.
- क्रियाकलाप उपयोगी पूर्ण होण्यासाठी व्यवहार्य असावा.
- राज्यांनी स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार आपापल्या राज्याच्या शिक्षणातील अभ्यासक्रम व विषय ठरवावेत.
- मान्यवविद्या विभागातील मानव्यवादी विषय, विज्ञान आणि समाजोपयोगी उत्पादन-व्यवसाय व समाजसेवा या घटकांचा शिक्षणात समावेश असावा.
- अस्तित्वात असलेल्या पाठ्यपुस्तकातील काही अभ्यासक्रम वगळावे.
- एक सामान्य किंवा मुख्य अभ्यासक्रम विकसित करून त्यामध्ये वर्षभर मुलांचा नियमित आणि सार्वत्रिक सहभाग असणे आवश्यक आहे आणि तो सर्व शाळांना अनिवार्य करण्यात यावे.
- या उपक्रमांमध्ये जास्त गुंतवणूक, तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य यांचा समावेश होणार नाही इत्यादी.
समितीच्या शिफारशींमध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शालेय स्तरावर सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्य सुरू करण्यात येऊन ते हस्तकला शिक्षण, कार्यानुभव यांसारख्या वेगवेगळ्या नावांनी अंमलात आणले गेले. मुलांमध्ये पर्यावरणाचे अन्वेषण करण्याची नैसर्गिक उत्सुकता असते. ते निरीक्षण, चौकशी, साहित्य आणि साधनांच्या हाताळणीद्वारे कामाचे स्वरूप वेगळे करतात. ते अनुकरण करून काम करायला शिकतात. त्यांना एकत्र काम करण्यास उत्साह येतो. म्हणून सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्यात शिकविण्याच्या-शिकण्याच्या प्रक्रियेचे पुढील तीन टप्पे असावेत :
- (१) मुले निरीक्षण, तोंडी चौकशीद्वारे घरात, शाळेत आणि शेजारच्या कामाच्या परिस्थितीचा अभ्यास करतील.
- (२) साहित्य, साधने आणि तंत्रांचा प्रयोग समाविष्ट असेल. अशा प्रयोगांचा परिणाम उत्पादने आणि सेवांमध्ये होईल.
- (३) कामाच्या सरावामुळे वस्तू आणि सेवांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन असेल.
ईश्वरभाई पटेल समितीने शालेय शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर आयोजित सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक कार्य उपक्रमासंबंधित केलेल्या शिफारशी पुढील प्रमाणे ꞉
- विद्यार्थ्याने किमान शिक्षण प्राप्त केले पाहिजे. यासाठी अभ्यासक्रमात सामाजिक आणि कार्यकौशल्यांच्या संदर्भात त्यास सक्षम बनविणारे शिक्षण देण्यात यावे.
- सामाजिक दृष्ट्या उपयोगी उत्पादक कार्याच्या शिक्षकांची व्यावसायिक स्थिती इतर शिक्षकांसारखीच असावी.
- विविध कामांसाठी कुशल कर्मचाऱ्यांच्या अर्धवेळ नोकरीची तरतूद असावी.
- सेवा शिक्षण- प्रशिक्षणाचे कार्यक्रम विकसित करण्यासाठी राज्य शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक दृष्ट्या उपयोगी उत्पादक कार्यासाठी पेशी असाव्यात.
- शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये सामाजिक दृष्ट्या उपयोगी उत्पादक कार्यासाठी सेवापूर्व शिक्षक प्रशिक्षणाची योजनादेखील विकसित केली जावी. अशा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम एनसीईआरटीने तयार केला पाहिजे.
केंद्रीय आणि राज्य स्तरावरील उच्चस्तरीय समित्या संबंधित शिक्षण विभागांनी स्थापन करावी, जेणेकरून त्यांनी घेतलेले निर्णय विनाविलंब स्वीकारले जावून अंमलात येतील. कामाच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि अंमलबजावणीतील अडचणी दूर करणे यांसाठी या समित्यांनी नियमितपणे बैठका घ्याव्यात, असे ईश्वरभाई पटेल समितीने सूचित केले.
समीक्षक ꞉ के. एम. भांडारकर