आंतराष्ट्रीय व्यापारासंदर्भात प्रतिपादित केलेले एक तत्त्व. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते वॅसिली लेआँटिएफ यांनी १९५३ मध्ये आपल्या अनुभवनिष्ठ विश्लेषणातून व्यापारासंदर्भात जे तत्त्व मांडले ते ‘लेआँटिएफ विरोधाभास’ या नावाने प्रसिद्ध आहे. लेआँटिएफ यांचे विश्लेषण ओहलिन यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतासंदर्भात अनुभवनिष्ठ विरोधाभास असल्यामुळे हेक्श्चर-ओहलिन यांचा मूलभूत आंतराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे संक्षिप्त आकलन अपरिहार्य ठरते.

हेक्श्चर-ओहलिन प्रतिमानात घटक सघनतेची संकल्पना मांडलेली आहे. समजा, कापडाचा एक एकक उत्पादित करण्यासाठी भांडवलाचे दोन आणि श्रमाचे सहा एकक, तसेच पोलाद उत्पादनासाठी श्रमाचे आठ आणि भांडवलाचे चार एकक वापरले जात असल्यास कापड उत्पादनाच्या बाबतीत भांडवलाचे श्रम गुणोत्तर १:३, तर पोलाद उत्पादनात १:२ असे असेल. म्हणजे, श्रम हा घटक कापडाच्या उत्पादनात सघनतेने वापरला जात आहे. उत्पादन घटकाच्या बाबतीत वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी घटक विपुलता आढळून येते. ओहलिन यांच्या मते, एखाद्या देशात ज्या घटकाची विपुलता असते, तो उत्पादन घटक अधिक प्रमाणात वापरून ती वस्तू अन्य देशात निर्यात केली जाते. यामुळे विपुलतेने उपलब्ध उत्पन्नघटकाचा वापर करून त्या देशाला तुलनात्मक लाभ मिळतो. भांडवल विपुलता असलेला देश श्रमप्रधान वस्तूंची, तर श्रम विपुलता असलेला देश भांडवलप्रधान वस्तूंची आयात करतो. तसेच भांडवल विपुलता असलेला देश भांडवलप्रधान वस्तूंची, तर श्रम विपुलता असलेला देश श्रमप्रधान वस्तूंची निर्यात करतो. या प्रकारे या दोन्ही देशांना तुलनात्मक लाभ प्राप्त होऊन या दोन देशांत व्यापार होईल.

लेआँटिएफ यांनी त्यांच्या इ. स. १९४७ मधील अमेरिकेच्या आदान-प्रदान तक्त्याच्या विश्लेषणाद्वारे हेक्श्चर-ओहलिन यांचे दोन देशांतील आंतरराष्ट्रीय व्यापाराला कारणीभूत ठरणारे ‘घटक सघनता’ आणि ‘विपुलता’ यांबाबतचे गृहीतक तपासण्याचा प्रयत्न केला. त्यांनी श्रम आणि भांडवल हे दोन उत्पादन घटक विचारात घेऊन असे गृहीत धरले की, अमेरिकेची आयात आणि निर्यात एक दशलक्ष डॉलरने कमी झाल्यास याचा परिणाम उत्पादन घटक हे उत्पादनात वापरण्याच्या प्रक्रियेवर कशा प्रकारे होईल, याचा अभ्यास त्यांनी २०० उद्योगांचा आदान-प्रदान तक्त्याद्वारे केला. अमेरिकेत इ. स. १९४७ मध्ये आयात स्पर्धाशील वस्तूंच्या उत्पादनात वापरण्यात येणाऱ्या भांडवलाचे प्रमाण, निर्यात वस्तूंच्या उत्पादनात वापरण्यात येणाऱ्या भांडवलापेक्षा अधिक होते. त्यांच्या असे निदर्शनास आले की, निर्यातप्रधान उद्योग हे पर्यायी वस्तू आयात करणाऱ्या उद्योगांपेक्षा अधिक प्रमाणात श्रमाचा वापर करतात. अमेरिका जरी भांडवलप्रधान देश असला, तरी इ. स. १९४७ मध्ये अमेरिकेची निर्यात मात्र श्रमप्रधान होती. म्हणून अमेरिका वस्तुत: भांडवल सघनता असलेला देश असूनही श्रमप्रधान वस्तूंची निर्यात आणि भांडवलप्रधान वस्तूंची आयात करीत होता. लेआँटिएफ यांचे अनुभवनिष्ठ विश्लेषण हे हेक्श्चर-ओहलिन सिद्धांताच्या विरुद्ध असल्याने त्यास ‘लेआँटिएफ विरोधाभास’ असे म्हणतात. लेआँटिएफ विरोधाभासाचे स्पष्टीकरण ‘मागणीचे प्रत्यावर्तन’ याद्वारे देण्याचा प्रयत्न केला जातो. अमेरिकेसारख्या देशामध्ये भांडवलप्रधान उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाल्यास अशा उत्पादनाची अधिक आयात होऊ शकते. भांडवलप्रधान उत्पादनास पूरक ठरू शकेल अशाच वस्तूंची आयात करणे अमेरिकेस जास्त लाभकारक ठरू शकते.

लेआँटिएफ विरोधाभासावर काही अर्थतज्ज्ञांनी टीका केली. लेआँटिएफ यांनी जी पद्धत वापरली, त्यात प्रामुख्याने निर्यातप्रधान उद्योग आणि प्रत्यक्ष आयात उद्योगांऐवजी आयात पर्यायी उद्योगांचा समावेश होता. हेक्श्चर -ओहलिन यांचा सिद्धांत हा प्रत्यक्ष आयात व निर्यातीशी संबंधित आहे. आर. जोन्स यांच्या मते, लेआँटिएफ यांनी अमेरिका आणि अन्य देशांच्या उत्पादन घटक सघनतेचे तुलनात्मक मोजमाप केले नाही. हाफमेयर यांनी असा आक्षेप घेतला की, अमेरिकेच्या आयातीत नैसर्गिक साधनसामुग्रीचा (उदा., पेट्रोलियम) अधिक वाटा असल्याने अशा वस्तू वगळायला हव्यात. त्याच प्रमाणे सर्व देशांतील उत्पादन घटक हे सर्व बाबतींत समान असल्याचे हेक्श्चर-ओहलिन सिद्धांतात गृहीत धरले आहे. तसेच डब्ल्यू. पी. ट्रॅव्हिस यांनी लेआँटिएफ विरोधाभासाचा अमेरिकेच्या विदेशी व्यापार धोरणाच्या संदर्भात अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

संदर्भ :

  • Kindleberger, Charles; Lindert, Peter, International Economics, 1982.
  • Krugman, Paul; Obstfeld, Maurice; Melitz, Marc, International Economics ꞉ Theory and Policy, London, 2006.
  • Mithani, D. M., International Economics, Mumbai, 2006.
  • Sodersten, Bo; Reed, Geoffrey, International Economics, London, 1980.

समीक्षक : राजस परचुरे