आफ्रिका खंडातील देशांचा सर्वांगीण विकास व्हावा या मुख्य उद्देशाने स्थापित जागतिक स्तरावरील एक बहुद्देशीय वित्तीय संस्था. या बँकेची स्थापना १९६४ मध्ये आबीजान येथे करण्यात आली. खाम, सुदान येथील राष्ट्रसंघाच्या आर्थिक आयोगाच्या परिषदेत ४ ऑगस्ट १९६३ रोजी आफ्रिकन विकास बँकेच्या स्थापना करारावर सह्या करण्यात आल्या. हा करार १९६४ पासून आफ्रिकन विकास बँकेच्या रूपाने कार्यान्वित झाला. हा एक बँक समूह आहे. आफ्रिका खंडातील लोकांचे दारिद्र्य दूर करून राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे, हे या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आफ्रिका खंडाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला हातभार लावेल अशा प्रकारची गुंतवणूक विविध प्रकल्पांमध्ये व्हावी, यासाठी ही बँक प्रयत्न करते. आफ्रिकेतील वसाहतवाद संपुष्टात आल्यानंतर आफ्रिका खंडाच्या विकासाला प्राधान्य देणे ही मुख्य गरज होती. त्यामुळेच ही बँक स्थापन झाली.

आफ्रिकन विकास बँकचे आफ्रिकन विकास बँक, आफ्रिकन विकास निधी आणि नायजेरिया विश्वस्त निधी असे मुख्य तीन घटक आहेत. बँकेच्या सदस्यांमध्ये आफ्रिका खंडातील देश आणि आफ्रिकेतर देश असे दोन प्रकार आहेत. सुरुवातीला फक्त आफ्रिका खंडातील देशच या बँकसमूहाचे सदस्य होते; मात्र आफ्रिका खंडातील गुंतवणुकीची वाढती मागणी व आवश्यकता लक्षात घेऊन आफ्रिकेतर देशांनाही सदस्यत्वाची दारे खुली केली गेली. यामुळे आर्थिक स्रोतांमध्ये वाढ होऊन आफ्रिकन देशांना कमी व्याजदरावर कर्ज देणे बँकसमूहाला शक्य झाले. बँकसमूहाची व्याप्ती मोठी असून त्यात विशेष कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची संख्याही मोठी आहे. त्यामुळे बँकेची विकास कामे चांगल्या पद्धतीने चालू आहे. आफ्रिकेतर देश सदस्य असले, तरीही आफ्रिकन विकास बँकसमूह आपले भौगोलिक व मालकी हक्क अबाधित ठेवून आहे. त्यामुळे बँकसमूहाचा अध्यक्ष हा आफ्रिकनच असतो आणि मुख्यालयदेखील अफ्रिकेतच आहे.

आफ्रिकेतील सदस्य देश व आफ्रिका खंडाव्यतिरिक्त असणारे इतर सदस्य देश यांचे वर्गणी स्वरूपातील भागभांडवल, कर्जनिर्मितीतून आलेला पैसा, विविध गुंतवणुकीतून आलेला पैसा हे बँकेचे मुख्य आर्थिक स्रोत आहेत. आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आफ्रिकन विकास निधी आणि नायजेरियन विश्वस्त निधीसोबतच अरब खनिजतेल निधी, विशेष मदत निधी इत्यादी निधी बँकसमूहाने उभे केले आहेत.

आफ्रिकेतील स्वतंत्र राष्ट्रे बँकसमूहाचे सदस्य आहेत. यूरोप, अमेरिका, आशिया खंडातील देश या बँकसमूहाचे सदस्य आहेत. सदस्यराष्ट्रांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी कर्ज देणे, रोख्यांद्वारे गुंतवणूक करणे, विकास प्रकल्पांसाठी तांत्रिक साहाय्य देणे, विकास धोरण ठरविण्यात सदस्य राष्ट्रांना मदत करणे इत्यादी बँकचे प्राथमिक कार्य आहे. पायाभूत सुविधांबाबत बँकने सर्वांत जास्त वित्तसाहाय्य केले असून त्यात विद्युत पुरवठा, पाणी आणि स्वच्छता, वाहतूक व दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. बँक प्रकल्पांना १९६८ पासून वित्तसाहाय्य करण्यासोबतच आफ्रिकन देशांना धोरणात्मक बदल सूचविणे, तांत्रिक मदत करणे, धोरणात्मक सल्ला देणे, संरचनात्मक सुधारणेसाठी कर्ज देणे यांसारखी कामेही बँकसमूह करत आहे. आफ्रिकेतील विविध प्रदेशांमधील पायाभूत सुविधांविषयक प्रकल्प एकात्मिकरण करून बाजारपेठांचा विस्तार करण्यासाठी आफ्रिकन विकास बँक धोरण आखते. वाहतूकव्यवस्था व उर्जानिर्मितीद्वारे आफ्रिका खंडातील छोट्या छोट्या राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करावे व आफ्रिका खंडात मोठ्या बाजारपेठा निर्माण व्हाव्यात यांसाठी प्रयत्न करते.

बँकसमूहाच्या कामकाजाचे नियमन करण्यात संचालक मंडळाची मुख्य भूमिका असते. प्रत्येक सदस्य राष्ट्राचा राज्यपाल हा प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळावर असतो. हेच मंडळ बँकसमूहाचे निर्णय घेते व अध्यक्षांचीदेखील निवड करते. या निवडीच्या वेळी आफ्रिकन देशातील सदस्य व इतर राष्ट्रांतील सदस्य उपस्थित असतात. अध्यक्षाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. संचालक मंडळाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन अध्यक्षाला करावे लागते. बँकेची धोरणे योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्याची जबाबदीरी अध्यक्षावर असते. बँकेवर मुख्य अर्थतज्ज्ञदेखील नियुक्त असतो. याशिवाय बँकेचे ५ उपाध्यक्ष हे अध्यक्षाला मदत करतात.

बँक समूहांतर्गत कमी विकसित आफ्रिकन देशांना आफ्रिकन विकास निधीद्वारे मदत केली जाते. अतिमागास देशांना साहाय्य करण्यासाठी नायजेरियन विश्वस्त निधीची स्थापना करण्यात आली. कर्ज घेणाऱ्या देशांमध्ये प्रामुख्याने प्रादेशिक सदस्य राष्ट्रच आहेत. या सदस्य राष्ट्रांचे वर्गीकरण हे देशाची कर्ज परतफेडीची क्षमता आणि दरडोई राष्ट्रीय उत्पन्न या दोन निकषांच्या आधारे केली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाची विकासाबाबत जी उद्दिष्टे आहेत, त्याला पूरक अशी बँकसमूहाची मुख्य पाच तत्त्वे पुढीलप्रमाणे नव्याने मांडली आहेत : (१) ऊर्जा सक्षम व उज्ज्वल आफ्रिका. (२) खाद्यान्न संपूर्ण आफ्रिका. (३) औद्योगिक आफ्रिका. (४) एकात्मिक आफ्रिका. (५) चांगले आयुष्यमान व राहणीमान असलेले आफ्रिका.

आफ्रिकेतील लोकसंख्येची बदलती रचना, राजकीय, सामाजिक आणि तंत्रज्ञानातील बदल यांचा लोकांवर परिणाम होता. त्यासाठी मनुष्याचा किंवा मानवी श्रमरूपी भांडवलांचा विकास करण्याचे काम बँक करते. मनुष्यबळ क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने बँकसमूहाने विकासात्मक पावले उचलली आहेत. शाश्वत आर्थिक विकासासाठी बँकेने पायाभूत सुविधांसोबत लिंगभाव समानता, एड्स विरोधी कार्यक्रम, पर्यावरणपूरक कार्यक्रम यांसारख्या विषयांवरही जागृतीसाठी मोहिम आखली आहे. हवामान बदल आणि तापमान वैश्विक समस्येच्या पार्श्वभूमीवर बँकेने अपारंपरिक नूतनशील ऊर्जानिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी बँकेने गुंतवणुकीबाबतही पर्यावरणपुरक असे धोरण आखले आहे.

लिंगभाव समानतेच्या दृष्टीनेही प्रादेशिक सदस्य राष्ट्रे, तसेच अफ्रिकेतर सदस्य राष्ट्रांमधील स्त्री-पुरुष समानतेचा अभ्यास करून स्त्रियांना जास्तीत जास्त संधी कशा देता येतील, याचा विचार केला आहे. आफ्रिका खंडातील रवांडा, नामिबिया या देशांचे सामाजिक व राजकीय पटलावर आफ्रिकन स्त्री अग्रेसर दिसते. महिलांचे कायदेशीर अधिकार व महिलांच्या क्षमतांचा विकास करून त्यांना सक्षम बनविणे हे बँकेचे मुख्य धोरण आहे. योग्य पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक सोयी निर्माण करण्यासाठी बँक मोठे प्रकल्प राबवीत आहे. ज्याचा फायदा प्रामुख्याने आफ्रिकन स्त्रियांना झाला आहे. किशोरवयीन मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शालेय पातळीवर विकास योजनांचा प्रसार बँकसमूह करत आहे.

आफ्रिका खंडातील लोकांचा मागासलेपणा दूर करून विकसित जगाच्या बरोबरीने त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात, तसेच जीवनमान उंचाविण्यात आफ्रिकन बँकसमूहाची खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

समीक्षक : विनायक गोविलकर