जकात संघ हा दोन किंवा अधिक देशांच्या व्यापारांतील अडथळे दूर करणे, सीमा शुल्क कमी करणे अथवा रद्द करणे आणि अभ्यांश (कोटा) काढून टाकणे यांसाठी केलेला करार होय. म्हणजेच दोन किंवा अधिक देश आपापसांतील सर्व जकाती रद्द करतात आणि उर्वरित जगाशी केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर समान बाह्य जकात अडथळे अथवा प्रतिबंध लावतात. असे संघ जकाती आणि व्यापारासंबंधीच्या सामान्य कराराद्वारे परिभाषित केले जाऊन ते आर्थिक एकात्मिकीकरणाचा तिसरा टप्पा म्हणून गणले जातात.
इसवी सन १८३४ मधील जर्मन त्सॉलफराइन आणि इ. स. १९४८ मध्ये स्थापन झालेले बेनेलक्स ही यशस्वी जकात संघांची उदाहरणे होत. जकात संघाचा सिद्धांत प्रथमतः १९५० मध्ये जेकब वायनर यांनी मांडला. जकात संघ हे संरक्षण आणि मुक्त व्यापाराचे घटक यांची सांगड घालतात, असे त्यांनी प्रस्तावित केले. वायनर यांनी असाही युक्तिवाद केला की, जकात संघाचा कल एकीकडे सदस्य देशांमधील स्पर्धा व व्यापार वाढविणे (जास्तीत जास्त मुक्त व्यापाराच्या दिशेने वाटचाल) आणि दुसरीकडे, जगातील इतर सदस्य नसलेल्या देशांकडून व्यापार व स्पर्धेच्या विरोधात अधिक संरक्षण प्रदान करणे (अधिक संरक्षणाच्या दिशेने वाटचाल) यांकडे आहे.
करारनाम्यानुसार संघातील सदस्य देश एकमेकांच्या मालावर जकात घेत नाहीत; बाहेरून येणाऱ्या मालावर समान जकात बसवितात आणि जकातीपासूनचे उत्पन्न पूर्वनिश्चित सूत्रांनुसार आपापसांत वाटून घेतात. जकात संघामुळे मोठ्या सदस्य राष्ट्रांना उपलब्ध असलेले आर्थिक फायदे लहान राष्ट्रांसह मिळतात. बाजारपेठ वाढल्यामुळे संघक्षेत्रात नवे उद्योग काढता येऊन उत्पादनही मोठ्या प्रमाणावर करता येते. त्यामुळे सदस्य राष्ट्रांच्या उद्योगसंस्थांमधील स्पर्धेचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो.
जकात संघ हा अधिमान्य (प्राधान्यपूर्ण) व्यापार व्यवस्था किंवा आर्थिक एकात्मिकरणाचा एक प्रकार आहे, ज्याचा पुढीलप्रमाणे आढावा घेता येईल :
(१) अधिमान्य व्यापार संघ : जेव्हा दोन किंवा अधिक देश व्यापार समूह किंवा संघ बनवू शकतात आणि एकमेकांच्या आयातीवरील प्रशुल्क कमी करू शकतात, तेव्हा त्या संघास अधिमान्य व्यापार संघ असे म्हणतात.
(२) मुक्त व्यापार संघ किंवा संघटना : जेव्हा दोन किंवा अधिक देश एकत्र येतात आणि त्यांच्या परस्पर व्यापारांत समाविष्ट असणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांवरील सर्व जकाती रद्द करतात; मात्र उर्वरित जागांसाठी त्यांच्या वैयक्तित जकाती कायम ठेवतात, तेव्हा ते मुक्त व्यापार संघ असतात.
(३) सामायिक बाजारपेठ : सामायिक बाजारपेठ तेव्हाच अस्तित्वात येते, जेव्हा दोन किंवा अधिक देश जकात संघ स्थापन करतात. तसेच सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये सर्व उत्पादन घटकांच्या मुक्त व अनिर्बंध हालचालींना अथवा चलनवलनाला परवानगी देतात.
(४) आर्थिक संघ : जेव्हा आर्थिक एकात्मिकीकरणाचा सर्वोच्च टप्पा गाठला जातो, तेव्हा सर्व देश मिळून आर्थिक संघ निर्माण करतात. राजकीय संघ हे देशांमधील कोणत्याही एकीकरणाचा सर्वोच्च टप्पा असतो.
जकात संघाचे गतिशील लाभ :
(१) वाढती स्पर्धा : जेव्हा जकात संघ स्थापन केले जातात, तेव्हा सदस्य राष्ट्रांमधील व्यापारी प्रतिबंध नष्ट केले जातात. त्यादृष्टीने इतर देशांमधील इतर उत्पादकांशी असलेल्या स्पर्धेस सामोरे जाण्यासाठी प्रत्येक राष्ट्रांमधील उत्पादक हा कार्यक्षम झाला पाहिजे. तसेच विकासास आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास चालना दिली पाहिजे.
(२) उत्पादनमानाचे लाभ : बाजारपेठेच्या वाढत्या आकारमानामुळे उत्पादनमानाचे लाभ निर्माण होण्याची शक्यता असते. लहान राष्ट्रे जे कोणत्याही जकात संघाचे सदस्य नाहीत, तेदेखील त्यांच्या देशांतर्गत बाजारपेठेतील लहानपणावर मात करू शकतात आणि उर्वरित जगाला निर्यात करून लक्षणीय स्वरूपात वाढत्या उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या उत्पादनामानाचे लाभ मिळवू शकतात.
(३) गुंतवणुकीला उत्तेजन : जकात संघाची निर्मिती ही बाहेरील राष्ट्रांना जकात संघामध्ये उत्पादनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रेरित करते. जेणेकरून गैरसंघ उत्पादनावरील प्रतिबंध (भेदभाव) टाळले जातील.
जकात संघ ही एक सामायिक बाजारपेठ असून यात समुदायांतर्गत श्रम व भांडवलाच्या चलनवलनामुळे संपूर्ण समुदायाच्या आर्थिक संसाधनांचा अधिक चांगला वापर होण्याची शक्यता असते. अलीकडे जकात संघाऐवजी ‘खुला व्यापार’ क्षेत्रे किंवा ‘सामुदायिक बाजारपेठा’ या व्यवस्था राष्ट्रांना अधिक सोयीच्या वाटतात.
भाषातरकार : लता धेंडे
समीक्षक : अविनाश कुलकर्णी