विमा व्यवसायांत विमाशास्त्राचा उपयोग करून विमा पर्यायांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणाऱ्यास विमा संख्याशास्त्रज्ञ असे म्हणतात. विमा संख्याशास्त्र ही एक स्वतंत्र शाखा असून जिचा उपयोग प्रामुख्याने विमा व्यवसायांत केला जातो. विमा संख्याशास्त्र जोखीम आणि अनिश्चितता मापन व व्यवस्थापन यांच्याशी संबंधित आहे. या जोखीमांचे मूल्यमापन ताळेबंदाच्या जमा आणि नावे या दोन्ही बाजूंवर परिणाम करतात. त्यामुळे मत्ता व्यवस्थापन, दायित्व व्यवस्थापन, मूल्यमापन कौशल्य यांसाठी विमा संख्याशास्त्रज्ञांची आवश्यकता पडत असते.
विमा संख्याशास्त्रज्ञ वित्तीय सुरक्षेच्या मूल्यांकनाच्या पद्धती पुरवितात. ज्यात त्यांची गुंतागुंत, गणित आणि यंत्रणा यांवर प्रभाव टाकला जातो. विमा, पुनर्विमा, निवृत्ती योजना, सामाजिक कल्याण कार्यक्रम, जोखीम व्यवस्थापन, विपणन, आर्थिक नियोजन, आपत्कालीन व्यवस्थापन इत्यादी कार्यक्षेत्रांमध्ये विमा संख्याशास्त्रज्ञांची गरज भासते. विमासंदर्भात सांख्यिकीय माहिती तयार करून तिचे विश्लेषण करणे, त्यातून व्यावहारिक निष्कर्ष काढणे, जास्तित जास्त विमांची खरेदी करणे इत्यादींसाठी विमा संख्याशास्त्रज्ञ संगणकीय प्रणालीची मदत घेतात. त्यामुळे तयार केलेल्या माहितीच्या आधारे विमासंदर्भात काही समस्या उद्भवल्यास त्या विमा संख्याशास्त्रज्ञांच्या साह्याने त्वरित सोडविल्या जाऊ शकतात.
विमा संख्याशास्त्रज्ञ म्हणून कार्य करण्यासाठी गणित, वित्तीय क्षेत्रे, विश्लेषणात्मक कौशल्ये, व्यवसाय ज्ञान यांसारख्या योग्यता अंगीकृत असाव्या लागतात. प्रमाणीकृत विमा संख्याशास्त्रज्ञ बनण्यासाठी काठीण व्यावसायिक परीक्षांची श्रेणी उत्तीर्ण करावी लागत असून त्यासाठी अधिक कालावधी लागतो.
डेन्मार्क देशात विमा संख्याशास्त्र या प्रकारच्या परीक्षेचा अंतर्भाव विद्यापीठीय शिक्षणात आहे. अमेरिकेत याचा अधिक अभ्यास रोजगाराच्या काळातील विविध परीक्षांच्या माध्यमातून होते. इंग्लंडसारख्या देशात मिश्रित अशी विद्यापीठीय परीक्षा पद्धती आहे.
भारतात विमा गणितशास्त्रज्ञ या व्यवसायावर नियमन करण्यासाठी भारतीय विमा संख्याशास्त्र संस्था (आयएआय) ही स्वायत्त संस्था असून जी भारतीय विमा संख्याशास्त्र कायदा २००६ नुसार स्थापन करण्यात आली. या कायद्याची अंमलबाजवणी १० नोव्हेंबर २००६ रोजी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी विभागाने दिनांक ८ नोव्हेंबर २००६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार करणायात आली. यामुळे पूर्वी अस्तित्वात असलेली भारतीय विमा संख्याशास्त्र सोसायटी (एएसआय) ही संस्था संपुष्टात आली. पूर्वीची ही सोसायटी सप्टेंबर १९४४ मध्ये स्थापन करण्यात आली होती; मात्र १९७९ पासून ती आंतरराष्ट्रीय विमा संख्याशास्त्र संघटनेची पूर्ण सदस्य आहे.
विमा संख्याशास्त्रज्ञांना विमा कंपन्या, सेवा निवृत्ती निधी, सल्लागार कंपन्या आणि सरकार या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी असतात.
समीक्षक : विनायक गोविलकर