माने, संध्या रमेश : ( ५ एप्रिल १९५७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत आणि समई नृत्यसम्राज्ञी.  त्यांचा जन्म पुणे येथे झाला.  राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या पोटी जन्मलेल्या संध्या यांनी आपल्या अंगभूत कौशल्याने समई नृत्याबरोबरच थाळी नृत्य देखील विकसित केले.  हे दोन्ही कलाप्रकार तमाशाच्या रंगमंचावर आणण्याचा मान त्यांनाच जातो.  सुरुवातीला काही काळ त्या  शाळेत गेल्या ; परंतु त्यांनी अक्षर ओळख होण्याइतकेच शिक्षण घेतले. त्यानंतर तमाशा हेच आपले आयुष्य समजले. आई विठाबाईंनीच वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी स्वतःच्या हाताने संध्या यांच्या पायात  परळी वैजनाथ ( जि.  बीड) येथील यात्रेत चाळ बांधले.  आणि इथूनच पुढे  संध्याताईंनी केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर तमाशा कला बहरत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.  सन १९७४  साली वयाच्या १८  व्या वर्षी महाराष्ट्राच्या तमाशा क्षेत्रात समई नृत्य, थाली नृत्य, गुडघी नृत्य,  मशाल नृत्य यांचे त्यांनी प्रयोग केले. १९८७  साली त्यांनी स्वतःचा ‘संध्या माने सोलापूरकर’  या नावाने तमाशाचा फड उभा केला.
विठाबाईंच्या तमाशाफडातील उस्मानाबाद येथे एका संगीतबारीतील मोहना नावाच्या मुलीने थाळी नृत्य, समई नृत्य सादर केले. त्या मुलीचे नृत्य बघून प्रेक्षक प्रचंड भारावून गेले.  दहा-बारा मिनिटे प्रचंड टाळ्यांचा कडकडाट राहिला.   हे पाहून विठाबाईंना वाटले, हे कौतुक आपल्या मुलींच्या वाट्याला आले पाहिजे  आणि म्हणून आपल्या मुली मंगला आणि संध्या या दोघींनी देखील थाळी नृत्य शिकले पाहिजे असे विठाबाईंना वाटायचे. त्यावेळी आईच्या म्हणण्याला दोघींनी होकार दिला आणि तमाशाफड नारायणगावला आल्यावर आईच्या सांगण्यानुसार संध्याताई परात घेऊन थाळी नृत्याचा सराव करू लागल्या. सराव करताना परातीचे काट पायाला रक्तबंबाळ करीत होते.  वेदनेने जीव कासावीस होत होता.  त्यावेळी कंटाळून आपल्याला हे जमणार नाही असे संध्याताईनी आईला सांगितले. परंतु विठाबाई  यांच्या प्रेरणेने पायांना जखमा झाल्या तरी दिवस रात्र न दमता न थकता त्यांनी थाळी नृत्य शिकले.
संध्याताई डोक्यावर पेटती समई घेऊन तोल सांभाळत नाचू लागल्या.  सुरुवातीच्या व्यथा वेदना मनातून निघून गेल्या होत्या. संध्याताईंचे नृत्य हेच तमाशा फडाचे प्रमुख आकर्षण ठरत गेले.  रसिक प्रेक्षक नृत्य पाहिले की बेहद खुश होऊन जायचे.  समई नृत्याच्या जोरावर रंगभवन, राणीबाग,वाकड पूल, कल्याण, ठाणे,भिवंडी आणि महाराष्ट्रातील यात्रा जत्रांच्या ठिकाणी हाउसफुलचा बोर्ड लागायचा.  त्यांचे मुंबईची केळेवाली, हुंड्याला कायदा आहे का ? रक्तात  न्हाली कुराड, पुढारी गरिबाला जगू द्या, मराठ्यांचा सरदार आदी वगनाट्य रसिकांनी अगदीच डोक्यावर घेतले होते.  सामाजिक, कौटुंबिक,राजकारण ,व्यसनमुक्ती या विषयावर वगनाट्य सादर करून प्रेक्षकांचे प्रबोधनाचे कार्य त्या करीत राहिल्या. मनाची जिद्द, चिकटी आणि प्रयत्नांची पराकष्टा याच्या जोरावर या कलावंतीने यशोशिखर गाठले.  प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांनी संध्याताई नृत्याची बिजली म्हणून त्यांची प्रतिमा सतत उजळत राहिली.
मराठी जनतेच्या मनोरंजनासाठी समई, थाळी नृत्याला जीवापाड जपणाऱ्या या कलावंतीनीसाठी तमाशाचे तंबू रसिक प्रेषकांनी  सतत तुडुंब भरून राहिले. संघर्ष हेच जीवन मानत या कलावंतीनीने खूप सोचले.  एका प्रासंगिक अपघातात त्यांच्या पायांना खूप मोठी इजा झाली होती. आपल्या अंगातील कलेचे लेणे त्यांना सोडले नाही.अपंगावर मात करीत आपली कला हेच जीवन मानत रसिकांची सेवा त्या करीत राहिल्या. अलीकडेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाचा ‘ जीवन गौरव पुरस्कार’ त्यांना जाहीर झाला आहे.
संदर्भ : क्षेत्र अध्ययन