हिवरगावकर, पवळा :  ( १२ ऑगस्ट १८७० – ६ डिसेंबर १९३९ ). तमाशातील आद्य स्त्री कलावती. तमाशा सृष्टीतील आद्य स्त्री कलावती म्हणून पवळा हिवरगावकर यांचा उल्लेख केला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरपासून तीन चार मैलावर असलेले  हिवरगाव पावसा हे त्यांचे  गाव आहे. इथल्या तबाजी ( तानाजी) आणि रेऊबाई भालेराव यांची पवळा ही मुलगी. खंडोबाला केलेल्या नवसामुळे मुलगी झाली म्हणून तिला त्यांनी यथावकाश मुरळी म्हणून देवाला अर्पण केले. पवळा दिसायला सुंदर तर होतीच पण तिचा आवाजही गोड होता. आपल्या गोड आवाजात ती खंडोबाची गाणी म्हणायची तेव्हा ऐकणारे थक्क होऊन जायचे. पवळा बारा तेरा वर्षांची झाली तेव्हा तबाजीने तिला हरिबाबा घोलप यांच्याकडे गाणे शिकायला पाठवले.

हरिबाबा हे त्याकाळातील उत्तम कवी, शाहीर होते. त्यांचा छोटासा तमाशाही होता. तोवर तमाशात केवळ तरुण मुलेच स्त्रियांचा वेष करून नाचगाणे करायचे. पवळाच्या रूपाने खरोखर सुंदर दिसणारी, छान नाचणारी तरुण मुलगी तमाशात आल्याने हरिबाबा घोलपांच्या तमाशाची कीर्ती सगळीकडे पसरली. लोकप्रियतेच्या शिखरावर असतांना हरिबाबा घोलप यांना या सगळ्याचा कंटाळा आला आणि त्यांनी विरक्ती पत्करली आणि कीर्तने करू लागले. यानंतर पवळाने कोल्हारच्या कडू सुभान्या लोखंडे व इतर एक दोन तमाशात काम केले. नंतर नामा धुलवडकर यांच्या तमाशात काम करीत असताना हा तमाशा मुंबईत आला. मुंबईत पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडूबा साळी, शिवा संभा कवलापुरकर, शंकरराव अवसरीकर आदी तमाशे गाजत होते ; पण या सगळ्या तमाशात तरुण मुलेच स्त्री वेशात नाचायची. जेव्हा मुंबईत बातमी पसरली की नामा धुलवडकर यांच्या तमाशात खरी खुरी स्त्री नाचते तेव्हा या तमाशाला मोठी गर्दी होऊ लागली. गर्दी इतकी वाढली की नामा धुलवडकरांसारख्या तमासगीराला गुंड प्रवृत्तीच्या प्रेक्षकांपासून पवळाला सांभाळणे कठीण जाऊ लागले. अखेरीस धुलवडकरांनी तमाशा बंद केला आणि पवळा पठ्ठे बापुरावांच्या तमाशात गेली.

पठ्ठे बापूरावांना लहानपणापासून तमाशाची मोठी आवड. आईवडिलांच्या निधनानंतर बापूराव गावातल्या हरिजन वस्तीतल्या तमाशा कलाकारांना कवने रचून द्यायला सुरुवात केली. मग हळूहळू तमासगीर मंडळीत रहायला सुरुवात केली. परंपरेने चालत आलेले गावचे कुलकर्णीपद सांभाळताना बापुरावांकडून चुका होऊ लागल्या. वरिष्ठांकडून विचारणा झाल्यावर बापुरावांनी सरकारी काम सोडले आणि आपले ब्राह्मण्यही सोडले. कलाकार गोळा करून ते तमाशे करू लागले. तोवर ओबडधोबड असलेल्या तमाशात लोकांना चांगली कवने ऐकायला मिळू लागली आणि बापुरावांचा तमाशा गाजू लागला. या तमाशात पवळाचा प्रवेश झाला आणि तमाशा लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचला. असे म्हणतात की बापूराव आज गायलेलं कवन दुसऱ्या दिवशी गात नव्हते. पवळामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला बहर आला होता. अमाप पैसा मिळत होता. बापुरावांचा त्याकाळातील रोजचा खर्च २० – २५ रुपये होऊ लागला. त्याकाळी सरकारी नोकराला महिन्याला एवढा पगार मिळत नव्हता. बापूराव आणि पवळा ही जोडी तमाशा रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली होती. त्याकाळी पवळाचा थाट इतका असायचा की ती मुंबईहून पावसाळ्यात संगमनेरला आली की तिच्यासाठी खास तयार केलेल्या आणि सजवलेल्या छकड्यातून (छोटी बैलगाडी) ती हिवरगावला जायची. तिच्या अंगावर नेहमीच उत्तम शालू असायचा. नखशिखांत सोन्याने मढलेली पवळा गाडीला चहूबाजूने लावलेले पडदे लावून हिवरगावला आपल्या मळ्यात जायची. बापूराव तमाशात रमले पण समाजात ते धर्मांतर करणार असल्याची अफवा पसरली. लोक त्यांना समजून सांगण्यासाठी येऊ लागले. कुणी बापुरावांना समजुतीच्या चार गोष्टी सांगताना पवळाला दोष देऊ लागले तर कुणी बापूरावांना दोष देऊ लागले. तमाशाचे खेळ बंद पडले. इतर कलाकार साथ देईना. अखेरीस तमाशाचे खेळ घेणाऱ्या कंत्राटदारांनी यावर तोडगा काढायचे ठरवले. तमाशाचे खेळ होत नसले तरी सर्वसामान्य रसिकांचे पवळा आणि बापूराव या जोडीवर प्रेम होते. अखेरीस सर्वानुमते या दोघांना नटूनथटून एका छोट्या तंबूत बसवून त्यांना बघण्यासाठी तिकीट लावण्यात आले. लोकांनी प्रचंड गर्दी केली. पुढे पुन्हा तमाशा सुरु झाला.

मुंबईतली सगळी थिएटर गाजवल्यावर पुण्यात आर्यभूषण, सतरंजीवाला चौक, इब्राहीम आदी थिएटरमध्येही या जोडीचा तमाशा गाजला. मोठ्या प्रमाणावर पैसा आला. बापूरावांचा स्वभाव मुळातच खर्चिक त्यामुळे पवळा आणि बापुरावांमध्ये खटके उडू लागले. हे वाद इतके विकोपाला गेले की पवळाने फड सोडला आणि आपल्या गावी गेली. पवळाच्या कलेचे चाहते असलेल्या मारुतीराव पाटील कवठेकर यांनी तिला स्वतंत्र तमाशा फड काढून दिला. पण इथेही काही दिवसातच त्यांचे आणि पवळाचे वाद होऊ लागले. हा तमाशाही बंद झाला. बापूराव पुन्हा पवळाला येऊन भेटले. तिची समजूत घातली आणि पुन्हा तमाशा सुरु केला. पण ही जोडी फार काळ टिकू शकली नाही. लोकांचे टोमणे, अफवा यामुळे पवळा मनातून दुःखी झाली. लोकांचे टोमणे तिला सहन होत नव्हते. तिने तमाशा सोडला आणि गावी परत आली. पवळा सोडून गेल्यावर बापुरावांनी काही काळ तमाशा चालवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. बापूराव मनातून खचले. अखेरच्या काळात पुण्यात पोस्टमन म्हणून काम करणाऱ्या बापूसाहेब जिंतीकर यांनी तमाशा कलेवरील श्रद्धेपोटी बापूरावांचा सांभाळ केला. कधीकाळी एखादी महाराणीसारखे आयुष्य जगणाऱ्या पवळाचे अखेरचे दिवस अतिशय वाईट गेले. वय वाढले, आजारपण सुरु झाले. दम्याने जर्जर झाल्याने शेवटी उपचार करणे गरजेचे होते म्हणून कफल्लक झालेली पवळा मुंबईतल्या नागपाडा भागात रहात असलेल्या तिच्या लक्ष्मण तबाजी भालेराव या भावाकडे गेली. पण आजारपणाने तिची पाठ सोडली नाही. दम्याबरोबरच तिला घटसर्प झाला. कधीकाळी खूप ऐश्वर्य भोगलेली पवळाबाई जग सोडून गेली. अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वरळीच्या स्मशानभूमीत तिचे दफन करण्यात आले.

संदर्भ :   

  • https://maharashtranayak.in/index.php/haivaragaavakara-bhaalaeraava-pavalaa-taanaajai