शिंदे, प्रल्हाद भगवानराव ( १९३३- २३ जून २००४). भक्तीगीते, लोकगीते, भीम गीते, कव्वाली गाणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला. वडील भगवानराव आणि आई सोनाबाई शिंदे यांचे प्रल्हाद हे सर्वात धाकटे चिरंजीव होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांचे पालक रस्त्यावर भक्ती गीते गात असायचे. आणि त्यामुळेच आई वडिलासह प्रल्हाद शिंदे आणि त्यांचे बंधू संगीत क्षेत्राकडे आपसूकच वळले. प्रल्हाद शिंदे वादन आणि गायन सादर करीत असताना बघून आई वडीलांना विशेष आनंद व्हायचा. त्यांची कलेची जिद्द बघून आई वडील सतत मार्गदर्शन करायचे. ऐन तारुण्याच्या वयात प्रल्हाद शिंदे यांनी तबलावादन शिकून घेत इस्माईल आझाद यांच्या गटात कोरस म्हणून काम केले आणि संगीत क्षेत्रात त्यांनी जीवन घडवले. पुढे संगीत क्षेत्रात झोकून देत कार्य करीत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुरेल स्वरांनी बांधून ठेवण्याचे सांगीतिक कार्य करीत त्यांनी आपला नावलौकिक मिळवला तो अद्वितीय असाच ठरला.
प्रल्हाद शिंदे यांची सर्व भक्तीगीते,लोकगीते, भावगीते, कव्वाली, कोळीगीते आजही रसिकांच्या हृदयात घर करू आहेत. संघर्ष आणि जीवन या दुहेरी संकटावर मात करीत त्यांनी आपली कला सतत बहरवत ठेवली. अठराविश्व दारिद्र्याच्या आठवणींना कवेत घेत ते ग्रामीण भागातून कुटुंबासह मुंबईत येत तेथेच स्थायिक झाले. आपल्या उपजत कलेला मुंबईचा रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर आणि जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी कला सादर करून कलेला त्यांनी वाहून घेतले. प्रतिभा आणि उपजत कलेचे दान कदापि ढळू न देता त्यांनी कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले तेव्हा अंत्ययात्रेच्यावेळी प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या गात्या गळ्यातून…’ अरे सागरा शांत हो जरा येथे भीम माझा निजला…’हे गाणे गाऊन वाहिलेली आदरांजली रसिकांच्या स्मरणात राहिली. गाणे कोणतेही असो आपल्या केसांनी गिरकी मारणे, एक विशिष्ट झटका देणे आणि गाणे सादरीकरणातील त्यांची एक विशिष्ट पद्धती ही अफलातून होती. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती गाण्यातून लयबद्धपणे सादर करण्याची त्यांची पद्धत त्रिवार सलाम करण्यास पात्र ठरली. त्याचबरोबर आता तरी देवा मला पावशील का…, करूया उदो उदो अंबाबाईचा…, चंद्रभागेच्या तिरी…, चल ग सखे पंढरीला… जैसे ज्याचे कर्म तैसे…, तूच सुखकर्ता तूच दुखकर्ता…, दर्शन देरे भगवंता…, नाम तुझे घेता देवा…., पाऊले चालती पंढरीची वाट…,या भक्ती गीतांनी, विविध अल्बम्ससह असंख्य गाण्यांनी त्यांना रसिकप्रियता मिळाली. शिवाय पहाटेच्या वेळी मंदिरे किंवा घरोघरी त्यांची हमखास वाजलेली भक्ती गीते मनामनाला आनंद देत गेली.” तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली…” ही कव्वाली तर प्रचंड गाजली. या कव्वालीने रसिकांच्या काळजाचा ठाव धरला. म्हणूनच प्रल्हाद शिंदे यांची सर्व भक्ती गीते सुपरहिट ठरली. बऱ्याचदा ते पंढरपूरच्या वारीत ते सहभागी व्हायचे. तेव्हा ते माईकशिवाय ” पाऊले चालती पंढरीची वाट…” हे गाणे गाताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तरंग ओसंडून राहायचा. त्यावेळी तमाम वारकरी मंडळीदेखील यात सामील होतानाचे बघून प्रल्हाद शिंदे यांना आत्मानंद देत जायचे. त्यांच्या गाण्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे, वरच्या पट्टीत गाताना जिथे इतर गायकाचा श्वास थांबतो तिथून यांचा ताण सुरू व्हायचा. म्हणून लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांना त्यांचा आवाज नेहमी जवळचा वाटत राहिला. त्यांनी लोकसंगीतातील सर्व प्रकार हाताळले आणि प्रत्येक गाण्याला एका लयीत बांधण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही गायकी घराण्याची आणि शास्त्रीय गायनाशी दूरवर संबंध नसलेले ते एक वेगळे व्यक्तिमत्व होते. पहिल्यांदाच एचएमव्हीने कंपनीने त्यांच्या चार गाण्यांचे ध्वनी मुद्रण करून कॅसेट अल्बम काढला.
कलेची जिद्द, प्रचंड निष्ठा आणि श्रद्धा ठेवत त्यांनी कलेवर मनापासून प्रेम केले. तसेच रसिकांप्रती त्यांनी कायम कृतज्ञता भाव देखील व्यक्त केला. कव्वाली, भक्तीगीते, भावगीते आणि इतर कला प्रकार सादर करताना त्यांच्या आवाजासारखा जिवंतपणा इतर गायकांच्या गळ्यात कधीच उतरला नाही. गाण्यात शब्दातले भाव आणि गाणे ओतप्रोत जाणीवांनी बहरत ठेवण्यासाठीची त्यांची कला अप्रतिम होती.
संदर्भ : क्षेत्र अध्ययन