कृष्णन, रमय्या :  ( १९६० ) 

रामय्या कृष्णन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मद्रास येथून यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत बी. टेक. ही पदवी घेतल्यानंतर एम.एस. ही पदव्युत्तर पदवी औद्योगिक अभियांत्रिकी व प्रवर्तन संशोधन या विषयांत, तर पीएच्.डी. पदवी व्यवस्थापन विज्ञान व माहिती प्रणाली या विषयांत अमेरिकेतील ऑस्टीन येथील टेक्सस विद्यापीठ (University of Texas at Austin) येथून मिळवल्या.

ते अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठात व्यवस्थापन विज्ञान व माहिती प्रणाली याविषयांचे  डब्ल्यू. डब्ल्यू. कूपर आणि आर. एफ. कूपर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या बरोबर २००९ पासून ते हेन्झ कॉलेज ऑफ इन्फर्मेशन सिस्टिम्स अँड पब्लिक पॉलिसीचे अधिष्ठाता देखील आहेत. कृष्णन पिट्सबर्गमधील प्रसिद्ध कार्नेगी ग्रंथालयाचे एक विश्वस्तही आहेत.

माहिती तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या अंकीय जगात (digital world) ग्राहकांची मनोवृत्ती आणि वर्तन यासंदर्भात त्यांचे मुख्य संशोधन आहे. या नव्या युगातील व्यवसायांत उद्भवणाऱ्या संधी आणि प्रश्नांसाठी धोरणे आखणे आणि त्या संदर्भात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत त्यांचे विपुल संशोधन आणि लेखन आहे. त्यांचे शोधलेख जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात.

सार्वजनिक वाहने आणि त्यांचे ग्राहक यांच्यात समन्वय साधणे, काळा पैसा व्यवहारात आणण्यापासून रोखणे, दहशतवादी संघटनांची जाळी शोधून ती तोडणे, अचूक औषधे देऊन त्या त्या रोगावर इष्टतम गुण मिळवणे आणि कार्यालयातील गटांचे कार्य कमाल क्षमता कशी गाठू शकेल, या प्रकारच्या बहुविध बाबींसाठी प्रवर्तन संशोधन आणि व्यवस्थापन विज्ञान यांचा वापर करून कृष्णन यांनी शासन तसेच अनेक संस्थाना सल्ला देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि विदा विज्ञान (Data Science) या नवीन क्षेत्रांतील तंत्रांची जोडही दिली आहे.

जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शहरांत निवास करू लागल्याने नवी शहरे नागरिकाभिमुख, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही कशी असावीत आणि त्यांचे व्यवस्थापन आधुनिक माहिती आणि इतर तंत्रज्ञान वापरून कसे करावे, यावर कृष्णन यांनी बरेच संशोधन केले आहे. अशा स्मार्ट सिटी संदर्भात त्यांनी निर्माण केलेले मेट्रो – २१ हे प्रारूप गाजले असून अनेक देशांत वापरले जात आहे.

सिंगापूर सरकारच्या विनंतीवरून तेथे नव्याने स्थापित होत असलेल्या सिंगापूर व्यवस्थापन विद्यापीठासाठी कृष्णन यांनी २००२-०८ दरम्यान नवनिर्मितीसाठी पोषक असणारी संरचना विकसित करून कार्यान्वित केली.

त्यांनी इंटरफेसेस, इन्फर्मेशन सिस्टिमस रिसर्च, मॅनेजमेंट सायन्स आणि द जर्नल ऑन कॉम्प्युटिंग अशा प्रख्यात आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे संपादक म्हणूनही योगदान केले आहे. परिवहन आणि जनोपयोगी विषयांतील समस्यांसाठी निर्णय घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन गणिती पद्धतीनी पार पाडणे यासाठी त्यांनी काही संशोधन केंद्रेही स्थापन केली आहेत.

कृष्णन यांना जागतिक प्रतिष्ठाप्राप्त इन्स्टिट्यूट फॉर ऑपरेशन्स रिसर्च अँड द मॅनेजमेण्ट सायन्सेस (आयएनएफओआरएमएस) या संस्थेचे फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले. हा मान त्यांना प्रवर्तन संशोधन आणि व्यवस्थापनविज्ञान या विषयांना माहिती प्रणालीशी जोडण्यात त्यांच्या संशोधन, अध्यापन आणि उपयोजन याबाबतीत केलेल्या नाविन्यपूर्ण कार्य व नेतृत्वासाठी देण्यात आला. ते आयएनएफओआरएमएस कॉम्प्युटिंग सोसायटीचे पूर्वाध्यक्षही होत. दूरसंचार व्यवस्थापन आणि व्यवसाय तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना प्रतिष्ठित वाय.नायडूम्मा पारितोषिक देण्यात आले.

संदर्भ : 

 समीक्षक : विवेक पाटकर