महाराष्ट्रात इ.स पहिल्या शतकाच्या राष्ट्रकूट वंशापासून सातवाहन, चालुक्य ते चौदाव्या शतकाच्या यादव वंशापर्यंत अनेक जलाशयाची निर्मिती करण्यात आली. भूजलाचा साठा असेल तेथे किंवा नैसर्गिक रित्या त्यास शोधून तिथे भूमिगत बांधकाम करून वसाहतींसाठी पाणी उपलब्ध करून दिले गेले. त्यामुळे पाण्याचा बारमाही आणि शाश्वत ओघ नसलेल्या ठिकाणीही वसाहती निर्माण होऊ शकल्या. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जवळपास १५० ठिकाणी आपल्याला असे जलाशय पाहायला मिळतात.
महाराष्ट्रातील जल स्थापत्याचे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत :
१. आड : सगळ्यात लहान आकाराचा जलसंग्रह. साधारण ३-४ फूट व्यासाचा चौकोनी किंवा अष्टकोनी आकाराचा, परंतु भूमिगत झऱ्यापर्यंत खोल खड्डा खणलेला असतो आणि काही ठिकाणी त्याची खोली निमुळती होत जाते. आडात उतरता येत नाही, परंतु पाणी शेंदण्यासाठी आडावर राहाटाची सोय केलेली असते. एखादया मोठ्या वास्तूच्या आवारात आड बांधली जाते.
२. कूप किंवा वापी : आडा सारखीच आकाराने लहान परंतु खोल व सहसा गोलाकार असते. वरूनच रहाटाच्या साहाय्याने पाणी शेंदले जाते.
३. विहीर : आत उतरण्याची सोय असलेली विहीर आडापेक्षा आकाराने थोड़ी मोठी असून सहसा चौकोनी, अष्टकोनी किंवा गोलाकार असते. पाण्याच्या पातळी पर्यंत उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या असलेल्या विहिरीला पाय विहीर असे म्हणतात. किल्लीसारखा आकार असते व पायऱ्या दगडी बांधकामात बांधलेल्या असतात. विहिरीच्या खोली नुसार पायऱ्यांची संख्या ठरते.
४. कुंड : प्रामुख्याने मंदिरांच्या आवारात स्नानासाठी व पूजा अर्चेला लागणारे पाणी पुरवण्यासाठी बांधली जातात. जलाशय उथळ असतात. आकाराच्या मानाने त्यांची खोली कमी असते. चारही बाजूंनी पायऱ्या उतरत गेल्यामुळे उलट्या पिरॅमिडसारखी रचना म्हणता येईल. काही मंदिरांमध्ये एकमेकांना जोडलेली ३/४ लहान लहान कुंड असतात. पाहिले कुंड भरले की पाणी दुसऱ्या कुंडात जाते, यासाठी जमिनीखालून मार्ग बांधलेला असतो. पहिल्या कुंडाचे पाणी देवासाठी / पिण्यासाठी, पुढचे स्नानासाठी आणि तिथून पुढे पाणी शेतीला पुरवले जाते.
५. बारव : विहीर आणि कुंड या दोन्ही प्रकारांचा संगम असलेले हे बांधकाम. विहिरीप्रमाणे खोल पण आकाराने विहिरीपेक्षा मोठे असलेली बारव म्हणजे एकात एक अशी खोली बरोबर निमुळती होत जाणारी कुंड या प्रकारची रचना असते. पायऱ्यांची संख्या जास्त असल्या कारणाने मधेच रुंद असे टप्पे केले जातात. वरच्या स्तरावर संरक्षक भिंत असते. काही बारावामध्ये छोटे मंडप ही बांधलेले असतात. अशा वास्तूला जलमांडवी म्हणतात.
६. पुष्करणी/ पोखरणी : आकाराने खूप मोठा पण उथळ असा तलाव. चारही बाजूंनी भिंत बांधून यात पाणी साठवले जाते. साधारणपणे मंदिराच्या लगत बांधला जाणारा हा जलाशय. काही ठिकाणी पुष्करणीच्या मधोमधही देऊळ बांधले जाते.
७. तडाग/तलाव : अतिशय विस्तीर्ण असा जलाशय. डोंगराळ भागात घळ/सखल जागा असेल तिथे पावसाचे पाणी अडवण्यासाठी भिंत बांधून तलाव निर्माण केला जातो. इथले पाणी मग भूमिगत नहरांमधून शहरातील हौदांत पुरवले जाते.
८. हौद : आकाराने लहान आणि उथळ असे बांधलेले जलाशय. यातून रोजच्या वापरासाठी सहज पाणी उपलब्ध करून दिले जाते.
प्रामुख्याने दगडी चिऱ्याचे बांधकाम महाराष्टात दिसते, पण काही ठिकाणी विटकामातही आड / विहिरींचे बांधकाम केले आहे. दगडी भिंतींवर कोरलेली शिल्पे हे या वास्तूंचे आणखी एक वैशिष्ट आहे.
समीक्षक : श्रीपाद भालेराव