बाह्यसेवा म्हणजे व्यावसायिक-उद्योगसंस्था किंवा शासकीय संस्था यांद्वारे कौशल्यपूर्ण अशा दुसऱ्या संस्थेशी काम करण्यासाठी करण्यात येणारा करार होय. साधारणतः उद्योग किंवा व्यवसायामध्ये मुख्य उत्पादन घटकांव्यतिरिक्त अन्य इतर गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन उत्पादनक्षमतेपेक्षा कमी प्रमाणात उत्पादन होते. अशा वेळी उद्योगामधील मुख्य उत्पादनाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी बाह्यसेवेची मदत घेणे फायद्याचे ठरते. उदा., कापड उद्योगामध्ये फक्त रेडिमेड कपडे बनविणे हा मुख्य व्यवसाय असेल, तर अशा वेळी कच्चामाल आणणे, तयार कपडे वितरकांकडे पाठविणे, जाहिरात करणे इत्यादी गोष्टींसाठी कारखानदाराने वेळ द्यायचे ठरविले, तर त्यामध्ये त्याचा भरपूर वेळ वाया जाईल आणि मुख्य उत्पादन कमी होईल. अशा वेळी त्या त्या क्षेत्रातील नामांकित व कौशल्यपूर्ण संस्थेची मदत घेणे फायदेशीर ठरते.

आज वस्तू व सेवांची देवाण-घेवाण अतिशय विशेष पद्धतीने जगभर होत आहे. बऱ्याच सेवांसाठी अतिशय सूक्ष्म आकर्षक कौशल्यांची गरज असते. जागतिक स्तरावर वाढत्या स्पर्धांमुळे बहुतांश कारखाने किंवा उद्योगसंस्था त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यावर जोर देताना आढळतात किंवा त्यांच्या वस्तूंच्या गुणवत्तेत सुधारणा करताना दिसतात. ते जागतिक बाजारात आपली जागा स्थापित करण्यासाठी बांधील असल्यामुळे ते आपल्या व्यावसायिक कार्यावर लक्ष देत आहेत. या सर्व कारणांमुळे कमी महत्त्व असलेल्या क्षेत्रांतील कामे, विशिष्ट कुशल असलेल्या सेवा देणाऱ्या संस्थांकडून घेण्यात येत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करण्याचा परिणाम म्हणूण बाह्यसेवा घेण्याची संकल्पना उदयास आली.

प्रकार :

  • (१) ऑन शोरिंग : यामध्ये स्थानिक पातळीवरील ठेकेदार किंवा एजन्सी यांच्याकडून कामे करून घेतली जातात.
  • (२) ऑफ शोरिंग : यामध्ये देशाबाहेरील ठेकेदार किंवा एजन्सी यांच्याकडून कामे करून घेतली जातात.
  • (३) निअर शोरिंग : यामध्ये जवळच्या देशातील ठेकेदार किंवा एजन्सी यांच्याकडून कामे करून घेतली जातात.
  • (४) होम शोरिंग : यामध्ये घरातून बाह्यसेवेची कामे करता येतात.

विभाग : बाह्यसेवा ही मुख्यतः तांत्रिक सेवा आणि व्यावसायिक प्रक्रिया या दोन विभागांत विभागली जाते.

(१) तांत्रिक सेवा : यामध्ये संगणकाची आज्ञावली व अनुप्रयोग; संरचना; दूरसंचार; ई-वाणिज्य; वेब सुरक्षा व समाधान; वेब होस्टिंग; वेब डिझाइनिंग; विकास आणि देखभाल इत्यादींचा समावेश असतो.

(२) व्यावसायिक प्रक्रिया : यामध्ये व्यवस्थापकीय कामे; ग्राहकसंबंधित व्यवस्थापन; विक्री व व्यवस्थापन; व्यवस्थापकीय साह्य; देयक भूमिका, देखभाल व इतर व्यवहार प्रक्रिया; वित्त व जमाखर्च; मानवीय स्रोत व प्रशिक्षण; रसद, खरेदी व पुरवठासाखळी व्यवस्थापन; वैद्यकिय प्रतिलेखन; सुरक्षितता, संशोधन व पृथःकरण; उत्पादन विकास; कायदेशीर सेवा; बौद्धिक संपत्ती संशोधन व विकास इत्यादींचा उपयोग केला जातो.

वरील पद्धतींप्रमाणेच अनेक वेगवेगळ्या संकल्पना या बाह्यसेवेसाठी वापरल्या जातात. उदा., बिझनिस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ), केपीओ, एलपीओ, आरपीओ इत्यादी.

व्यवसाय बाह्यसेवा प्रक्रिया (बिजनेस प्रोसेस आउटस्टँडिंग – बीपीओ) : हा असा उद्योग किंवा व्यवसाय आहे की, ज्यामध्ये आपण आपल्या उद्योगाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बाहेरच्या देशाची, संस्थेची मदत करत असतो. उदा., विप्रो, इन्फोसिस, झेटा इत्यादी कंपन्या भारतात असूनदेखील बाहेरील देशातील उद्योग प्रक्रियेला मदत करतात.

  • ग्राहक मदत सेवा – कॉल सेंटर : यामध्ये ग्राहकांना २४ तास आठवडाभर त्यांच्या तक्रारी किंवा समस्या सोडविण्यासाठी मदत केली जाते. बीपीओ कंपनीचे ७० टक्के उत्त्पन्न हे कॉल सेंटरमधून मिळते.
  • करार विक्री : तांत्रिक सेवा साहित्य इत्यादी मदत करणे.
  • माहिती सेवा : यामध्ये व्यवसाय कंपनीच्या दैनंदिन कामाची देखभाल करणे व माहिती अद्यावत ठेवण्याचे कार्य केले जाते. उदा. खात्यांची कामे करणे इत्यादी.
  • उद्दिष्टांवर लक्ष : दैनंदिन कामासाठी बाह्यसेवेची मदत घेतल्यामुळे कंपनी, उद्योगाला आपल्या महत्त्वाच्या उद्दिष्टांवर, बाबींवर लक्ष केंद्रित करता येते.
  • खर्चात कपात : अमेरिकेसारख्या देशाला स्वत:च्या देशातून काम करून घेण्यापेक्षा तेच काम बाहेरच्या देशांतून करून घेणे फायद्याचे ठरते.
  • कामगारांचे प्रश्न : काही ठिकाणी कुशल कामगारांची टंचाई असते. त्यामुळे कामे अडकून राहतात.

ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग – एन. पी. ओ.) : एका देशातील ज्ञान, कौशल्य यांचा वापर बाहेरील एकापेक्षा जास्त देश आपल्या उद्योगाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वापरतात. उदा., युट्युबवरील माहितीचा उपयोग वेगवेगळ्या देशांतील लोकांना आपले ज्ञान कौशल्य वाढविण्यासाठी होतो.

बाह्य सेवा घेण्यासाठी ठेकेदार किंवा एजन्सीची निवड करण्यासाठी लागणारे निकष :

  • संस्था ही गुणवत्तेवर पूर्णपणे खरी उतरणारी असावी.
  • संस्था फायदेशीर किंमतीत असावी.
  • पुरेसे क्षमतापूर्ण स्रोतांची उपलब्धतता असावी.
  • एजन्सीला कामाचा पूर्वानुभव असावा आणि त्यांनी दिलेल्या त्या सेवेबद्दल ग्राहक समाधानी असावा.
  • कराराच्या अटी सुविधावर्धक, सोप्या व लवचिक असाव्यात. जेणेकरून त्या ग्राहकाला सुधारणा करण्यास व रद्द करण्यास सोप्या जाव्यात.
  • ग्राहकाच्या कामात गोपनीयता व विश्वासार्हता असणे आवश्यक आहे.

बाह्यसेवेचे फायदे :

  • बाह्यसेवेमुळे कंपनी आपल्या मुख्य उत्पादनावर जास्तीत जास्त लक्ष देवून उत्पादनात वृद्धी करु शकेल. त्यामुळे कार्यक्षमता व परिणामकारकता साधता येईल.
  • बाह्यसेवेमागील मुख्य कारण म्हणजे खर्चात बचत करणे होय. संस्थेला बाह्यसेवेमुळे किमतीत घट करता येते. या सेवेसाठी येणारा खर्च हा संस्थेत मोठ्या कर्मचारी वर्गावर करण्यात येणाऱ्या खर्चापेक्षा कमी येतो.
  • संस्थांना आपल्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करता येते.
  • कमी खर्चात मनुष्यबळ मिळणे शक्य होते.
  • कंपनीच्या गुंतवणुकीत बचत होते.
  • बाह्यसेवेमुळे वेळेची बचत होते.
  • बाह्यसेवा देणारी संस्था किंवा एजन्सी ठराविक सेवा मोठया प्रमाणात देण्यात अग्रेसर व निपुण असल्यामुळे तिला वेळच्या वेळी नव्या येणाऱ्या तांत्रिकबाबींची माहिती असते.
  • संस्थेंतर्गत ज्ञानाचे आदान-प्रदान होण्यास मदत होते.
  • ज्या ठिकाणाहून बाह्यसेवा दिल्या जातात, त्या देशात व्यापार, उद्योगधंदा आणि निर्यातीस चालना मिळते.

बाह्य सेवेचे तोटे :

  • ठेकेदारांकडून कंपनीबद्दलच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो.
  • किंमत कमी करण्याच्या नादात बऱ्याच संस्थांना बाह्यसेवेच्या दर्जावर तडजोड करावी लागते. हे अनेक क्षेत्रांत मोठ्याप्रमाणात दिसून येते. जेथे कंपनी कमी किमतीत बाहेरील देशातून मनुष्यबळ मागविते.
  • कधी कधी संस्थांकडून नैतिक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते; ज्यांचा संबंध बाह्यसेवेशी आहे. उदा., एक देश दुसऱ्या देशातील अशा वस्तूंची आयात करतो, ज्यात वस्तूंचे उत्पादन करताना बाल मजुरीचा उपयोग केला आहे. ज्या देशांमध्ये बाल मजुरी कायदा कडक असतो, अशा देशांमध्येच अशा गोष्टी आढळून येतात.
  • बाह्यसेवेचा दर्जा कधी कधी दिलेल्या प्रमाणकाच्या बरोबरचा नसतो.

सध्या शासनाद्वारे बाह्यसेवा संस्थांसोबत करार करून विविध क्षेत्रांमध्ये शासकीय नोकरी प्रदान करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

समीक्षक : अनिल पडोशी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.