लव्हीन, फीबस : (२५ फेब्रुवारी १८६९ – ६ सप्टेंबर १९४०). रशियात जन्मलेले अमेरिकन जीवशास्त्रज्ञ. न्यूक्लिक आम्लाचा अभ्यास करणारे ते अग्रणी संशोधक होते.
लव्हीन यांचा जन्म रशियाच्या सगोर या शहरात एका ज्यू कुटुंबात झाला, परंतु ते सेंट पीटर्झबर्ग या शहरात लहानाचे मोठे झाले. याच ठिकाणी त्यांनी इम्पिरियल मिलिटरी मेडिकल अॅकेडेमीमधून वैद्यकीय शिक्षण घेऊन एम्.डी. ही पदवी प्राप्त केली (१८९१). त्यानंतर त्यांना जीवरसायनशास्त्र या विषयामध्ये आवड निर्माण झाली. रशियात सुरू असलेल्या ज्यू विरोधी वातावरणामुळे नंतर ते न्यूयॉर्कमध्ये वैद्यकीय व्यवसायाकरिता गेले. वैद्यकीय व्यवसाय चालू असतांना त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयाचे अभ्यास केले आणि त्याच विषयात पुढे संशोधन करण्याचे त्यांनी ठरविले. विविध प्रकारच्या शर्करेच्या रासायनिक रचनेवर अभ्यास करून त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. पुढे त्यांची पॅथॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूयॉर्क स्टेट हॉस्पिटल्समध्ये सहयोगी म्हणून नियुक्ती झाली. या ठिकाणी त्यांना प्रथिनांमध्ये तज्ज्ञ असणारे रसायनशास्त्रज्ञ आल्ब्रेख्ट कोसेल आणि एमील फिश्चर यांचा सहवास लाभला आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांची १९०५ मध्ये रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च या नामांकित संस्थेच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांची उर्वरित कारकीर्द याच ठिकाणी घालविली (१९३९). याच ठिकाणी त्यांनी डीएनएमध्ये असलेले विविध घटक ओळखले. रिबोज आणि डीऑक्सिरिबोज या दोन प्रकारच्या न्यूक्लिक आम्लांमधील शर्करेचा शोध त्यांनी लावला. इतकेच नव्हे तर या घटकांची न्यूक्लिक आम्लांमध्ये रचना कशी असते हे दाखवून दिले. यातील घटक हे फॉस्फेट-शर्करा-नायट्रोजनयुक्त पायाभूत पदार्थ या क्रमाने जोडलेले असतात आणि या तीन घटकांचे मिळून एक गट तयार होतो. या गटालाच त्यांनी न्यूक्लिओटाइड असे संबोधिले. डीएनएमध्ये असे अनेक न्यूक्लिओटाइड एकमेकांना फॉस्फेटच्या माध्यमातून जोडलेले असतात आणि त्यामुळे त्यांची येथे एक साखळी तयार होते. ही साखळी म्हणजेच डीएनएच्या रचनेचा मुख्य कणा आहे. परंतु डीएनएच्या रचनेबाबतची लव्हीन यांची कल्पना पूर्णपणे चुकीची होती. प्रत्येक डीएनएमध्ये केवळ चारच न्यूक्लिओटाइड असतात असे त्यांना वाटत होते. ही रचना रासायनिकदृष्ट्या अतिशय साधी असल्यामुळे ती आनुवंशिकतेची परिभाषा साठवून ठेवू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु डीएनएची खरी रचना सांगणाऱ्या नंतरच्या कामासाठी लव्हीन यांचे हे काम फार महत्त्वपूर्ण ठरले. सुमारे ७००पेक्षा जास्त शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले. दुर्दैवाने डीएनएचा खरा अर्थ आणि महत्त्व कळण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
लव्हीन हे त्यांच्या टेट्रान्यूक्लिओटाइड हायपोथेसिससाठी विख्यात होते. साधारणत: १९१०च्या दरम्यान हे गृहीतक त्यांनी मांडले. यानुसार डीएनएमध्ये अॅडेनीन, ग्वानीन, थायमीन आणि सायटोसीन हे नायट्रोजनयुक्त घटक समप्रमाणात असतात असे त्यांनी पहिल्यांदा सांगितले. यापूर्वी डीएनएमध्ये टेट्रान्यूक्लिओटाइडांच्या घटकांची पुनरावृत्ती झालेली असते किंवा ते वारंवार आढळतात आणि त्यामुळे ते आनुवंशिकतेची माहिती देऊ शकत नाहीत. तसेच गुणसूत्रांसोबत असलेली प्रथिने ही आनुवंशिकतेचे काम करतात, असा समज होता. त्यामुळे १९४०पूर्वी आनुवंशिकतेचा घटक या नात्याने जास्तीत जास्त संशोधन प्रथिनावरच केंद्रित केले होते.
लव्हीन यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #जीवशास्त्रज्ञ #न्यूक्लिकआम्ल #ॲडेनीन #ग्वानीन #थायमीन #सायटोसीन #डीऑक्सिरायबोज #फॉस्फेट #टेट्रान्यूक्लिओटाइडहायपोथेसिस
संदर्भ :
- http://en.wikipedia.org/wiki/Arthur_Felix
- Tipson RS (1957).Phoebus Aaron Theodor Levene,1869-194.Adv.Carbohydr Chem.12:1-12
- National Academy of Sciences Biographical Memoir
समीक्षक : रंजन गर्गे