अवधान काव्य: अवधानशक्तीने रचले गेलेले तेलुगु काव्य. तेलुगु कवितेतील हा एक  विशेष काव्यप्रकार आहे. यात कविच्या विलक्षण धारणा शक्तीची परीक्षा घेतली जाते. अनेक गोष्टींची स्मृती एकाच वेळी जिवंत ठेवून काव्यात विविध विषय लवकर गुंफण्याची क्षमता असलेल्या कवीला अवधानी म्हणतात. ‘अष्टावधान’ आणि ‘शतावधान’ असे त्याचे दोन प्रकार आहेत. ‘सहस्रावधान’ अत्यंत दुर्मिळ असते. अष्टावधान करणाऱ्या व्यक्तीच्या चारही बाजूला आठ विद्वान प्रश्न विचारण्यासाठी बसलेले असतात. त्यापैकी एक अवधानीला एखादा विषय देऊन त्यावर कविता रचण्यास सांगतो. दुसरा समोर समस्या मांडतो. तिसरा चार विसंगत शब्द देऊन त्यांचा उपयोग काव्यात करण्याचे सांगतो. चौथा एखाद्या पुराणातील पाठ वाचून त्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगतो. पाचवा घंटी वाजवत वाजवत अवधानीवर फुले फेकतो. अवधानीने त्या फुलांची संख्या मोजून सांगायची असते. सहावा कोणी तरी असंबद्ध बडबड करून अवधानीचे चित्त विचलित करण्याचा प्रयत्न करतो. सातवा जेव्हा अवधानी एखाद्या विषयावर कविता रचत असतो तेव्हा कवितेच्या अक्षरांचे क्रम बदलून अवधानीला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतो आणि आठवा साहित्यिक चर्चा करत राहतो. अवधानीने शेवटपर्यंत हे सर्व लक्षात ठेवून मध्ये मध्ये प्रत्येक प्रश्नकर्त्याला एक एक काव्याची ओळ लवकर सांगायची असते आणि शेवटी सर्व काव्याचे पुनरुच्चारण करायचे असते. अशी सिद्धी अवधानीच्या बहुश्रुतता, कठोर साधना आणि तीव्र स्मरणशक्तीवर अवलंबून असते. शुद्ध कवितेशी त्याचा क्वचितच संबंध असतो. कवी श्रीनिवास चतुर्वेदी यांनी अष्टावधानम काव्य रचले आहे.