(स्थापना – १९६८). संस्थेचे संस्थापक बनबिहारी विष्णू निंबकर यांनी १९६८ मध्ये त्यांचे वडिल मुंबईचे उद्योगपती श्री. विष्णू रामचंद्र निंबकर यांच्या मार्गदर्शनाने सातारा जिल्ह्यातील फलटण येथे निंबकर कृषी संशोधन संस्था ऊर्फ नारी (NARI) या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. निंबकर यांनी अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठातून कृषिशास्त्रातील एम.एससी. पदवी मिळवली व १९५६ मध्ये ते भारतात परतले. त्यांनी अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनबरोबर फलटणमध्ये काम करून धान्याचे संकरित बियाणे तयार करायचे शिकून बी-बियाणे उत्पादनासाठी निंबकर सीड्स प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली. रॉकफेलर फाउंडेशनमधील स्नेह्यांच्या सूचनेवरून त्यांनी कंपनीला संशोधनाचे अधिष्ठान देण्यासाठी निंबकर कृषी संशोधन संस्था अर्थात नारी या संस्थेची स्थापन केली. नारी संस्थेची नोंदणी झाल्यावर सुरुवातीची काही वर्षे निधीची गरज निंबकर सीड्स कंपनीने आणि काही मित्रमंडळी, नातेवाईक व इतर संस्था यांनी भागवली. आता ही संस्था स्वतःची ५० हे. शेतजमीन व आवर्ती खर्चासाठी काही गंगाजळी असलेली संस्था झाली आहे. संस्थेने प्रामुख्याने कृषी, पशुसंवर्धन व अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रांमध्ये संशोधन केले आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये संस्थेने शेळ्या, मेंढ्या ही गरीबांच्या दृष्टीने महत्त्वाची जनावरे, विविध पिके व सुधारित कंदील, स्टोव्ह, सायकल, रिक्षा, गॅसिफायर अशा साधनांवर संशोधन केले आहे. त्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे या संशोधनाचा फायदा लाखो शेतकरी,  पशुपालक व ग्रामीण नागरिकांना करून दिलेला आहे. पिके व जनावरे यांच्या आनुवंशिक सुधारणेसाठी नारी संस्थेने परदेशातील जैविक स्रोतांचासुद्धा वापर केला. कपाशी व सूर्यफुलाच्या परदेशी जातींपासून विकसित केलेल्या नारी संस्थेच्या या पिकाच्या जाती खूप लोकप्रिय झाल्या आहेत.

नारी संस्थेने अंगिकारलेल्या विषयांमध्ये ही संस्था आता देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते. या क्षेत्रांमधील सरकारी धोरणांवरही नारी संस्थेचा प्रभाव दिसून येतो. नारी संस्थेला त्यांच्या कृषी संशोधनाच्या प्रसारासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) व भारत सरकारच्या अनेक राष्ट्रीय संस्था तसेच अमेरिकन, ऑस्ट्रेलियन  आंतरराष्ट्रीय  कृषी संशोधन संस्थांकडून अर्थसाहाय्य मिळाले आहे.

संस्थेत अपारंपरिक, नूतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोतांवर संशोधन सुरू केले. संस्थेत शेळ्या-मेंढ्यांच्या आनुवंशिक सुधारणेचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे होते.  भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत  नारी संस्थेने १९८० पासून करडईच्या प्रचलित जातींपेक्षा सुमारे ५ ते ७ % अधिक तेल असलेल्या जाती विकसित केल्या आहेत. शिवाय करडईच्या बिनकाटेरी जातीही विकसित केल्या आहेत. त्यामुळे बियांबरोबर हेक्टरी १०० – १५० किग्रॅ. फुलांचे उत्पादन मिळू शकते.

नारी संस्थेने २००९ पासून अमेरिकेतून गोड धाटाच्या ज्वारीच्या जाती भारतात आणून संकराद्वारे स्थानिक जातीमध्ये उत्तम प्रतीचे धान्य देण्याची क्षमता निर्माण केली.  धाटाच्या ज्वारीच्या ताटांच्या रसापासून गूळ व काकवी तयार करण्याचे तंत्र  संस्थेने १९७०च्या दशकात विकसित केले. या तंत्रात काकवीसाठी लागणारी उष्णता ऊसाचे पाचट वापरून गॅसिफायर संयंत्राद्वारे पुरवली जाते. १९८०च्या दशकात सौरऊर्जेचा वापर करून धाटाच्या आंबवलेल्या रसापासून मद्यार्क तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.

२००९पासून नारी संस्थेत शेळी सुधार प्रकल्पांतर्गत शेळीपालक पाळत असलेल्या उस्मानाबादी शेळीवर संशोधन चालू आहे. सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यांमधील साधारण १२०० शेळ्यांच्या वजनवाढ, दूधउत्पादन, करडे विक्री, मरतूक इ. बाबतच्या सलग ४ ते ७वर्षे नोंदी केल्या. त्यावरील शास्त्रोक्त विश्लेषणावरून संस्थेने सिद्ध केले की, उस्मानाबादी शेळी ही उत्पादनक्षमतेच्या सर्व निकषांप्रमाणे भारतातील एक सर्वोत्कृष्ट जात आहे. संस्थेने शेतकऱ्यांकडील निवडक उत्कृष्ट उस्मानाबादी बोकडांचे दर्जेदार गोठविलेले वीर्य शेळ्यांच्या कृत्रिम रेतनासाठी उपलब्ध केले आहे.

नारी संस्थेने मद्यार्कावर चालणारा अधिक कार्यक्षम सुधारित नूरी कंदील व लॅनस्टोव्ह हा स्वयंपाक व उजेड या दोन्हींसाठी वापरता येईल असा स्टोव्ह विकसित केला. संस्थेने कार्यक्षम व सुधारित इम्प्रा सायकल रिक्षा, बॅटरीवर चालणारी माप्रा सायकल रिक्षा, अपंगांना चालविता येऊ शकेल अशी मनहरा सायकल रिक्षा व पूर्ण स्वयंचलित इलेक्शा विद्युत रिक्षा विकसित केल्या. तसेच सूर्यऊर्जा वापरून कमी खर्चात पाणी शुद्ध करण्याची अभिनव पद्धत शोधली. आणि जुळ्या कोकरांसाठी कारणीभूत असणाऱ्या FecB जनुकाची डीएनए. चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी केली. दख्खनी मेंढीच्या जुळी कोकरे देणाऱ्या नारी सुवर्णा वाणाचा विकास व प्रसार केला. नारी सुवर्णा मेंढ्या मेंढपाळांना जवळजवळ ६०टक्के जास्त फायदा मिळवून देतात. सध्या या वाणाचे १२५० नर व माद्या महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील मेंढपाळांच्या कळपांमध्ये समविष्ट झाल्या असून त्यांचा पैदाशीसाठी यशस्वी वापर होत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या अनुदानातून संस्थेने बोकडांच्या वीर्याच्या वर्षाला सव्वा-लाख स्ट्रॉ गोठविण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली. ही अशा प्रकारची भारतातील पहिली प्रयोगशाळा आहे. येथे गोठविलेले वीर्य वापरून शेळ्या गाभण होण्याचे प्रमाण ५०-७५ टक्के आहे.

नारी संस्थेने विकसित केलेल्या चारा पिकाच्या जातीमधे, मावा-प्रतिकारक (नारी निर्बीजा) सुबाभळीची संकरित जात म्युलॅटो संकरित ब्रॅकिआरिया जातीचे गवत, स्टायलो सियाब्राना द्व‍िदल गवत, वंडरग्रेझ व टरांबा सुबाभळीच्या हवाईन नवीन जाती, अंजन (सेंक्रस) गवताच्या अमेरिकेन जाती उल्लेखनिय आहेत.

मटण उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या बोअर ह्या जातीच्या शेळ्यांची भारतात सर्वप्रथम आयात नारीने, महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्था आणि नारी संलग्न शेळी-मेंढी विकास संस्थेच्या सहकार्याने केली. त्यामुळे आज काटक आणि जलद वजनवाढ असणाऱ्या बोअर या दक्षिण आफ्रिकेतल्या शेळ्या पैदाशीसाठी ठाणबंद पद्धतीने पाळून ग्रामीण युवकांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ इ. राज्यांत शेळीपालनाचे उद्योग चालू केले आहेत. बोअर व गावठी शेळ्यांच्या संकरीकरणाचे फायदेदेखील उत्तम दिसून आले आहेत. दमास्कस ही दूध व मटणासाठी उपयुक्त अशी शेळीची सुधारित जातही ह्या संस्थांनी मध्यपूर्वेतून भारतात आणली व तिचा प्रसार कृत्रिम रेतनाद्वारे चालू आहे.

नारी संस्थेचे संस्थापक बनबिहारी निंबकर यांना २००६मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

कळीचे शब्द : #बोअरशेळीचे #कपाशी #सूर्यफूल #करडी #तेलबिया #उस्मानाबादी #शेळी

संदर्भ :

समीक्षक : विठ्ठल चापके