शक्ती तुरा (जाखडी नृत्य) : शक्ती तुरा, ज्याला जाखडी नृत्य म्हणूनही ओळखले जाते, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. हे पारंपरिक नृत्य विशेषतः कोकण भागातल्या उत्सवांमध्ये, धार्मिक सोहळ्यांमध्ये आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये साजरे केले जाते. जाखडी नृत्याची खासियत म्हणजे त्यातील ऊर्जाशील हालचाली, रंगीबेरंगी परिधान आणि सुसंगत संगीत होय. जाखडी नृत्याची मूळ उत्पत्ती महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांशी जोडलेली आहे. हे नृत्य देवी शक्तीची पूजा करण्यासाठी आणि नैसर्गिक शक्तींना आभार मानण्यासाठी पारंपरिकपणे केले जात असे.
शक्ती तुरा अर्थात जाखडी नृत्य. बाल्या नृत्य म्हणूनही हा लोककला प्रकार महाराष्ट्रात कोकण प्रांतात प्रसिद्ध आहे. या नृत्यातील दोन संप्रदाय म्हणजेच शक्ती व तुरा. शक्ती म्हणजे शिवप्रिय पार्वती आणि तुरा म्हणजे शिवशंकर. साधारण गणपती, दसरा या सणांच्या निमित्ताने हा कलाप्रकार खुल्या रंगमंचावर कुणबी समाजाकडून सादर करण्यात येतो. मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, मंडणगड, दापोली;तसेच रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, रोहे, पेण, पनवेल आदी भागात शक्ती तुरा सादर होतो.
ही लोककला पुरुषप्रधान असून यात कमीत कमी ८-१० तर कधी कधी जास्तीत जास्त १२ ते १५ जण सहभागी होतात. या शक्ती तुऱ्यात गायन, वादन, नृत्य यांचा कलापूर्ण व सौंदर्यपूर्ण सुमेळ साधलेला दिसतो. यातील गायक हा मध्यभागी उभा राहतो. यांना शाहीर म्हटलं जातं. शाहीर यांच्या पायाशी वादक बसतात आणि बाकी नृत्य करणारे कलावंत नृत्य करत यांच्या भोवती गोलाकार फिरतात. नाचताना गिरक्या, सलामी, बैठका आदी नृत्य प्रकार या लोककलेत दिसतात. यात ढोलकी हे प्रमुख वाद्य असते. काही ठिकाणी झन्नरी (एका लाकडी काठीवर किंवा तारेत गुंफलेले अनेक घुंगरू गुंडाळलेले एक वाद्य) वादक रंगमंचावर दिसतो.
नृत्याच्या गतीशील तालावरून आणि हातांच्या नृत्यकला दाखवून जाखडी नृत्याला एक अद्वितीय ओळख प्राप्त झाली आहे. संगीतामध्ये ढोल, नवरंगी तास आणि अन्य पारंपरिक वाद्यांचा वापर होतो, ज्यामुळे नृत्याला उत्साही आणि जिवंत लय प्राप्त होते. सहभागी एकमेकांशी सुसंगततेने हालचाल करून आणि आनंदाने नृत्य करून समुदायातील एकता आणि सौहार्द प्रदर्शित करतात.
या लोककलेचे सादरीकरण अर्थात गणेश स्तवनाने म्हणजे ‘अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र…’किंवा‘गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा..’ या दोन श्लोकांनी सुरुवात होऊन पुढे ढोलकीच्या ठेकयावर…..
‘बोल बोल बोल बोल बजरंग बली की जय,
तुरेवाले की जय..’
किंवा
‘गणा धावरे मला पावरे,
तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे,
तू दर्शन आम्हाला दावरे..’
किंवा
‘श्रावण बाळ जातो काशीला
जातो काशीला
माता-पित्याची कावड खांद्याला
कावड खांद्याला’
अशा लोकगीतातून होते व पुढेपुराणातील एखाद्या छोट्या कथेचे गायनातून निवेदनानंतर प्रतिपक्षाला सवाल (प्रश्न) विचारला जातो. दुसरा पक्ष प्रथम विचारलेल्या सवालाचा जबाब (उत्तर) देतो आणि नंतर स्वतः एक कथा निवेदन करून एक नवा प्रश्न प्रतिपक्षाला विचारतो. यात कुट प्रश्न विचारले जातात. वेद पुराणांवर आधारित प्रश्न आणि त्याची उत्तरे हे या लोककलेचे प्रमुख वैशिष्ट्य. यात गणेशपुराण, रामायण, महाभारत, संतकथा, नवनाथांच्या कथा, हरिविजय, भक्ती विजय यातील मुलतत्व, आदितत्व आणि तत्त्वांची उत्पत्ती हेच या लोककला प्रकाराचा मूळ विषय असतो. सवाल जवाब प्रसंगी ज्या पक्षास अचूक उत्तर देता येत नाही तो पराभूत झाला अशी लोकधारणा आहे.
यात नर्तक कलावंतांची वेशभूषा ही लक्षवेधक असते. रंगभूषेचा वापर केलेला आढळत नाही. शाहीर व वाद्य वाजवणारे पांढऱ्या झब्बा लेंग्यात असतात. तर कधी आपण इतर समूहात उठून दिसाव म्हणून शक्तीवाले किंवा तुरेवाले डोक्याला फेटा बांधतात, दोन्ही पक्षातील सादरकर्ते डोक्यावरती मुकुटही घालतात. मुंबई प्रांतामध्ये जाखडी नृत्य सादर करताना पारंपारिक वेशभूषा म्हणजेच हाफ पॅन्ट आणि पांढरी बनियानसोबत दोन्ही हातात दोन गडद रंगाचे रुमाल तसेच उजव्या पायात चाळ बांधुन ही लोककला सादर केली जाते.
जाखडी नृत्य हे मुख्यत्वे कोकणातील कुणबी समाजाने शतकानुशतके जतन व संवर्धित केलेले आढळते. आजच्या आधुनिक युगात, जाखडी नृत्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहे. विविध सांस्कृतिक महोत्सवांमध्ये हा नृत्य सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि प्रचार करण्यात येत आहे. शक्ती तुरा अर्थात जाखडी नृत्य हा महाराष्ट्राच्या विविधतेचे आणि सांस्कृतिक संपन्नतेचे प्रतीक आहे, ज्याला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे.
संदर्भ : क्षेत्र संशोधन