सिंग, लान्सनाईक करम : (१५ सप्टेंबर १९१५—२० जानेवारी १९९३). भारतीय लष्करातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म सेद्रना (जि. संग्रूर, पंजाब) या खेड्यात एका सधन शेतकरी सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील सरदार उत्तम सिंग हे होत. करम सिंग यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण जन्मगावी घेतले आणि संग्रूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले; मात्र पदवी घेण्यापूर्वीच त्यांनी शिक्षण सोडून लष्करात भरती होण्याचे ठरविले. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत ते शीख पलटणीमध्ये भरती झाले (१५ सप्टेंबर १९४१). त्यांनी म्यानमारमध्ये अतुलनीय पराक्रम केलाच, त्याशिवाय ‘बॅटल ऑफ ॲडमन बॉक्स’मधील त्यांच्या शौर्यपूर्ण, धीरोदात्त कामगिरीबद्दल त्यांना ‘सैनिकी पदक’ (Military Medal) देऊन सन्मानित करण्यात आले होते (१४ मार्च १९४४). करम सिंग उत्तम खेळाडू होते आणि पोलो व उंच उडी या खेळांमध्ये ते प्रवीण होते. लष्कराच्या क्रीडांमधून ते खेळत असत.

भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमधील टिथवालवर ताबा मिळविला (२३ मे १९४८). त्यानंतर पाकिस्तानी घुसखोरांनी टिथवाल आणि रिचमरगलीवर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. १३ ऑक्टोबर १९४८ रोजी रिचमरगलीवर हल्ला चढवून ते काबीज करावयाचे आणि तेथून टिथवाल घाटी पार करून काश्मीर खोऱ्यात उतरावयाचे, असा त्यांचा प्रयत्न होता. या ठिकाणी शीख पलटण तैनात होती. तिने शत्रुसैन्याचा कडवा प्रतिकार केला. पहाटे सहा वाजता शत्रूने माघार घेतली आणि पुन्हा सकाळी साडेनऊ वाजता तोफा, दारूगोळा, मशीनगन वगैरे शस्त्रास्त्रांची जय्यत तयारी करून कंपनीच्या ठिकाणावर हल्ला चढविला; परंतु तोही शीख पलटणीने परतवून लावला; पण या कारवाईत त्यांचे बहुतेक खंदक ढासळले. विमानदलाची त्यांनी मदत मागविली. या दलाने शत्रूला गुंतवून ठेवले; मात्र शत्रूने निकराचे प्रयत्न चालूच ठेवले. दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी शत्रूचा जोर वाढला. या घनघोर लढाईच्या वेळी करम सिंग पहारा करीत असलेल्या ठिकाणावर त्यांचे प्रामुख्याने लक्ष्य होते. करम सिंगांकडे फक्त चार तगडे जवान होते, आदल्या दिवशीच्या हल्ल्यात त्यांपैकी दोन जवान जखमी झाले होते. शिवाय दारूगोळाही मर्यादित होता. तत्काळ मदत मिळणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत करम सिंगांनी जखमी साथीदार जवानांना कंपनीच्या मुख्यालयात पोहोचविले आणि स्वतः शत्रूशी मुकाबला करण्यास सरसावले. सहकाऱ्यांना प्रोत्साहित करीत त्यांनी आपल्या खंदकातून उडी मारून नजीक आलेल्या दोघा शत्रूसैनिकांना संगिनीने भोसकून ठार केले व पुन्हा खंदकात लपून बसले. शत्रूने पुन्हा उचल खाऊन हल्ला  केला; पण तोही त्यांनी परतविला. अखेर शत्रूने सूर्यास्ताला हल्ला थांबविला. करम सिंगांच्या एकाकी प्रतिकारामुळे शत्रूचे आठ हल्ले निष्प्रभ ठरले; मात्र या झटापटीत ते जखमी झाले होते. जीवाची तमा न बाळगता ते जिद्दीने लढत राहिले. त्यांच्या या अतुलनीय धैर्याबद्दल त्यांना परमवीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले (१९४८). शिवाय सन्मान्य कॅप्टन हे बिरुद त्यांना लाभले.

लष्करातून निवृत्त झाल्यावर ते जन्मगावी गेले. तिथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • लेले, जोत्स्ना (अनु.), परमवीर चक्र : रणांगनावरील आपले महान योद्धे, पुणे, २००६.