पुणतांबेकर, शैलेश : (१८ ऑक्टोबर १९६३). भारतीय कर्करोग विशेषतज्ज्ञ, विशेषत: दुर्बिणीद्वारे कर्करोग शस्त्रक्रिया करणारे कर्करोग शल्यविशारद म्हणून त्यांची ख्याती आहे.
पुणतांबेकर यांचा जन्म नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे शिक्षक प्रफुल्ल देसाई आणि वडील पद्माकर पुणतांबेकर हे त्यांचे आदर्श आहेत. मुंबईतील किंग जॉर्ज शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर बी. जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस. ही पदवी प्राप्त केली. पुणतांबेकर यांनी ससून रुग्णालयात कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली. ससून, टाटा, के.ई.एम. रुग्णालय, पुणे या वैद्यकीय संस्थांमध्ये ते काही काळ कार्यरत होते. ते बी.एल.के. हॉस्पिटल-नवी दिल्ली, हेमास हॉस्पिटल-श्रीलंका, कोलंबिया, एशिया आणि एस्टर मेडिपॉईंट हॉस्पिटल-पुणे, एस्टर मेडिसिटी-कोची आणि दुबई या रुग्णालयांमध्ये देखील तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
पुणतांबेकर हे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही श्रोणी दुर्बीण शस्त्रक्रिया (Laparoscopic pelvic surgery) आणि स्त्रीरोगवैज्ञानिक कर्करोग शस्त्रक्रियेचे (Gynaecological cancer surgery) तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. सध्या पुण्यातील ‘गॅलेक्सी केअर लॅपॅरोस्कोपी इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या संचालक या पदावर ते कार्यरत आहेत. दुर्बिणीद्वारे श्रोणी भागाची शस्त्रक्रिया व यंत्रमानवी शस्त्रक्रिया (Robotic surgery) या क्षेत्रांत त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांनी गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर उपचाराचे नवे तंत्र विकसित केले, जे जगभरात सर्वत्र ‘पुणे तंत्रज्ञान’ या नावाने प्रसिद्ध आहे. मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाची, स्त्रीरोग आणि अन्ननलिका कर्करोग यांची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात ते निपुण आहेत. अन्ननलिकेवर यंत्रमानवी पद्धतीने दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणारे ते पहिले भारतीय शल्यविशारद आहेत. त्यांनी श्रोणीच्या शरीररचनेची नवीन संकल्पना मांडून याबाबत जगभरात अनेक व्याख्यानेही दिली आहेत.
पुणतांबेकर यांनी भारतातील दुर्बिणीद्वारे गर्भाशय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया १९ मे २०१७ रोजी यशस्वीरित्या पार पाडली गेली आणि प्रत्यारोपणाच्या माध्यमातून मातृत्व अनुभवण्याची नवी उमेद जागी झाली. १८ ऑक्टोबर २०१८ रोजी गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या महिलेने आपल्या बाळाला जन्म दिला. प्रत्यारोपणानंतर बाळाला जन्म देणारी ही आशियातील पहिली तर जगातील बारावी महिला ठरली. पुण्यातील गॅलेक्सी केअर लॅपॅरोस्कोपी इन्स्टिट्यूटच्या शल्यचिकित्सकांच्या पथकाने हा इतिहास घडविला आणि या शस्त्रक्रियेचे नेतृत्व पुणतांबेकर यांनी केले. त्यांनी आणि त्यांच्या चमूने आतापर्यंत मिळवलेले हे सर्वांत मोठे यश आहे.
पुणतांबेकर यांनी यंत्रमानवी आणि कर्करोग शस्त्रक्रियेच्या अनुभवावर काही पुस्तके लिहिली आहेत ती पुढीलप्रमाणे : ॲटलास ऑफ गायनॅकॉलॉजिकल ऑन्कॉलॉजी, ॲटलास ऑफ कोलोरेक्टल सर्जरी, ॲटलास ऑफ रोबॉटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक पेल्विक ॲनॉटॉमी आणि ॲटलास ऑफ इसोफेजियल सर्जरी. त्यांची मिनिमली इनव्हेजिव्ह सर्जरी इन ऑन्कॉलॉजी, यूरोलॉजिकल कॅन्सर्स, रोबॉटिक्स इन कॅन्सर सर्जरीज ही तीन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत. यांतील काही पुस्तकांचे चिनी, जर्मन आणि स्पॅनिश भाषेतही अनुवाद झाले आहे. ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकांचे समीक्षक आहेत. त्यांनी दुर्बिणीद्वारे कोलोरेक्टल आणि यंत्रमानवी शस्त्रक्रियेवर दोन चित्रीकरणे (Videos) ॲटलासमध्ये प्रकाशित केले आहेत. त्यांनी कील स्कूल ऑफ एंडोस्कोपी, गायनॅक-लॅपरोस्कोपी आणि मॅन्युअल ऑफ लॅपरोस्कोपीमध्ये अध्यायांचे योगदान दिले आहे. त्यांची ७०हून अधिक प्रकाशने उच्चस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यांनी १५०हून अधिक प्रत्यक्ष दुर्बीण शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक एम्स, एसजीपीजीआय (लखनऊ), पीजीआय (चंदीगड), पीजीआयएमएस (रोहतक) आणि सीएमसी (वेल्लोर) येथे शस्त्रक्रिया कार्यशाळांमध्ये केले आहेत. यूरोपियन सोसायटी ऑफ गायनॅकॉलॉजिक एंडोस्कोपी, एशिया-पॅसिफिक असोसिएशन फॉर गायनॅकॉलॉजिक एंडोस्कोपी, स्ट्रासबर्ग युनिव्हर्सिटी, फ्रान्स आणि हार्व्हर्ड युनिव्हर्सिटी, बोस्टन, टेक्सास, ह्यूस्टन, यूएसए या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे आयोजन तसेच शल्यविशारद आणि स्त्रीरोगतज्ज्ञांना व्याख्यान या उपक्रमांमध्ये पुणतांबेकर सक्रिय असतात.
पुणतांबेकर यांची २०२० मध्ये अमेरिकन असोसिएशन ऑफ गायनॅकॉलॉजिकल लॅपॅरोस्कोपी या संघटनेच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. या स्थानावर पोहोचणारे ते पहिलेच भारतीय आहेत. २००४ पासून ते तेथे प्राध्यापक आणि अर्बुदविज्ञान (Oncology) समितीचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांना या संस्थेतर्फे लॅप्रोस्कोपी क्षेत्रामधील सर्वोत्कृष्ट शल्यक्रियाजन्य दूरचित्रीकरणासाठी (Surgical video) गोल्डन लॅपॅरोस्कोप पुरस्कार घोषित करण्यात आला आहे (२०२०). याच संस्थेमधील सर्वोत्कृष्ट चित्रीकरणासाठी गोल्डन टेलिस्कोप पुरस्कार देऊन त्यांना तीन वेळा गौरविण्यात आले आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय शल्यविशारद आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट व्हिडिओसाठी कर्ट सेम पुरस्कार देखील मिळाला आहे. भारतातील पहिले यंत्रमानवी अर्बुद शल्यविशारद (Robotic oncosurgeon) अशी त्यांची ओळख असून आजवर त्यांनी ४०० हून अधिक यंत्रमानवी शस्त्रक्रिया केल्या आहेत. भारतात तसेच जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, रोमानिया, तुर्की, इझ्राएल, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, केनिया, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, श्रीलंका, बांगलादेश आणि ग्रीस येथे कार्यशाळेत त्यांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केल्या आहेत ज्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले आहे.
कळीचे शब्द : #लॅप्रोस्कोपिक #पेल्विक #सर्जरी #गायनॅकॉलॉजिकल #कॅन्सर
संदर्भ :
- https://www.galaxycare.org/dr-shailesh-puntambekar
- https://www.hindustantimes.com/pune-news/2018-the-year-that-was-first-among-firsts-uterus-transplant-puts-pune-on-top-of-the-world/story-beSzu3X7dB9JFdLCgn3pUP.html
- https://prezi.com/da5i8nambmcs/dr-shailesh/
समीक्षक : अनिल गांधी